किनवट येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 8 June 2021

किनवट येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण

किनवट :  येथील तहसील कार्यालय परिसरात  जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने  आमदार भीमराव केराम व  सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पुजार यांचे हस्ते नुकतेच वृक्षारोपण करण्यात आले.


         यावेळी प्रभारी तहसीलदार  अनिता कोलगणे,  गटविकास अधिकारी सुभाष धनवे, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, पंचायत समिती सभापती प्रतिनिधी दत्ता आडे आदी मान्यवरांसह महसूल व वन विभागातील सर्व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.


            हवा, पाणी, जमीन, वनस्पती, पशुपक्षी, कीटक, माणूस, सर्व मिळून पर्यावरण बनत असते. पर्यावरण म्हणजे एकमेकांवर प्रभाव पाडणारे जैविक, भौगोलिक व सामाजिक घटक  असून, या सर्व घटकांमध्ये एक संतुलन असते. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे, हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे. पर्यावरणाशी संबंधित विविध विषय, घटक आणि समस्यांकडे लक्ष वेधून त्याबद्दल प्रत्येकांच्या मनात जाणीव निर्माण करणे आणि महत्त्वाच्या बाबींविषयी तातडीने पावले उचलणे असा हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे.


       हा दिवस म्हणजे सत्तरच्या दशकात सुरु झालेली संयुक्त राष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी जागरुकता मोहीम आहे. वसुंधरेची चिंता असलेले, त्याची काळजी घेणारे अनेक पर्यावरणवादी घटक, संघटना, पर्यावरण प्रेमींकडून आजचा दिवस हा उत्साहाने साजरा केला जात असतो. सद्यपरिस्थितीत पृथ्वीवरील सर्व सजिवांचं अस्तित्वच धोक्यात आलं आहे. त्यामुळे जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यामागे या पृथ्वीची काळजी आणि तिला वाचवण्याची तळमळ आहे.


          दरवर्षी पर्यावरण दिनासाठी एक ‘थीम’ ठरवली जाते आणि त्यासाठी  एका देशाला यजमानपद दिले जाते. 1974 पासून विविध थीमवर पर्यावरण दिन साजरा केला जातो. भारताने आतापर्यंत दोन वेळा ‘थीम’ चे यजमानपद घेतले आहे. 2011 मध्ये ‘नेचर अ‍ॅट युवर सर्व्हिस’  या थीमवर भारताला यजमानपद मिळाले होते. त्यानंतर 2018 मध्ये ‘बीट प्लास्टिक पॉल्यूशन’ या थीमवर दुसर्‍यांदा यजमानपद भारतास मिळाले. 2021 वर्षासाठी ‘इकोसिस्टीम रिस्टोरेशन’ ही ‘थीम’ आहे; अर्थात परिसंस्थेची हानी रोखत तिचे संतुलन भरून काढण्याचे प्रयत्न करणे. या थीमचे यजमानपद पाकिस्तानला मिळाले आहे.


     जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंचायत समिती किनवटसह तालुक्यातील विविध कार्यालयात वृक्षारोपण करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Pages