मनोगत - डॉ.बाबासाहेब आंबेडकर संपादक मूकनायक - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 30 January 2021

मनोगत - डॉ.बाबासाहेब आंबेडकर संपादक मूकनायक

 मूकनायक च्या पहिल्या अंकात दि.३१ जानेवारी १९२० रोजी प्रसिद्ध झालेला मनोगत हा अग्रलेख मूकनायक च्या शतकोत्तर १०१ व्या वर्धापन दिनी जशाचा तसा प्रसिद्ध करत आहोत.


मनोगत

जर या हिंदुस्थान देशातील सृष्ट पदार्थांच्या व मानवजातीच्या चित्रपटाकडे प्रेक्षक या नात्याने पाहिले तर , हा देश म्हणजे केवळ विषमतेचे माहेरघर आहे ; असे निःसंशय दिसेल . येथील सृष्टि पदार्थांची उपयुक्तता व विपुलता ; व त्याशी संलग्न असलेल्या अफाट जनसमूहात वसत असलेल्या दारिद्रयाची विषमता इतकी मनोवेधक आहे की , तिच्याकडे असावधपणातदेखील लक्ष गेल्या शिवाय रहाणार नाही . परंतु या विषमतेकडे लक्ष जाते न जाते तोच , या देशात वास्तव्य करणाऱ्या मानवांत नांदत असलेली , व उपरिनिर्दिष्ट धाकट्या बहिणीस लाजणारी ही थोरली विषमता दत्त म्हणून डोळ्यापुढे लख्ख उभी रहाते . या हिंदी जनांत वसणारी विषमता अनेक स्वरूपाची आहे . सर्वसाधारण असलेली कायिक , व मानवकोटीच्या आद्य शाखाअन्वये उद्भवलेली विषमता येथेही आहेच . काळे - गोरे , उंच - ठेंगणे , नाकेले किंवा फेंदारलेले तसेच आर्य - अनार्य , गोंड - खोंड , यावनी - द्रविड , अरव व इराणी इत्यादी भेद काही ठिकाणी जागृत , तर काही ठिकाणी शमित ; व काही ठिकाणी स्थित पण आहेतच . धार्मिक विषमता कायिक व मानवकोटीच्या शाखाअन्वये येणाऱ्या विषमतेपेक्षा प्रज्वलित स्थितीत आहे व केव्हां केव्हां तर ही धार्मिक विषमता विकोपास जाऊन तिच्या पायीं रक्तपातसुद्धा होतो . हिंदु , पारसी , यहुदी , मुसलमान , ख्रिस्ती वगैरे धार्मिक विषमतेचे तट तर आहेतच , पण अधिक बारीक दृष्टीने पाहिल्यास हिंदुधर्मीयांत शिरलेल्या विषमतेचे स्वरूप जितके कल्पनातीत , तितकेच तें निदास्पदही आहे . हा मांग - हा ब्राह्मण , हा शेणवी – हा मराठा , हा महार - हा चांभार , हा कायस्थ – हा पार्शी , हा कोरी - हा वैश्य , इत्यादी भिन्नभिन्न जातींचा हिंदुधर्माच्या पोकळीत समावेश होतो . 

एकधर्मीय त्वाच्या भावनेपेक्षा भिन्न जातीयत्वभावनेच्या मुळ्या किती खोल गेल्या आहेत हे हिंदूंना सांगणे नकोच . एखाद्या युरोपीय गृहस्थाने आपण कोण ? या प्रश्नास इंग्लिश , जर्मन , फ्रेंच , इटालियन इत्यादी प्रकारचे उत्तर दिले की समाधान होते . परंतु हिंदूंची मात्र तशी स्थिती नाही . मी हिंदू आहे या उत्तराने कुणाची तृप्ती व्हावयाची नाही . त्याला आपली जात काय ? हे सांगणे अगदी जरूर असते . म्हणजे आपली विवक्षित माणुसकी व्यक्त करण्यासाठी प्रत्येक हिंदूला आपली विषमता पदोपदी उघडकीस आणावी लागत आहे . हिंदुधर्मीयांत असलेली ही विषमता जितकी अनुपम आहे , तितकीच ती निंदास्पदही आहे . कारण विषमतेनुरूप होणाऱ्या व्यवहाराचे स्वरूप हिंदुधर्माच्या शीलाला शोभण्यासारखे खास नाही . हिंदु धर्मात समाविष्ट होणाऱ्या जाती उच्च - नीच भावनेने प्रेरित झाल्या आहेत हे उघड आहे . हिंदुसमाज हा एक मनोरा आहे . व एक एक जात म्हणजे त्याचा एक एक मजलाच होय . पण लक्षात ठेवण्या सारखी गोष्ट ही आहे की , या मनोन्यास शिडी नाही . आणि म्हणून एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्यास मार्ग नाही . ज्या मजल्यात ज्यांनी जन्मावे ; त्याच मजल्यात त्यांनी मरावे . खालच्या मजल्यातला इसम , मग तो कितीही लायक असो ; त्याला वरच्या मजल्यात प्रवेश नाही . व वरच्या माजल्यातला माणूस , मग तो कितीही नालायक असो ; त्याला खालच्या मजल्यात लोटून देण्याची कोणाची प्राज्ञा नाही . उघड भाषेत बोलावयांचे म्हणजे जाती - जातीत असलेल्या या उच्च - नीच भावना , गुणावगुणांच्या पायावर झाल्या आहेत , असे नाही . उच्च जातीत जन्मलेला , मग तो कितीही अवगुणी असो ; तो उच्च म्हणावयाचा . तसेच , नीच जातीत जन्मलेला , मग तो कितीही गुणी असो ; तो नीचच रहावयाचा . दुसरे असे की , परस्परांत रोटी - बेटीव्यवहार होत नसल्यामुळे दरएक जात या जिव्हाळ्याच्या संबंधात स्वयंवह म्हणजे तुटक आहे . ही निकटसंबंधाची गोष्ट जरी बाजूस टाकली तरी परस्परांतील बाह्य व्यवहार अनियंत्रित असा नाही . काहींचा व्यवहार दारापर्यंत होतो . व कांही जाती तर अस्पृश्य आहेत . म्हणजे , त्या जातीतील माणसाचा स्पर्श झाला असता इतर जातीतील माणसांस विटाळ होतो . विटाळामुळे या बहिष्कृत जातीशी इतर जातीच्या लोकांचा क्वचितच व्यवहार होतो . रोटीबेटीव्यवहाराच्या अभावी कायम झालेल्या परके पणात स्पृश्यास्पृश्य भावनेने इतकी भर टाकलेली आहे की , या जाती हिंदुसमाजात असून समाजाबाहेर आहेत असेच म्हटले पाहिजे . या व्यवस्थेमुळे हिंदुधर्मीय ब्राह्मण , ब्राह्मणेतर व बहिष्कृत असे तीन वर्ग होतात . तसेच या विषमतेच्या परिणामाकडे लक्ष दिले तर असे दिसून येईल की , तिच्या पायी विविध जातींवर विविध परिणाम झाले आहेत . सर्वात उच्च असलेल्या ब्राह्मणवर्गास आपण भूदेव आहोत असे वाटत आहे . सर्व मानवांचा जन्म आपल्या सेवेसाठी आहे असे मानणाऱ्या भूदेवांना रूढ असलेली विषमता पोषकच आहे . आणि म्हणूनच ते आपल्या स्वनिर्मित हक्काने आपली सेवा करून घेऊन आपण राजरोसपणे व बिनदिक्कत मेवा खात आहेत . त्यांनी काही करणी केली आहे म्हणावे तर ज्ञानसंचय व धर्मशास्त्रलेखन एवढेच काय ते ! पण ते धर्मशास्त्र म्हणजे आचार - विचाराच्या प्रवल विरोधाचे कोडेच म्हणावयाचे . हे उदात्त विचार व अनुदार आचार यांची सांगड घालणारे धर्मशास्त्रकार झिंगले होते असे वाटते ; कारण सचेतन व तशीच अचेतन वस्तू ही सारी ईश्वराची रूपे आहेत असे उपदेशिणान्या तत्ववादीयांच्या आचारात विलक्षण विषमता दिसावी हे काही शुद्धीवर असणारांचे लक्षण नव्हे ! वेडेवाकडे कसेही असो . पण या धर्मशास्त्राची छाप लोकांवर काही कमी नाही . आपण होऊन अज्ञजन आपल्या हितशत्रूस भूदेव म्हणून भजत आहेत हे कोण कबूल करील ? विघातक धर्मभावनेच्या शृखलेने जखडून घेऊन , शत्रूस मित्र समजून , तयांच्या पायी इतरेजन लीन का झाले याचा उलगडा करावयास फार दूर जावयास नको . अज्ञानी लोकांकडून काहीही करविता येईल ; आणि म्हणूनच ज्ञानसंचय - प्रसार नव्हे - ही ब्राह्मणांची मिरास , हे एक धर्माचे मोठे तत्त्व होऊन राहिलेले आहे . तिची महारकी मिळविण्याचे पातक इतरांनी करु नये असे बजावीत असताही चोरून छपून ज्ञान मिळवून सज्ञान झाल्यावर पूर्वापार चालत आलेले आचार विचार सोडल्यास स्वच्छंदाने लिहिलेले हे विघातक धर्मशास्त्र तरवारीच्या जोरावर अशा अधर्मीय ( ? ) ब्राह्मणेतरांच्या माथी मारल्याची उदाहरणे ब्राह्मणी अमदानीत काही कमी नाहीत . सत्ता व ज्ञान नसल्यामुळे ब्राह्मणेतर मागासले , व त्यांची उन्नती खुटली हे नविवाद आहे ; परंतु त्यांच्या दुःखात दारिद्रयाची तरी भर पडली नाही . कारण शेती , व्यापार - उदीम अथवा नोकरी करून आपला चरितार्थ चालविणे त्यांना दुरापास्त नाही . पण या सामाजिक विषमतेचा वहिष्कृत समाजावर झालेला परिणाम अति घोर आहे . दौर्बल्य , दारिद्रय व अज्ञान या त्रिवेणीसंगमात हा अफाट वहिष्कृत समाज वाहवला असला पाहिजे हे खास !

खोडसाळपणाबद्दल बहिष्कृत वर्गाने तक्रार केली आहे . एवंच , राज आपल्या नशिबी नाही : दीर्घकाळ अंगी मुरलेल्या दास्यामुळे उद्भवलेली हीनता त्यांना .. मागे खेचीत आहे . आहे ती स्थिती योग्य आहे , यापेक्षा बरी स्थिती अशा समजुतीचा विघातकपणा ह्या पतितांच्या नजरेस आणण्यास ज्ञानासारखे अंजनच नाही . पण ते अजुनही मिरची - मसाल्यासारखे विकत घ्यावे लागत आहे आणि दारिद्रयामुळे ते दुर्मिळ झाले आहे . कोठे कोठे तर विकत घेऊ गेले असता ते मिळतही नाही . कारण ज्ञानमंदिरात सर्वच अस्पृश्यांचा दारिद्रयाची बोळवण करण्यास कपाळी अस्पृश्यतेचा शिक्का मारला असल्यामुळे पैका मिळविण्यास हवी तेवढी संधी किवा मोकळीकही नाही . व्यापार - उदीम इत्यादी धंदयांत त्यांचा क्वचितच नसल्यामुळे त्यांना केवळ भुईचे खडे खात पडावे लागत आहे . अशा या अस्पृश्य नव्हे बहिष्कृत लोकांस निश्चितपणे खितपत पडलेले पाहून आहे , याचा फायदा घेऊन , अस्पृश्य वर्गाच्या खऱ्या स्थितीविषयी वरिष्ठ हिदूकडून त्याचा गैरसमज कसा करण्यात येत आहे . हे देखील त्यांना कळून चुकले आहे . जातीभेद आणि जातीमत्सर यांनी ग्रस्त झालेल्या देशात खरे स्वराज्य नांदण्यास या बहिणत वर्गास त्यांच्या स्वतंत्र प्रतिनिधींतर्फे राजकीय सत्तेचा पुरेसा ' मिळावा या मागणीस त्यांच्या वरिष्ठांनी कसून केलेल्या विरोधाच्या कीय सत्ता मिळून तिच्या जोरावर सामाजिक विषमतेचे दडपण कायम करू पाहाणान्यांचा कावा बहिष्कृत समाजाने ओळखला आहे , ही त्यांच्यात उपजलेल्या जागृतीची साक्ष होय . प्रवेश होतो असें नाही . रिघाव होतो . नशिब ( अजमावून ) पाहाण्यास कोठेच जागा ३३ कोटी देवास - नव्हे , ते हिंदूंचे देव - निदान अल्लास तरी कीव येत असेल . पण मनुष्यकोटीतील इतर प्राण्यांस त्यांच्याबद्दल बहुधा धिक्कारच उत्पन्न होईल . कारण माणुसकीदेखील हिरावून नेली असता जे लोक ती जिकण्याचा प्रयत्न करीत नाहीत , ती माणसे नसून जंतूच आहेत असे म्हणावे लागते . पण कोंडीत सापडलेल्या माणसांनी जंतुप्रमाणे राहिल्याशिवाय कसे चालेल ? असे म्हणणारे प्राप्तस्थितिप्रियलोक बहिष्कृत समाजात नाहीत असे नाही . दारिद्रयामुळे ज्ञान नाही , जान नसल्यामुळे बल नाही . युक्तिवाद खरा आहे , पण तो लढविणाराच्या माणुसकीला कमीपणा आणणारा आहे हे विसरता कामा नये . कोंडी फोडली तरच माणुसकी . अशा माणुसकीचा संचार बहिष्कृत समाजात होत आहे , हे सुचिन्हच म्हणावयाचे . प्रचलित हिंदुधर्माच्या अतिघोर अन्यायास्तव आपल्या समाजास अस्पृश्य मानण्याचे महा पातक , विश्वजनक प्रभूला न जुमानता करणारे कोटयावधी अविवेकी व दुराग्रही जन , जोपर्यन्त या देशात वावरत आहेत , तोपर्यन्त आपला समाज निकृष्ट स्थितीमध्येच खितपत रहाणार आहे , याची जाणीव या बहिष्कृत समाजातील लोकांस बऱ्याच अंशी झाली आहे , असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही . तसेच परस्थ सरकारास आपल्या तंत्राप्रमाणे वागावे लागत नाही . म्हणूनच स्वहितसाधू पत्रांनी इतरांचे नुकसान करून आपले हित करण्याचे पढतमूर्खाचे लक्षण शिकू नये . हा बुद्धिवाद ज्यांना कबूल आहे अशी वर्तमानपत्रे निघाली आहेत हे सुदैवच म्हणायचे . दीनमित्र , जागरूक , डेक्कन रयत , विजयी मराठा , ज्ञानप्रकाश , सुबोधपत्रिका वगैरे पत्रांतून बहिष्कृत समाजाच्या प्रश्नांची चर्चा वारंवार होते . परंतु ब्राह्मणेतर या अवडंबर संज्ञेखाली मोडत असलेल्या अनेक जातींच्या प्रश्नांचा ज्यात खल होतो ; त्यात बहिष्कृतांच्या प्रश्नांचा सांगोपांग ऊहापोह होण्यास पुरेशी जागा मिळणे शक्य नाही , हेही पण उघड आहे . त्यांच्या अतिविकट स्थितीशी संलग्न असलेल्या प्रश्नांची वाटाघाट करण्यास एक स्वतंत्र पत्र पाहिजे हे कोणीही कबूल करील . ही उणीव भरून काढण्यासाठी या पत्राचा जन्म आहे . खास अस्पृश्यांच्या हिताहिताची चर्चा करण्यासाठी , सोमवंशीय मित्र , हिंद नागरिक , विटाळ विध्वंसक ही पत्रे उपजली व लयही पावली . हल्ली चालू असलेले बहिष्कृत भारत कसेबसे दिवस काढीत आहे . परंतु वर्गणीदारांकडून योग्य प्रोत्साहन मिळत गेल्यास मूकनायक न डगमगता स्वजनोद्धाराचे महत्कार्य करण्यास योग्य पंथ दाखवील असे आश्वासन देताना ते अनुभवांती खोटे ठरणार नाही अशी खात्री बाळगून हे स्वशय निवेदन आटोपते घेतो .





No comments:

Post a Comment

Pages