दौरे,पंचनाम्यांंचा फार्स नको,बाधितांना तत्काळ मदत करा ; किसान सभेचे राज्यकार्याध्यक्ष - अर्जुन आडे यांची मागणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 3 October 2021

दौरे,पंचनाम्यांंचा फार्स नको,बाधितांना तत्काळ मदत करा ; किसान सभेचे राज्यकार्याध्यक्ष - अर्जुन आडे यांची मागणी


किनवट, दि. : अतिवृष्टीमुळे मराठवाडा, विदर्भासह राज्यातील १२ लाख हेक्टरवरील खरीप पिके नष्ट झाली आहेत.मराठवाडा व विदर्भातील ओढे,नदी-नाल्यांना पूर आल्याने  काठालगतची शेती संपूर्णपणे वाहून गेली आहे. हंगामातील हातातोंडाशी आलेले सोयाबीन, कापूस व इतर पिके  संपूर्णपणे नष्ट झाली आहेत.त्यामुळे दौरे,पंचनामे याचा फार्स न करता शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी,अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेचे महाराष्ट्र राज्य शाखेचे कार्याध्यक्ष अर्जुन आडे यांनी केली आहे.

   गुलाब चक्रीवादळ महाराष्ट्रातून गुजरात राज्यात पोहचले असले तरी अरबी समुद्रात चक्रीवादळाची निर्मिती नव्याने होण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. अरबी समुद्रात जोरदार वा-यासह उंच लाटा उठण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.झालेले नुकसान व हवामान खात्याने वर्तवलेले आगामी संकटाचे अंदाज पहाताना राज्य व केंद्र सरकारने शेतकरी व आपदग्रस्तांना तातडीने सहाय्य करण्याची व आगामी संकटापासून बचावासाठी सावध करण्याची नितांत आवश्यकता आहे. आपत्तीच्या अशा भीषण कालावधीमध्ये राजकीय पहाणीचे दौरे व पंचनामे यांचा फार्स न करता राजकारण बाजुला ठेवत केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी,अशी मागणी किसान सभा करत आहे.

  केंद्र व राज्य सरकारने मिळून तातडीची प्राथमिक मदत म्हणून प्रतिहेक्टर ५० हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावेत व त्यानंतर पीक व शेतजमीन नुकसानीचा योग्य अंदाज घेत शेतकऱ्यांचे उर्वरित संपूर्ण नुकसान भरून निघणारी ठोस मदत करावी.

  पीकविमा योजनेअंतर्गत आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत आपत्तीची सूचना देणे बंधनकारक आहे. क्रषी ल महसूल विभागाने शेतकऱ्यांना सर्व ते सहकार्य करावे. विमा कंपन्यांनी आपली कार्यालये व हेल्पलाईन २४ तास सुरू राहतील ,अशी व्यवस्था करावी. रेंज अभावी शेतकऱ्यांना आपत्तीची ऑनलाईन सूचना देण्यात अडथळे येत असल्याने ऑफलाईन सूचना स्विकारण्याची सुद्धा संपूर्ण व्यवस्था महसूल विभाग, क्रषी  विभाग व पीकविमा कंपन्यांनी करावी,अशी मागणी ही अर्जुन आडे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Pages