पुनरागमनानंतर लगेच पावसाची इस्लापूर, जलधारा मंडळात अतिवृष्टी ; सखल व नदीकाठच्या शेतात पाणी शिरून पिकांचे नुकसान - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 19 August 2021

पुनरागमनानंतर लगेच पावसाची इस्लापूर, जलधारा मंडळात अतिवृष्टी ; सखल व नदीकाठच्या शेतात पाणी शिरून पिकांचे नुकसान


किनवट,  : तालुक्यातील सातही मंडळात मुसळधार व मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळला असून, इस्लापूर, जलधरा महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झालेली आहे. शिवणी मंडळातही जोरदार पाऊस बरसला असून, उर्वरीत मंडळात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे. बुधवारी सकाळी संपलेल्या गत 24 तासांत तालुक्यातील सातही मंडळात मिळून 349.6 मि.मी. पाऊस पडला असून, त्याची सरासरी 49.94 मि.मी. आहे.


   वीस दिवसाच्या दीर्घ विश्रांतीनंतर  दोन दिवसापूर्वी पावसाचे पुनरागमन झाले आहे. उसंतीपूर्वी अतिवृष्टीचा कहर ढाळून झाल्यानंतर पाऊस थांबला होता आणि अतिवृष्टीनेचे परत त्याचे आगमन झाले आहे.  नाल्यांना पूर येऊन नांदेड-किनवट महामार्ग बराच काळ पूर्णपणे बंद झाला होता. नेहमीप्रमाणे मुसळधार पावसानंतर  हिमायतनगर-कोठारी दरम्यान अतीसंथगतीने चालू असलेल्या महामार्गावरील इस्लापूरनजीकच्या खैरगावच्या नाल्याजवळील पर्यायी वळणरस्ता व जलधारा जवळचा वळण रस्ता वाहून गेल्यामुळे, वाहतूक  दुतर्फा काही तास ठप्प झाली. गत साडेतीन वर्षात प्रत्येक पावसाळ्यात नागरिकांसह प्रवाशांना होणारा त्रास लक्षात आणून देऊनही निगरगट्ट कंत्राटदार व सुस्त प्रशासनावर याचा काहीच परिणाम होत नाही, हे दिसते. इस्लापूर, जलधारा व शिवणी परिसरातील सखल भागात व नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी शिरून पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचे कळते. दरम्यान,जीवित वा वित्त हानी झाल्याची नोंद ही बातमी लिहीपर्यंत तहसील प्रशासनाकडे आली नव्हती.


     भारत मौसम विभागाने सुधारीत केलेले किनवट तालुक्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान (जानेवारी ते डिसेंबर) 1 हजार 63.09 मि.मी. एवढे असून, 1 जून ते 31 ऑक्टोबर या पाच महिन्यातील केवळ पावसाळ्यात पडणार्‍या पावसाचे सरासरी पर्जन्यमान 1026.60 मि.मी. आहे. याच्या तुलनेत आतापर्यंत सरासरीच्या 85.12 टक्के पाऊस झालेला आहे. तालुक्यात एक जूनपासून सातही मंडळात मिळून आजपर्यंत पडलेला एकूण पाऊस 6,118.7  मि.मी.असून, त्याची सरासरी 874.1 मि.मी.आहे. तालुक्यात आजपर्यंत सर्वाधिक पाऊस जलधारा मंडळात झाला असून, सर्वात कमी दहेली मंडळात झालेला आहे. तालुक्यातील एक जून ते 18 ऑगस्टपर्यंत पडणार्‍या अपेक्षित सर्वसाधारण पावसाची सरासरी 657.6 मि.मी. आहे. आतापर्यंत तालुक्यात 874.1 मिलिमीटर सरासरी पाऊस पडलेला असून, अपेक्षित सरासरीपेक्षा 32.9 टक्के पाऊस जास्त पडलेला आहे.


  बुधवारी सकाळी संपलेल्या गत 24 तासात किनवट तालुक्यातील पावसाची नोंद पुढील प्रमाणे असून, कंसात 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या मंडळनिहाय पावसाची नोंद दिलेली आहे.  किनवट- 21.5 (874.2 मि.मी.); बोधडी- 26 (827.1 मि.मी.); इस्लापूर- 91.3 (896 मि.मी.); जलधरा- 108(1064 मि.मी.); शिवणी- 58.3 (968.3 मि.मी.); मांडवी- 18.5(761.9 मि.मी.);  दहेली- 26 (727.2 मि.मी.)

No comments:

Post a Comment

Pages