करोना आणि बरेच काही... पुस्तक समिक्षा डॉ. त्र्यंबक दुनबळे. (माजी माध्यम अधिकारी) - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 22 March 2021

करोना आणि बरेच काही... पुस्तक समिक्षा डॉ. त्र्यंबक दुनबळे. (माजी माध्यम अधिकारी)


२०२० साल उजाडलं तेच कोरोना नावाचं मृत्यूभय घेऊन. चीनच्या वूहान प्रांतातून येणाऱ्या वार्तांनी त्याचा प्रारंभ झाला. मार्च पर्यंत संपूर्ण जगालाच या विषाणूने कवेत घेतलं.यापूर्वी प्लेग, कॉलरा, सार्स सारख्या अनेक महामारी व साथीनी घातलेला धुमाकूळ जगाने अनुभवलेला. मात्र तो एखाद्या देश, प्रांत किंवा भूभागात. कोविड नावाच्या महामारीने मात्र आशिया आफ्रिका खंडासह अमेरिका व युरोपातील प्रगत देशासह सर्वत्र  सामाजिक,आर्थिक,राजकीय उलथापालथ केली. भारतात तर ‘भय येथील संपंत नाही’ अशी स्थिती आजही कायम आहे. २२ मार्चला देशात लॉकडाऊन जाहीर झाला आणि खऱ्या अर्थाने ‘जग हे बंदीशाळा’ हे सर्वाना अनुभवयास आले. या घटनेला आता एक वर्ष पूर्ण होत आहे. लसीकरण सुरु आहे. तरी देखील दुसरी लाट येण्याच्या भीतीने जग गारठून गेलं आहे. 


प्रा. प्रमोद अर्जुन गायकवाड आणि उन्मेष रमेशभाई खंडागळे यांनी ‘करोना आणि बरेच काही...’या डायरीवजा पुस्तक रुपाने या महामारीची अनेक रूपे, व्यथा वेदना आणि मरणकळा  वाचकांना सादर केल्या आहेत. पहिल्या लॉकडाऊनपासून 12 सप्टें.20पर्यंतच्या विविध घडामोडी अतिशय तपशीलवार त्यात नोंदविल्या आहेत. हे एक महत्वाचे दस्ताऐवजीकरण आहे. कोरोनकाळात अनेक पत्रकार, कवी लेखक व कोरोना योद्यांनी विविध प्रकारे लेखन केले. त्यात ही मोलाची भर आहे. लेखक हे माध्यम क्षेत्रात अध्यापन करतात. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. छापीत, दृकश्राव्य व आधुनिक सोशल माध्यमांचा, त्यांचा दांडगा अनुभव आहे. अभ्यासू व व्यासंगीपणा आणि सामाजिक दायित्व ही त्यांची काही वैशिष्ट आहेत. सदर पुस्तकात त्यांचे हे वेगळेपण जाणवते. केवळ नोंदी व घटनांवर भाष्य न करता, त्यांचा माध्यम विषयक दृष्टीकोनही त्यात प्रतिबिंबित होताना दिसतो. ‘जगाने कोरोना काळात भीतीपोटी, अज्ञानापोटी, अफवेपोटी आपल्या विवेक बुद्धीलाच लॉकडाऊन केले, हे लेखकाचे आपल्या मनोगतातील निवेदन खूप मार्मिक आहे.विशेष म्हणजे माध्यमांनी कोरोना काळात टीआरपीचा बाजार कसा मांडला.   लोकांना भयमुक्त करण्याऐवजी भयभीतच कसे केले. हे समजून घेण्यासाठी तर हे पुस्तक वाचलेच पाहिजे. 


या पुस्तकात अनेक कळीच्या नोंदी वाचावयास मिळतात. त्यात प्रामुख्याने लॉकडाऊन झाल्यानंतर आपल्याच घरात बंदिस्त झालेली जनता. कोरानाच्या रुग्णांची वाढती संख्या. मृत्युंचे भयानक आकडे. सोशल डीस्टेनसिंग, तपासणी, अलगीकरन कक्ष, मास्क, महागडी औषधे व त्यांचा  काळाबाजार. संचारबंदी, बंद झालेली रस्ते, रेल्वे, विमान वाहतूक. सुनसान महामार्ग, ओसाड बाजारपेठा. कामगार,श्रमिक कष्टकरी जनतेचे हिरावलेले रोजगार. परिणामी गांव शहरं सोडून जीवाच्या आकांताने मिळेल त्या वाहनाने आणि पायी शेकडो किमी. पलायन. विविध अपघात. अन्न पाणी विना बेहाल बायका मुलं. दुरचित्रवाणी आणि सोशल मिडियांवरील अंगावर काटा आणणाऱ्या व्यथांचा सचित्र महापूर. अनेकांचे दुरावलेले आप्तजन. शेवटच्या प्रंसगीही त्यांचे न झालेले दर्शन, असा मन पिळवटणारा पट लेखकाने नोंदविला आहे. पण या संकटात मदतीचा हात देणारे ही खूप आहेत. प्राण पणाला लावणारे सामजिक राजकीय नेते, प्रशासन, पोलीस, डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार, आणि सामान्य जन देखील. हे माणुसकीचे दर्शन, खूपच मोलाचे आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे मार्गदर्शन, वर्क फ्रोम होम, भिलवाडा पँटर्ण आदी नोंदीही महत्वाच्या आहेत.


 पण त्याबरोबरच नेत्यांचे गो कोरोना, दिवे लावणे, टाळ्या वाजविणे, थाळ्या वाजविणे लोकांना विदीर्ण, दु;खी करते. या दरम्यान विविध आंदोलने, सुशांत आत्महत्या, उच्चभ्रू व सेलेब्रेटी असलेल्या अभिनेत्री कंगना आणि रिया चक्रवर्ती सारख्यांचे संकट काळात बेताल वर्तन. आयपील सामने, अमेरिकन निवडणुका, डोनाल्ड ट्रुम सारख्या जागतिक नेत्यांची वक्तत्वे, लसीकरण संशोधन, बुबा बाबा, साधू व स्वयंभु नेत्यांची संभ्रमित करणारी विधाने, उलटसुलट दावे आणि माध्यमांनी त्याला वारेमाप प्रसिद्धी देत मनोरंजनाचा तुफान चालविलेला हंगाम, आदी अनेक घटना खूप काही सांगून जातात.  

या पुस्तकातील दोन ठळक प्रसंग वाचकाला अंतर्मुख करतात. प्रा. गायकवाड यांचे वडील अर्जुनराव गायकवाड  हे कोरोना बाधित होतात. त्यांचा तो भयानक अनुभव लेखकाने पुस्तकात समाविष्ट केला आहे. तो प्रत्यक्ष अनुभव मुळातच वाचण्यासारखा आहे. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वृतपत्र विभागातील सेवानिवृत्त विद्यार्थीप्रिय प्राध्यापक डॉ. सुरेश पुरी सर फोन करून, ‘प्रमोद कसा आहेत, काळजी घे.’ अशी चौकशी करतात. या अत्यंत लोकप्रिय  शिक्षकाचा सुमारे दहा वर्षांनी आलेला फोन लेखकाला, या संकट काळात भारावून जातो.मुठभर बळ देतो.अंधारलेल्या मनात प्रकाशाची तिरीप पेरतो.               

सोपी व सरळ भाषा, स्पष्ट व परखड भाष्य, ठळक नोंदी हे या पुस्तकाचे प्रमुख वैशिष्टे आहेत. उत्तम छपाई व रंगीत मुखपृष्ठ अशी पुस्तकाची विशेषता आहे. सुमारे तीनसे पानांचे हे पुस्तक लेखकाने अतिशय कष्ट घेऊन लिहिले आहे. लेखकाने अनेक ठिकाणी कवितांची पेरणी केली आहे, ती मात्र पुस्तकाचे गांभीर्य कमी करते. तसेच संपादन आणि पुस्तक मांडणी याबाबत अधिक लक्ष देण्याची गरज आहे. इंग्रजी शब्दांचा आकडेवारीचा अनावश्यक वापर, माहितीची पुनरुक्ती आणि मांडणीतील दुर्लक्ष या प्रमुख उणीवा दिसून येतात.थोडी कल्पकता दाखविली असती तर पुस्तकाची पृष्ठसंख्या कमी होण्यास मदत झाली असती असे वाटते. लेखक जोडी माध्यमातील जाणकार आहेत. त्यामुळे त्यांनी याबाबत अधिक लक्ष दयावे असे वाटते. या काही उणीवा सोडल्या तर हे अतिशय महत्वाचे पुस्तक आहे. वाचक त्याचे निश्चितच स्वागत करतील ही  अपेक्षा.     


करोना आणि बरेच काही..  


प्रा. प्रमोद अर्जुन गायकवाड 

उन्मेष रमेशभाई खंडागळे.


प्रज्ञा भारती प्रकाशन, औरंगाबाद. 


280 पृष्ठे 

किंमत: 250 रुपये 

कॉपीराइटः दोन्ही लेखकांकडे

पुस्तक खरेदीसाठी संपर्क : 77096 20165

No comments:

Post a Comment

Pages