मुंबईः राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही महत्वाची घोषणा केली. आता इयत्ता बारावीची परीक्षा मे अखेर तर इयत्ता दहावीची परीक्षा जून महिन्यात घेतली जाणार आहे.
सीबीएसई, आयसीएसई, आयबी आणि केम्ब्रिज बोर्डालाही परीक्षांच्या तारखांबद्दल पुनर्विचार करण्याची विनंती राज्य सरकारच्या वतीने केली जाणार आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य, कल्याण आणि भवितव्य डोळ्यासमोर ठेवून मूल्यमापनाच्या अनेक पर्यायांवर चर्चा करण्यात आली. त्यावर परीक्षा पुढे ढकलणे हा सर्वात उत्तम उपाय पुढे आल्याचे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.
वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक, विद्यार्थी, सर्व पक्षांचे आमदार, शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ आणि तंत्रज्ञान कंपन्यांशी चर्चा करण्यात आली. त्या चर्चेअंती परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे गायकवाड यांनी म्हटले आहे.
आता व्यावसायिक अभ्यासक्रम, इयत्ता १२ वीच्या परीक्षा मेअखेरीस घेण्यात येतील तर इयत्ता दहावीच्या परीक्षा जून महिन्यात घेण्यात येतील. आम्ही आरोग्य स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. या परीक्षांच्या नव्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील, असे गायकवाड यांनी म्हटले आहे.
No comments:
Post a Comment