वेदना सर्वांना सारखी झोंबत नाही.. प्राध्यापक सुभाष गडलिंग - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 6 October 2020

वेदना सर्वांना सारखी झोंबत नाही.. प्राध्यापक सुभाष गडलिंग

 

वेदना सर्वांना सारखी झोंबत नाही..


मनीषा वाल्मिकी हिच्यावर झालेला अमानूष आत्याचार हा आपल्या  संवेदनेचा थरकाप उडवून  टाकतो.  रामराज्यातले हे दिवस मानवी  इतिहासाला कलंक लावणारे आहे. ही घटना त्याचे ज्वलंत प्रमाण आहे.  स्त्रिदास्य हे वर्णव्यवस्थेचे मुलगामी वैशिष्ट्ये आहे. स्त्रीला  दुय्यम  स्थानावर ठेवण्याचे कारण काय आसावे? त्याची उत्तरे ही  धर्मशास्त्रात दडली  आहेत . हाथरसच्या महीला ह्या घुंगट घालून दिसतात. त्या गावपरिसराचा सांस्कृतिक  चेहरा कसा असावा याची  जाणीव त्यावरुन येते.  मुलतत्ववाद हा मानवतेला पोखरुन टाकतो. सवर्णाने एखाद्या  दलित स्त्री ला नासवणे हे जणू समाजसंमत  माणले जावे. सामंतशाहीचा चेहरा किती कृर आणि  बीभत्स असतो याचा अनुभव हा नवा नाही.  दया पवार यांनी" विटाळ" या कथेतून  ते मांडण्याचा प्रयत्न  केला आहे.


लोकशाही जीवनप्रणालीने भारतीय समाजास नवी मानवी मूल्य बहाल केली असली तरी पूराणवेड  किती भयंकर  आहे हे दिसून येते. जातपंचायतीमधून गावाचा पारंपारिक  दहशतीचा व्यवहार काय दर्शवतो? त्याचा पाया काय आहे? समाजपरिवर्तनाला हा व्यवहार किती घातक असतो.  तरी समाज हे कायम अंधत्व असल्यासारखा  स्विकारत राहतो. मग शोषक आणि  शोषित हे दोन्ही  घटक  कशी एकत्र  राहतात? .त्यांच्यातला कलह हा कायम धुमसत असतो. 


एकविसाव्या शतकात सुद्धा  जातीव्यवस्था आणि  स्त्रीदास्य कशी कात टाकत आहे. हे वास्तव  दुर्लक्षून चालत नाही. हा उन्मादी भोगवाद जो पूर्वापार  चालत आला आहे तो अतिशय हिंसात्मक आणि  उग्र होतो.  शोषीतांना आपल शोषण  चालले  कळत असले तरी ते सहन करणे याशिवाय गत्यंतर  नाही असे वाटते. या व्यवस्थेपुढे आपला टिकाव लागणार नाही. अशा पराभूत मानसिकतेने ते पछाडून जातात.  त्यांना  आश्वस्त करणारा संघटनात्मक प्रयत्न  करणे  गरजेचे असते.  सर्वहारा शोषीत समाजाने  या अन्यायाच्या विरोधात एकवटने गरजेचे असते. दुर्बल घटकांनी संघटित  होण्यातच त्यांचे सामर्थ्यशाली  होणे असते. परंतु  शक्तीहिनांचा शक्तीपात कसा करायचा?  यासाठी धर्म आणि  परंंपराच्या नावावर छोट्या  छोट्या जातीचा  अस्मिताभाव पेटवून त्यांचे अस्तित्व  खलास केल्या जाते. 


जातीचे पाठबळ न्यूनअसलेल्या जातीसमूहावर असे आक्रमणे सहजतेने  केले जाते.  ही पोलीस- प्रशासन व्यवस्था  धनदांडग्यांचे  प्रबळ जातीचे हितसमंध जोपासतात.त्या त्या प्रदेशातील जातीय सत्तेचे समीकरणे सुद्धा शोषणाला प्रभावित  करतात. हाथरस येथील हे प्रकरण त्याची साक्ष देते. दुर्बल घटक कसे अगतिक होतात.  पीडीतांनाच अपराध्याच्या कटघर्यात उभे केले जाते. हे किती भयंकर  व आमानूष वाटत असले तरी  शोषकवर्ग  हा सत्ताधारी असल्याने कुठल्याचा नीतीमूल्यांना जुमानत नाही. सगळी  मानवीमूल्य पायदळी तुडवले जाते. आपण  त्याचे मुकसाक्षीदार होवून जातो. 


शोषणाच्या बळी स्त्रियाच  का जातात? त्यांनाच टार्गेट का केले जाते. खैरलांजी असो की हाथरस!  कोणत्याही  समाजघटकातील स्त्री  ही सर्वाधिक  सोशिक आसते. अब्रू किंवा चारित्र्य  हे स्त्रीच्या  अस्तित्वाचा नाजूक कोपरा असतो.  जेथून तिला समाजातून उठवने किंवा उद् ध्वस्त करणे सोयीचे असते.  बहिष्कार घालणे, वाळीत टाकणे  अफवा पसरवणे  ही नामोहरम करण्याची शस्त्र असतात.  हे होवू नये म्हणून  ती जाच सहन करते. आपल्या  अब्रूस जीवापाड जपते. अखेर समाजाच्या घाणेरड्या पुरुषसत्ताक धारणा त्यांचा बळी घेतात. खरेतर या अमानुष  धारणा बदलणे गरजेचे आहे. तेव्हाच बहूबेटी सुरक्षित  होईल.


स्र्त्रियांचा शहरी जीवनातला सार्वजनिक  सहभाग हा मोकळा   असलातरी ग्रामीण जीवनात ती सिमित बंदिवासात जगते. एक निखळ निकोप संवाद हा धारणाग्रस्त समाजात होणे शक्यच  नसतो. रोगट मनोवृत्तीचा समूळ उच्छेद झालेला नाही. तिच्या  भोगवस्तू आसण्याचे  डंबरु पुरुषाच्या कानात वाजवले जाते. जे  फार घातक आणि  विकृत मानसिकतेचे द्योतक  आहै. या दृष्टिकोनाचे बदलते परिप्रेक्ष अभ्यासने गरजेचे आहे. याबाबत सुशिक्षित समाज सुद्धा  अजूनही खूजा आणि  कसा अडाणी  आहे हे दिसून येते.


ग्राम्यता हा मनुसंस्कृतीचा प्राण आहे.  गाव हे जातीव्यवस्थेचे केंद्र आहे. जातवास्तव आणि  गावपातळीवरचे वास्तव हे दोन दुवे हाथरस व खैरलांजीत समान आहे. जातव्यवस्थेची दहशत समान  आहे. समताधिकाराची पायमल्ली सुद्धा समान आहे. गावाचे पीडीतांऐवजी पीडा देणाऱ्याच्या बाजूने उभे होणे समान आहे. जातप्रयुक्त दहशतवाद दिसून येतो. आशाप्रसंगी पीडीत कुटुंबास   एकाकी  पाडणे.वेगळेच वास्तव पुढे आणून  पीडीतांविषयी उसळलेली सहानुभूतीची लाट कमी करणे हे हातखंडे वाफरले जातात.  हे हेतूपूर्वक केले जाते. आभासी झाकोळ निर्माण करुन वास्तव झाकले जाते. 


सत्ता किती निरंकुश आणि  बेरहेम असते.  मणुष्यत्वाचे मूल्य हे जातीच्या पारड्यातून मोजले जाते. न्यायाची चिकित्सा सुद्धा तशीच केली जाते.  ही व्यवस्था  किती भोंगळ आणि  मूल्यविहिन आहे हेच दिसून येते. मनीषाच्या स्त्रीत्वाचा हा घोर अपमानच नव्हे तो  सत्तेच्या अनास्थेचा संवेदनाशीलतेचा मृत्यू आहे. ज्या व्यवस्थेला उलथवून टाकल्याशिवाया सर्वहारा शोषीत माणसाचे जगणे शक्य नाही.. कितीही निंदा आणि  निषेध केला तरी कमीच आहे. अशी ही घटना आहे. आपला वर्तमान किती अगतिक होतो आहे.  शेवटी हा प्रश्न  पडतो  की वेदना ही सर्वांना  सारखी का झोंबत नाही? 


                     -  सुभाष गडलिंग

                  अमरावती ९५४५२६५२७९

No comments:

Post a Comment

Pages