बावरीनगर येथे यंदा “ऑनलाइन”धम्म परिषद - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 22 January 2021

बावरीनगर येथे यंदा “ऑनलाइन”धम्म परिषद

नांदेड दि. १७: सन १९८८  पासून  महाविहार, बावरीनगर, दाभड नांदेड येथे दरवर्षी दोन दिवसीय अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे अविरतपणे आयोजन करण्यात येते. देश विदेशातून पाचारण केलेल्या विद्वान भिक्खूंकडून धम्मदेसना घेण्यासाठी लाखोंच्या संख्येत लोक येथे  येत असतात. कोव्हिड-१९ विषाणूच्या सर्वदूर झालेल्या  प्रादुर्भावामुळे तथा शासनाच्या निर्देशांमुळे, यावर्षी आयोजित होणारी ३४ वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद दूरदृष्य (ऑनलाइन) प्रणाली  द्वारे आयोजित करण्याचे ठरविण्यात आले आहे.  

महाराष्ट्रातच नव्हे तर सबंध देशभरात नावलौकिक असलेले तथा शासनाचा तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त  असलेले हे ठिकाण बुद्ध कालीन धम्मानुयायी बावरी ब्राह्मणाच्या स्मरणार्थ “बावरीनगर” म्हणून संबोधिल्या जाते. प्रतिवर्षी प्रमाणे महाविहार बावरीनगर दाभड नांदेड येथे याही वर्षी दि. २८ व २९ जानेवारी २०२१  रोजी दोन दिवसीय अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद आयिजित करण्यात आलेली आहे.  भारतीय बौद्ध ज्ञानालंकार शिक्षण संस्था मुळावा चे अध्यक्ष पू. भदंत धम्मसेवक महास्थवीर यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद संपन्न  होणार आहे.

या दोन दिवासीय दूरदृष्य (ऑनलाइन) प्रणाली  द्वारे आयोजित धम्म परिषदेत भदन्त डॉ. उपगुप्त महाथेरो, भिक्खु डॉ. एम. सत्यपाल थेरो, भिक्खु विणय बोधिप्रिय थेरो, भिक्खू पय्यारत्न थेरो, भिक्खु हर्षबोधी थेरो, भिक्खु करुणानंद थेरो, भिक्खु ज्ञानरक्षित- औरंगाबाद, भिक्खु संघपाल इत्यादी देश विदेशातील विद्वान भिक्खुंची धम्म देसणा होईल. 

आवाहन:

कोव्हिड-१९ च्या पार्श्वभूमीवर आयोजित होणा-या ३४ व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेत कोणत्याही प्रकारची  दुकाने थाटण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. कोव्हिड -१९ या विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये अगर त्याचा प्रसार होऊ नये व अशा संकट समयी स्वत:च्या आरोग्यचीही काळजी घेणे आवश्यक असल्याने सर्व उपासक उपसिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी महाविहार बावरीनगर येथे धम्म परिषदेकरीता प्रत्यक्ष न येता आपल्या निवासस्थानाहुनच सोशल मिडियावर दूरदृश्य (ऑनलाईन) प्रणालीद्वारे धम्मदेसनेचा लाभ घ्यावा,  असे आवाहन धम्म परिषदेचे संयोजक महाउपासक डॉ. एस. पी. गायकवाड यांनी केले आहे.  




No comments:

Post a Comment

Pages