नवी दिल्ली , 29 : आदिवासी विभागातंर्गत येणा-या शाळांना गुणवत्तापूर्ण करण्याचे प्रयत्न करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज येथे दिले.
श्री तनपुरे यांनी आज दिल्लीतील दोन शासकीय शाळांना भेट दिली. यावेळी दिल्ली सरकारचे उपमुख्यमंत्री तथा शिक्षणमंत्री मनिष सिसोदिया त्यांच्यासोबत होते. दिल्ली (पूर्व) येथील सर्वोदय गर्ल्स स्कूल विनोद नगर (पश्चिम) आणि स्कुल ऑफ स्पेश्लाईझ्ड एक्सलेंस खिचडीपूर दिल्ली (पुर्व) या दोन शाळांना भेटी दिल्या. यावेळी श्री तनपुरे यांनी दिल्लीतील सरकारी शाळेतील झोलेल्या आमुलाग्र बदलाची सविस्तर माहिती जाणून घेतली. याप्रसंगी दिल्ली शिक्षण विभागाच्या अतिरिक्त संचालक रीटा शर्मा यांच्यासह अन्य अधिकारी, शिक्षक तसेच विद्यार्थीही उपस्थित होते. या भेटी दरम्यान श्री तनपुरे यांनी विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला.
दिल्लीतील सरकारी शाळेची महती देश-विदेशात पोहोचलेली आहे. शाळांमधील पायाभूत बदल, शिक्षक आणि विद्यार्थ्यांची वाढलेली गुणवत्ता याविषयी श्री सिसोदिया यांनी सांगितले. शाळेतील शिक्षकांना आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमांच्या (International Board) निकषानुसार प्रशिक्षित करण्यात येत आहे. त्यांना परदेशातील उत्कृष्ट संस्थानात प्रशिक्षण देण्यात येत आहे. यासह देशातील ख्याती प्राप्त असणा-या संस्थांशी करार करण्यात आलेला आहे. यामध्ये टाटा समाजविज्ञान संस्था, आयआयएमसी, एनएसडी आदी संस्था आहेत. नुकतेच ‘मेंटॉरशीप’ असा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला असून यातंर्गत इयत्ता ९ वी ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचे आव्हान तरूण पिढीला करण्यात येते. याचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे श्री सिसोदिया यांनी श्री तनपुरे यांना सांगितले.
यासह विद्यार्थ्यांमधील उणीवा तसेच गुणवत्ता ओळखून त्यांना त्या पद्धतीने शिकविले जाते. प्राथमिक इयत्ता ते आठवीपर्यंत ‘हॅपीनेस करीक्यूलम’ प्रोग्राम आणि नववी ते बारावी ‘एँटरप्रेन्युशिप माईंडसेट’ असे प्रशिक्षण दिले जाते, असल्याचीही माहिती श्री सिसोदिया यांनी दिली. हॅपीनेस करीक्यूलम अंतर्गत विद्यार्थ्यांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन अधिकाधिक सकारात्मक केला जातो. यामध्ये रोज ध्यान साधना, माईंडफुलनेस असे उपक्रम राबविले जातात.
एँटरप्रेन्युरशिप माईंडसेट या उपक्रमामध्ये इयत्ता 9 वी ते 12 वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा कल ओळखून त्यांच्यात असलेल्या उद्योजकाला प्रोत्साहन देण्याचे काम सध्या सुरू असल्याचे श्री सिसोदिया यांनी सांगितले. यातंर्गत शाळेकडून प्रत्येक विद्यार्थ्यांला एक हजार रूपयांचे भांडवल दिले जाते. गृहसज्जा, शिवनकाम, चित्रकला, इलेक्ट्रीकल काम, खत बनविणे, आदि व्यवसाय कसा करावा यासाठी विद्यार्थ्यांचे समूह नेमले आहेत. समूहातील विद्यार्थी वस्तू तयार करण्यापासून ते ती विकण्याच्या प्रक्रियेमध्ये विविध भुमिका निभावतात. यामुळे त्यांच्या कल्पनाशक्तीला तसेच आत्मविश्वास वाढीला अधिक वाव मिळत असल्याचेही दिसत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
शाळेतील पायाभूत सुविधांकडे विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असल्याचेही सांगत श्री सिसोदिया, म्हणाले, कुठल्याही खाजगी शाळेत असणा-या सर्व सोयी-सुविधा सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांनाही मिळाव्यात याकडे विशेष लक्ष केंद्रित करण्यात येते. या कोविडच्या काळात खाजगी शाळेतील 2 लाख 70 हजार विद्यार्थी हे सरकारी शाळेकडे वळले असल्याचीही ही श्री सिसोदिया महत्व त्यांनी अधोरेखित केली.
No comments:
Post a Comment