किनवट : यंदाच्या खरीप हंगामातील सततचा पाऊस,अतिवृष्टी आणि रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी पूर्णत: नागवल्या गेला आहे. सोयाबीनचे पीक कोंब फुटल्याने हातचे गेले आहे. कपाशीचीही बोंडसड झाल्याने उतारा प्रचंड घटला आहे. तालुका ओल्या दुष्काळाच्या छायेत असतांना महसूल विभागाकडून नुकसानीचा आढावा घेण्याकरिता प्रारंभी काढण्यात आलेली नजरअंदाज पैसेेवारी ५३ टक्के आल्याने शेतकर्यांमध्ये प्रशासनाविषयी प्रचंड रोष तयार झाला होता. मात्र, त्यावेळी तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांनी ही नजरअंदाज पैसेवारीत सुधारणेला वाव आहे.तालुक्यात बर्याच वेळा अतिवृष्टी होऊन प्रचंड नुकसान झाल्यामुळे, अंतिम पैसेवारी निश्चितच कमी येईल, असे सूचक आणि दिलासादायक वक्तव्य केले होते. दरम्यान, नुकतीच सुधारीत पैसेवारी काढण्यात आली आहे.सुदैवाने किनवट तालुक्याची पैसेेवारी ५० पैशाच्या आत अर्थात ४६.७७ टक्के आल्यामुळे शेतकरी सुखावला आहे.त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
महसूल विभागाच्या नोंदीनुसार किनवट तालुक्यातील खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र ८० हजार ७९३ हेक्टर आहे. प्रत्यक्षात विविध पिकांची पेरणी झालेले क्षेत्र ७७ हजार ८४१ हेक्टर आहे. कृषी विभागाच्या खरीप पेरणी अंतीम अहवालानुसार यंदा नगदी पिकांमध्ये ४१ हजार ५६४ हेक्टरवर कापसाची तर २५ हजार ८५२ हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली होती. पावसाळ्यात तालुक्यातील विविध मंडळात तब्बल आठ वेळा झालेली अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे तालुक्यातील ६० हजार ३२१ शेतकर्यांच्या उपरोक्त क्षेत्रातील कापूस व सोयाबीनचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेले आहे. परिणामी सवंगणी व मळणीचा खर्चही भरून निघणार नसल्याने, बहुतांश शेतकर्यांनी सोयाबीनच्या क्षेत्रावर रोटावेटर फिरविले. तसेच संततधार पावसामुळे कापसाची बोंडे काळी पडून सडल्या गेली. सध्या उर्वरीत कापसावरही बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने, शेतकरी तेही उपटून काढत आहेत.
खरीप हंगामाच्या उत्पादनाचे प्राथमिक चित्र स्पष्ट करणारी किनवट तालुक्यातील १९१ गावांमधील नजरअंदाज पैसेवारी ३० सप्टेंबर रोजी ५३.८६ पैसे दाखविण्यात आली होती. ५० पैशाच्या आत जर पैसेेवारी आली तरच परिस्थितीनुसार ओला किंवा कोरडा दुष्काळ जाहीर करून शासन मदत करीत असते. त्यामुळे तालुक्यातील शेतकर्यांचा अपेक्षाभंग झाला होता. मात्र, महिनाभरानंतर तालुक्यातील नऊ मंडळातील निवडक सज्जांमध्ये उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्या मार्गदर्शनात हलक्या,मध्यम व भारी जमीनीच्या शेतात प्रत्येकी तीन पीक कापणी प्रयोग करून ही सुधारीत पैसेवारी गाव पैसेवारी समितीच्या सहकार्याने काढली आहे. या पार्श्वभूमीवर ३१ ऑक्टोबर रविवारची सुट्टी असल्यामुळे १ नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या सुधारीत पैसेवारीमध्ये तालुक्यातील नऊ मंडळातील पैसेेवारी ही ५० पैशापेक्षा कमी अर्थात ४६.७७ आल्यामुळे, नुकसानग्रस्त शेतकर्यांमध्ये आल्हाददायक वातावरण निर्माण झाले आहे. ३१ डिसेंबरला अंतीम पैसेवारी जाहीर झाल्यानंतरच खरीपाच्या तालुक्यातील एकंदर स्थितीचे चित्र स्पष्ट होणार असले तरी या सुधारीत पैसेेवारीत ओल्या दुष्काळाचे किंचीत दर्शन झाले असल्यामुळे, शेतकर्यांमध्ये शासकीय मदतीची आशा निर्माण झालेली आहे.
No comments:
Post a Comment