गैरसमजामुळे कष्टकरी समुदाय लसीकरणापासून दूर किनवट तालुक्यात सुमारे 4 हजार नागरिकांचे लसीकरण - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday, 28 March 2021

गैरसमजामुळे कष्टकरी समुदाय लसीकरणापासून दूर किनवट तालुक्यात सुमारे 4 हजार नागरिकांचे लसीकरण

 किनवट, दि.28 (प्रतिनिधी) : जिल्ह्यासह किनवट तालुक्यात वाढत असलेला कोरोनाचा उद्रेक बघता आरोग्य विभागाकडून उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा व्यतिरिक्त तालुक्यातील सात प्राथमिक आरोग्य केंद्रात व ग्रामीण रुग्णालय मांडवी येथे लसीकरणाचे केंद्र सुरू करण्यात आले आहेत.  तालुक्यातील आकडेवारी पाहिल्यास गुरूवार (दि.25) पर्यंत एकूण 3  हजार 917 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये 3 हजार 512 नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला असून, 405 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. यात आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धे, 45 ते 59 वयोगटातील गंभीर आजारी व 60 वर्षावरील नागरिकांचा समावेश आहे. मात्र, सुशीक्षित व मध्यमवर्गीय नागरिक वगळता गोरगरीब, कष्टकरी समुदाय  लसीकरणापासून दूर असलेला दिसत आहे.


      केंद्र शासनाने कोविशिल्ड लसीला मान्यता दिल्यानंतर पहिल्या टप्प्यात हेल्थ केअर वर्कर आणि फ्रन्टलाईन वर्करना लस देण्याचा निर्णय घेतला. दुसर्‍या टप्प्यात 60 वर्षावरील नागरिक व 45 ते 59 वयोगटातील गंभीर आजारी असणार्‍यांना लस देणे सुरू झाले. ही लस टोचून घेण्यात मध्यमवर्गीय, सेवानिवृत्त नोकरदार, व्यावसायिक व सुशिक्षित समाज घटकांतील नागरिक पुढे सरसावल्याचे दिसून येत आहे. मात्र, कष्टकरी व गोरगरीब समुदायातील नागरिक अजूनही निडरपणे लस घेण्यासाठी केंद्रात येत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे तालुका प्रशासनाला लस साक्षरता मोहीम गतिमान करावी लागणार आहे. अशिक्षित व गरीब नागरिकांमध्ये कोरोना महामारीविषयी बर्‍याच गैरसमजुती असून, काही अफवांचाही त्यांच्यावर परिणाम झालेला दिसतो. कष्टाची कामे करणार्‍यांना कोरोना होत नाही, कोरोना श्रीमंतांचा आजार आहे, घरगुती उपचाराने कोरोना बरा होतो, लस घेतल्याने पुन्हा प्रकृती बिघडते, जुने आजार पुन्हा वाढू शकतात, लसीकरण केंद्रात प्रचंड गर्दी असल्याने खूप वाट पहावी लागते, लस घेऊनही  लोकांना कोरोनाचा संसर्ग होत आहे, त्यामुळे लस घेऊन काही फायदा नाही, अशा अनेक गैरसमजुती त्यांच्या मानसीकतेत असल्यामुळे, तो वर्ग अजूनही लस घेण्यास पुढाकार घेत नाही.


       तालुक्यातील नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रापैकी अप्पारावपेठ, बोधडी, दहेलीतांडा, जलधारा, राजगड, उमरीबाजार व शिवणी  या सात आरोग्य केंद्रासह मांडवी येथील ग्रामीण रुग्णालयात लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले असून, नागरिकांचा प्रतिसाद बर्‍यापैकी आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागात ज्येष्ट नागरिकांनी लस घेण्यात जास्त स्वारस्य दाखविल्याचे आकडेवारीवरून दिसते. इस्लापूर येथील आरोग्य केंद्राच्या इमारतीचे नूतनीकरण सुरू असल्यामुळे व कोठारी (सि.) पासून मांडवीचे ग्रामीण रुग्णालय अगदी जवळ असल्यामुळे याठिकाणी केंद्र सुरू करण्यात आले नही.


        किनवट तालुक्यात झालेल्या एकूण कोरोना लसीकरणामध्ये  आरोग्य कर्मचार्‍यांचा पहिला डोस 772 तर दुसरा डोस 274 व्यक्तींना मिळून एकूण 1 हजार 046 आ.कर्मचार्‍यांचे लसीकरण झालेले आहे. फ्रंटलाईन वर्कर्समधील  574 व्यक्तींचा पहिला डोस तर131 व्यक्तींचा दुसरा डोस मिळून एकूण 705 व्यक्तींचे लसीकरण पूर्ण झाले. 45 ते 59 वयोगटातील गंभीर आजारी व्यक्तींमधील 558 व्यक्तींचा पहिला डोस झालेल असून, दुसरा डोस झालेला नाही. तसेच 60 वर्षावरील 1608 व्यक्तींना पहिला डोस देण्यात आला असून, त्यांचाही दुसरा डोस पूर्ण करण्यासाठी काही दिवस शिल्लक आहेत.


 “ किनवट तालुक्यात लसीकरणाला बर्‍यापैकी प्रतिसाद मिळत असला तरी, यापेक्षा जास्त उर्त्स्फुत  प्रतिसादाची गरज आहे.  कोरोनाचा उद्रेक वाढतोय. अशात सर्व स्तरातील नागरिकांनी मनात कोणतीही शंका न बाळगता लवकरात लवकर आपला पहिला व दुसरा डोस घेण्यासाठी स्वत:हून पुढे यावे. एक एप्रिल पासून 45 वर्षावरील सर्व नागरिकांना लस देण्यात येणार आहे. निकषात बसणार्‍या अधिकाधिक नागरिकांनी लस घेतल्यास त्यांच्या शरीरात विषाणूविरुद्ध लढण्याची समूहशक्ती तयार होते. त्यानंतर विषाणूचा संसर्ग होत नाही. तसेच रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्यांना संसर्ग झाला तरी लस घेतल्याने गुंतागुंत वाढत नाही. लस पूर्णत: सुरक्षित असून, त्यामुळे कोणताही धोका नाही.”


- डॉ.उत्तम धुमाळे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, गोकुंदा.

No comments:

Post a Comment

Pages