बाबासाहेबांची प्रेरक पत्रकारिता >> देवेंद्र भुजबळ - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 30 January 2021

बाबासाहेबांची प्रेरक पत्रकारिता >> देवेंद्र भुजबळ

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित समाजाच्या वेदना आणि विद्रोह प्रकट करण्यासाठी 31 जानेवारी 1920 रोजी त्यांनी ‘मूकनायक’ हे वृत्तपत्र सुरू केले. या ऐतिहासिक घटनेस   101 वर्षे पूर्ण झाली. आजही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता तेवढीच प्रेरक आहे. त्यांच्या पत्रकारितेची ओळख करून देणारा लेख…दलित समाजातील गोपाळ बाबा वलंगकर यांनी 1888 मध्ये पत्रकारितेस सुरुवात केली होती. 23 ऑक्टोबर 1888 रोजी त्यांनी ‘विचार विध्वंस’ नावाची पुस्तिका लिहिली होती. तत्कालीन समाजव्यवस्थेने निर्माण केलेल्या जातीय दुष्टचक्रातून त्या वेळच्या अस्पृश्य वर्गाला बाहेर काढण्याचा ध्यास त्यांना लागलेला होता. दलित समाजातील ते पहिले पत्रकार होते. त्यानंतर शिवराम जानबा कांबळे यांनी ‘सोमवंशी मित्र’ हे पहिले साप्ताहिक प्रकाशित केले. पूर्णपणे स्वतःचे अग्रलेख लिहिणारे ते पहिले दलित पत्रकार होते. किसन फागु बंदसोडे यांनी ‘निराश्रित हिंद नागरिक’ हे वृत्तपत्र 1910 मध्ये , ‘विटाळ विध्वंसक’ 1913 व 1918 साली ‘मजूर पत्रिका’ अशी तीन वृत्तपत्रे सुरू करून त्यांनी जनतेचे प्रश्न मांडले. बंदसोडे यांनी पत्रकारितेमध्ये नवीन आदर्श निर्माण केला. विदर्भातील गणेश गवई यांनी 1914 साली ‘बहिष्कृत भारत’ हे वृत्तपत्र काढले.

स्वतः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेदेखील एका निश्चित भूमिकेतून पत्रकारितेकडे वळले होते. विविध जाती जमातींच्या मतदानाच्या अधिकारांच्या संदर्भात काही कर्त्या व्यक्तींच्या साक्षी काढण्यासाठी सरकारने 1917 साली साऊथबरो कमिशन नेमले होते. या कमिशनच्या निमित्ताने अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांसाठी झगडण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. त्यांना अस्पृश्यांचे म्हणणे जगाच्या वेशीवर टांगण्यासाठी आपल्याजवळ नेहमीसाठी एखादे साधन असावे, असे वाटले. ‘पंखाशिवाय जसा पक्षी, त्याप्रमाणे समाजात विचार प्रवृत्त करण्यासाठी वृत्तपत्राची गरज असते’ हे त्यांना तीव्रपणे जाणवत होते. उपलब्ध वृत्तपत्रे तर विशिष्ट जातींचीच चाकरी करणारी, अस्पृश्यांवर बहुतांशी अन्याय करणारी होती. याचा अर्थ वृत्तपत्राविना अस्पृश्य समाज अनाथ होता. त्यांच्याजवळ विलक्षण अशा करुण कहाण्या होत्या. या मूक समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी एखाद्या माध्यमाची गरज होती. या गरजेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकारितेकडे वळले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वृत्तपत्रे
मूकनायक – समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी त्यांनी ‘मूकनायक’ पाक्षिक वृत्तपत्र 31 जानेवारी, 1920 रोजी सुरू केले. मूक अस्पृश्यांचे नायकपण आपण स्वीकारल्याचे त्यांनी जाहीर केले. मूकनायकाने त्यांच्या पुढील घणाघाती चळवळीची जणू नांदीच म्हटली. राजर्षी शाहू महाराज यांचे आर्थिक सहकार्य त्यासाठी त्यांना लाभले होते. पहिल्या अंकाच्या संपादकीयामध्ये ते म्हणतात,

‘आमच्या या बहिष्कृत लोकांत होत असलेल्या व पुढे होणाऱया अन्यायावर उपाययोजना सुचविण्यास तसेच त्यांची भावी उन्नती व तिचे मार्ग यांच्या खऱया स्वरूपाची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी अन्य भूमीच नाही. परंतु मुंबई इलाख्यात निघत असलेल्या वृत्तपत्राकडे पाहिले असता असे दिसून येईल की, त्यातील बरीचशी पत्रे विशिष्ट जातीची हितसंबंध पाहणारी आहेत. इतर जातीच्या हिताची पर्वा त्यांना नसते. इतकेच नव्हे तर, केव्हा केव्हा त्यांना अहितकारक असेही प्रलाप त्यातून निघतात. अशा वृत्तपत्रकारांना आमचा इशारा एवढाच की, कोणतीही एखादी जात अवनत झाली तर तिच्या अवनतीचा चट्टा इतर जातींना बसल्याशिवाय राहणार नाही. समाज ही नौकाच आहे. ज्याप्रमाणे आगबोटीतून प्रवास करणाऱया उतारूने जाणूनबुजून इतरांचे नुकसान करावे म्हणून म्हणा किंवा आपल्या विनाशक स्वभावामुळे म्हणा, जर का इतरांच्या खोलीस छिद्र पाडले, तर सर्व बोटीबरोबर त्यालाही आधी किंवा मागाहून जलसमाधी ही घ्यावीच लागणार आहे. त्याचप्रमाणे एका जातीचे नुकसान केल्याने, अप्रत्यक्ष नुकसान करणाऱया जातीचेही नुकसान होणार यात बिलकूल शंका नाही. म्हणूनच स्वहितसाधू पत्रांनी इतरांचे नुकसान करून आपले हित करावयाचे पढतमूर्खाचे लक्षण शिकू नये.’
मूकनायकाचे ध्येय धोरण स्पष्ट करण्यासाठी त्यावर पुढील बिरुदावली असे.
‘‘काय करून आता धरुनिया भीड।
निःशक हे तोंड वाजविले ।।1।।
नव्हे जगी कोण मुकियाचा जाण।
सार्थक लाजोनी नव्हे हित ।।2।।

तुकारामाच्या या ओळी त्यांनी बिरुदासाठी निवडाव्या, यात केवढे तरी औचित्य आहे. वृत्तपत्राचे ‘मूकनायक’ हे नावही त्यांना ‘नव्हे जगी कोणी मुकियाचा जाण’ या चरणावरून सुचले असावे.

‘बहिष्कृत भारत’ हे पाक्षिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 3 एप्रिल 1927 रोजी सुरू केले. या पाक्षिकाचे ते स्वतः संपादक होते. या वृत्तपत्रातील सर्व मजकूर बाबासाहेब स्वतः लिहीत. या वृत्तपत्राचे खूप वर्गणीदार झाले नाही. तसेच कायमची आर्थिक तरतूद शक्य झाली नाही. इतर सर्व व्यापतापांमुळे ‘बहिष्कृत भारत’ 15 नोव्हेंबर, 1929 रोजी बंद पडले. या पाक्षिकाचे एकूण 34 अंक निघाले. त्यातला 4 जानेवारी 1929 चा अंक सोडता सर्व अंकात अग्रलेख आहेत. 31 अंकांमध्ये ‘प्रासंगिक विचार’ या सदरामध्ये बाबासाहेबांनी विविध विषयांवर लिहिले आहे.

‘जनता’ वृत्तपत्राचा पहिला अंक 24 नोव्हेंबर 1930 रोजी प्रकाशित झाला. देवराव विष्णू नाईक हे संपादक होते. ‘जनता’ प्रारंभी पाक्षिक होते. 31 ऑक्टोबर 1931 पासून ते साप्ताहिक झाले. या वृत्तपत्राची बिरुदावली ‘गुलामाला तू गुलाम आहेस असे सांगा, म्हणजे तो बंड करून उठेल’ अशी होती. बाबासाहेबांनी त्यातून सर्व निकडीचे प्रश्न चर्चिलेच, पण त्यांनी परदेशातून लिहून पाठविलेली पत्रे ‘जनता’ वृत्तपत्रात प्रकाशित झालीत. ‘जनता’ 1955 सालापर्यंत सुरू होते. काही वेळेस ‘जनता’च्या प्रकाशनात अनियमितपणा निर्माण झाली, पण तरी ते खूप दिवस टिकले. 4 फेब्रुवारी 1956 रोजी त्याचे नामकरण ‘प्रबुद्ध भारत’ असे करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्फूट लेखन प्राधान्याने ‘बहिष्कृत भारत’मध्ये आढळते. ‘जनता’ आणि ‘प्रबुद्ध भारत’मध्ये स्फूट लेखन प्रकाशित होत असले तरी ते डॉ. बाबासाहेबांचे नव्हते. ‘बहिष्कृत भारत’च्या 1927 सालच्या पहिल्या वर्षाच्या अंकात ‘आजकालचे प्रश्न’ या सदरांतर्गत तर दुसऱया वर्षी ‘प्रासंगिक विचार’ या सदराखाली बाबासाहेबांचे स्फूटलेखन प्रकाशित झाले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सव्यसाची पत्रकार होते. सामाजिक प्रबोधन आणि सामाजिक न्याय या तत्त्वांचा त्यांनी आग्रह धरलेला होता. त्यांची सर्व पत्रे याच ध्येयवादाने भारलेली होती. नैतिकता हा तर त्यांनी वृत्तपत्राचा कणाच मानला होता. महाराष्ट्राला ध्येयशील पत्रकारितेची परंपरा आहे. म्हणून व्यथित अंतःकरणाने, पण परखडपणे आपल्या ध्येयापासून वंचित होणाऱया वृत्तपत्रांना त्यांनी आपल्या मूळ वैचारिक बैठकांची जाणीव करून दिली. वृत्तपत्रांनी आचारसंहिता पाळली नाही आणि त्यांचे तंत्र स्वैर असले, तर सामान्य निरक्षर माणसे रानभेरी होतील, असे त्यांना वाटे.

भडक, विकृत आणि भावनांना आवाहन करणारे लेख लोकमानस घडवू शकणार नाहीत, लोकजीवनाला नवे परिणाम देऊ शकणार नाही, अशी त्यांची खात्री होती. वृत्तपत्राचा खप वाढणे म्हणजे लोकमनाला संस्कारित करणारी विधायकता नव्हे. निःपक्षपातीपणाचा अभाव आणि न्यायोचित लोककल्याणाच्या विचारांशी फारकत लोकमनाची व लोकमताची अविकृत जडणघडण करू शकत नाही, असा त्यांचा ठाम विचार होता. वृत्तपत्र हे शोषणाचे माध्यम बनविणाऱया प्रवृत्तींना त्यांनी नेहमीच धारेवर धरले.

त्यांच्या मते व्यक्तिपूजा ही देशातील अनेक वृत्तपत्रांना लागलेली कीड आहे. व्यक्तिपूजा आंधळी असते. त्यामुळे नीतिमत्ता ढळते. म्हणून वृत्तपत्रांनी नीतिमत्तेला बाधा येणार नाही आणि सत्याचा सूर बदलणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. वृत्तपत्र प्रपंच म्हणजे नीतिमत्तेचा प्रपंच अशी त्यांची धारणा होती.

जाहिरातांशिवाय वृत्तपत्रे जगू शकत नाही, हे खरे असले तरी वृत्तपत्रांनी जाहिरातींच्या आहारी जावे का आणि कितपत जावे? आर्थिक कारणांसाठी जाहिराती आवश्यक असल्या तरी कोणत्या जाहिराती प्रकाशित कराव्यात यासंबंधी संहिता पाळायला हवी, असे बाबासाहेब म्हणत. जाहिरातींची उद्दिष्टे आणि जाहिरात करण्याची पद्धती यात विरोध निर्माण झाला की, जाहिराती करण्यामागील तत्त्व भ्रष्ट होते, असा त्यांचा दावा असे. जाहिरात आणि नीतिमत्तेचा संबंध बाबासाहेबांना अपरिहार्य वाटे. समाज उन्नतीचे साधन म्हणून त्यांनी वृत्तपत्राकडे पाहिले. लौकिक ऋण फेडण्यासाठी त्यांनी वृत्तपत्राचा प्रभावीपणे वापर केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून मांडलेले विचार, भूमिका आजही तंतोतंत लागू पडते, यावरूनच त्यांची दूरदृष्टी आणि विचारांची खोली दिसून येते.

No comments:

Post a Comment

Pages