महाराष्ट्राला 6 पद्म पुरस्कार रजनिकांत देविदास श्रॉफ यांना पद्मभूषण - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 25 January 2021

महाराष्ट्राला 6 पद्म पुरस्कार रजनिकांत देविदास श्रॉफ यांना पद्मभूषण

नवी दिल्ली 25 : देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणा-या पद्म पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. प्रसिध्द उद्योजक श्री. रजनिकांत देविदास श्रॉफ यांना पद्मभूषण तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ, गिरीष प्रभुणे यांच्यासह अन्य तीन मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहे.


केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणा-या पद्मपुरस्कारांची घोषणा करण्यात येते. आज उशिरा रात्री मंत्रालयाकडून पद्मपुरस्कारांची घोषणा करण्यात आली.  यावर्षी एकूण 10 मान्यवरांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला असून महाराष्ट्रातून प्रसिध्द उद्योजक श्री. रजनिकांत देविदास श्रॉफ यांना व्यापार व उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.


पाच मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार

साहित्य व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानासाठी श्री नामदेव कांबळे  यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. कला क्षेत्रातील योगदानासाठी श्री परशुराम आत्माराम गंगावणे यांना पद्मश्री जाहीर झाला असून व्यापार व उद्योगातील योगदानासाठी  श्रीमती जसवंतीबेन जमनादास पोपट यांनाही पद्मश्री जाहीर झाला आहे. सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ आणि गिरीष प्रभुणे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.


यावर्षी एकूण 119 पद्मपुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये  7 पद्मविभूषण, 10 पद्मभूषण आणि एकूण 102पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कार घोषित झालेल्या मान्यवरांमध्ये 29 महिलांचा समावेश आहे. 10अप्रवासी भारतीयांना हे मानाचे पुरस्कार जाहीर झाले असून 16मान्यवरांना मरणोत्तर पद्म पुरस्कार तर एका तृतीय पंथी व्यक्तीस हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे .

No comments:

Post a Comment

Pages