हे शेत वामनाचे - इंद्रजित भालेराव - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday, 5 November 2021

हे शेत वामनाचे - इंद्रजित भालेराव


महारुद्र मंगनाळे यांच्या शिरूरताजबंद मधील शिवारात असलेल्या रुद्रा हटला जाताना राणीसावरगावच्या अलीकडे खंडाळीच्या शिवारात असलेल्या वामनदादांच्या स्मृतिस्थळाजवळ थांबलो,तेव्हाची ही काही छायाचित्रे.या रस्त्याने जाताना वामनदादा कर्डक या महान लोककवीच्या स्मृती स्थळावर माथा नमवल्याशिवाय मी कधीच पुढे जात नाही.परवा आसाराम लोमटे आणि अरुण चव्हाळ हे माझे दोन विद्यार्थी मित्रही सोबत होते. 

मी प्रथम हे स्मृतिस्थळ पाहिलं तेव्हाची गोष्ट.गंगाखेडहुन राणीसावरगाव मार्गे अहमदपूरला चाललो होतो.सगळा दुष्काळी डोंगरपट्टा.मधेच ओयासिस सारखा एक हिरवागार मळा रस्त्याला लागूनच दिसला.ड्रायव्हरला गाडी उभी करायला सांगितली.डोळ्यासमोर पाटी दिसली 'जेतवन'. माझी उत्सुकता ताणली म्हणून आणखी पुढे गेलो तर एक समाधीसारखी जागा दिसली.तिथे गेल्यावर कळलं की हे लोक कवी वामनदादा कर्डक यांचं स्मृतिस्थळ आहे.वामनदादा तर नाशिकचे मग त्यांचं स्मृतिस्थळ इथं कसं काय ? कुणी हौशी आणि कल्पक माणसानं इथं वामनदादा यांचं स्मृतिस्थळ बांधून सभोवती हिरवागार मळा फुलविला ? 


नंतर समजले ते असे की खंडाळीच्या शिवारात असलेली ही आठ दहा एकर शेतजमीन गंगाखेडच्या आनंद पेट्रोलपंपाचे मालक विलास जंगले यांची आहे.ते वामनदादांचे चाहते.वामनदादांच्या शेवटच्या दिवसात विलास जंगले यांनी वामन दादांना सांभाळलं.तसे वामनदादा म्हणजे गाडगेबाबां सारखे पायाला भिंगरी लावून सतत भटकत राहणारे.पण शेवटच्या काळात कधी महिना-पंधरा दिवस आजारानिमित्त त्यांना कुठं थांबावं वाटलं तर जंगले आनंदानं त्यांना ठेवून घेत आणि त्यांची सेवा करत.त्याच आपुलकी पोटी जन्मभूमी नाशिक पासून पाचशे किलोमीटर दूर वामनदादांचं हे स्मृतिस्थळ जंगले यांनी इथं उभं केलं. 


वामनदादांची गाणी लहानपणापासून कानी पडलेली,आवडलेली.दलित कवितेत फारसा न डोकवणारं शेतशिवार आणि मळा वामनदादांच्या कवितेत मात्र सतत डोकवताना दिसतो.कधी प्रतिमा,प्रतीक म्हणून तर कधी प्रत्यक्ष विषय म्हणून.मला वामनदादांच्या एकेक ओळी आठवू लागल्या. 


मळा मी राखी ते माझा मळा मी राखीते 


भरदार गहू हरभरा,हुरड्यावर येता जरा

चवी मी चाखिते,माझा मळा मी राखीते 


धनी वामनचा मैतर,तो वामन आला तर

चव्हाळ टाकिते,माझा मळा मी राखीते 


वामनदादाला स्वतःची जमीन जुमला किंवा मूलबाळ नव्हते.त्यांनी सर्व माणसं आपली मानली आणि महाराष्ट्राची सगळी भूमीही आपली मानली.म्हणूनच वरच्या गाण्यातली मळ्याची मालकीण म्हणते की माझा धनी वामनदादांचा मित्र आहे.त्यामुळे वामनदादा आमच्या मळ्यात नेहमी येतात.ते आले म्हणजे मी त्यांना फाटक्या पोत्यापासून बनवलेलं चव्हाळ बसायला टाकते. 


वामनदादा नाशिकचे.नाशिक हा मळ्यांचा भाग.तिकडं असलेले समृद्ध मळे दादांनी लहानपणापासून पाहिलेले असणार.पण विरोधाभास असा की नाशिकच्या समृद्ध मळेवाल्यांनी काही वामनदादांची समाधी बांधली नाही.उलट मराठवाड्यातल्या डोंगराळ भागात वामनदादांच्या नावाने एकाने छान मळा फुलविला. 


पेर भिमाचा लळा शिवारि पेर भिमाचा लळा रे

पेर भिमाचा लळा पिकू दे माणुसकीचा मळा रे 


रानमाळावरची फुलं,आज कोटी कोटी मुलं

झुरून जळती,तरी न टळती क्रूर उन्हाच्या झळा रे 


मेघ हो रे जा रे नभी दाव मानवतेची छबि

तिथेच नयनी आणून पाणी ओघळु दे घळ घळा रे 


आधी म्हटल्याप्रमाणे इथला मळा प्रतिमा म्हणून आलेला आहे.भिमाचा म्हणजे आंबेडकरी विचारांचा लळा पेरून वामन दादांना माणुसकीचा मळा फुलवायचा होता.क्रूर उन्हाच्या झळांनी झुरून मरणारी रानामाळातली कोटी कोटी माणसं पाहून वामन दादांना वाटतं आपणच आभाळात जाऊन डोळ्यातील अश्रूंचा घळघळा पाऊस पडावा आणि माणुसकीचा मळा फुलवावा. 


जसा तुझा गोड गळा फुलवी रानमळा

तसा मला लाव लळा तसा मला लाव लळा 


जसा का शेतकरी,वेळेला मोट धरी

तान्हेली शेतसरी,मोटेचा घोट करी 


नव्या नवतीची कळा पाटकरी खळाखळा

तसा तुझा लाव लळा तसा तुझा लाव लळा 


माणसाने माणसाला लळा लावावा आणि रानमळा फुलवावा ही वामनदादांची आस होती.वामनदादा सतत या गावाहून त्या गावी जात.पूर्वी पायीच फिरावे लागे.तेव्हा रस्त्यात मळे असणारच.मळ्यात काम करणारे दलित मजूर हाच प्रामुख्याने वामनदादांचा श्रोता होता.त्यांच्या भावविश्वाचा आधार घेऊनच आंबेडकरी विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवणे योग्य,हे वामन दादांनी ओळखले होते.म्हणून सतत त्यांच्या गाण्यात हे मळ्यातले भावविश्व प्रकटत राहते. 


नवतीची नवी टवटवी

कोवळ्या कणसाची चवी

चाखु बसून बांधावरी

ज्वारी आली ग हुरड्यावरी 


ओढ्याच्या काठी भली

पाहून गार सावली

खाऊ दुपारची भाकरी,

ज्वारी आली ग हुरड्यावरी 


चैत्राला मळणी करू

रोज गाडी गाडी भरू

आणू चंदी चारा घरी

ज्वारी आली ग हूरड्यावरी 


ज्या माणसानं मळ्यावर येवढं प्रेम केलं त्या माणसाचं स्मृतिस्थळ एक मळाच असावा हा मोठाच काव्यात्मक न्याय वामनदादांच्या वाट्याला आला.विलास जंगले यांच्यासारख्या वामनदादांच्या मानसपुत्रांनं आपल्या मानसपित्याला हा खासा न्याय दिला आहे.त्यामुळे ते अभिनंदनास पात्र आहेत. 


आता केंव्हाही या रस्त्याने जाताना मी जेतवनात थांबून वामन दादांना अभिवादन केल्याशिवाय पुढे जात नाही. 


अलिकडे मला असेही समजले की वामनदादांच्या स्मृतिदिनी इथे मोठा जनसमुदाय गोळा होतो.या परिसराला जत्रेचे स्वरूप येते.महाराष्ट्रातून जमा झालेले गायक वामनदादाची गाणी गाऊन त्यांना अभिवादन करतात.रात्र जागून काढतात.एखाद्या लोक कवीच्या स्मृतिदिन अशा प्रकारे साजरा व्हावा यासारखी आनंदाची गोष्ट नाही.वामन दादांनी आपल्या एका हिंदी कवितेत लिहून ठेवले होते की, 


भटकता रहे मगर

देश मे ही वामन की

कही पर भी बने लेकिन

एक छोटीसी मजार बने 


एखाद्या कवीची अंतिम इच्छा इतक्या चांगल्या प्रकारे फलद्रूप व्हावी ही मोठी भाग्याची गोष्ट आहे.कवी कलावंतांना हेवा वाटावा अशीच ही घटना आहे.वामनदादांच्या स्मृती जपणारा हा मळा भाग्यवानच म्हणावे लागेल. 


परवा गेलो तेव्हा या स्मारकाचे काही संगमरवर निखळलेले दिसले.मला विलास दादा जंगले यांना सूचना करावीशी वाटते की त्यांनी आता याची डागडुजी करावी.यावर्षी वामनदादांची जन्मशताब्दी सुरू आहे त्या निमित्ताने या स्मृती स्थळाला काही नवी झळाळी देता येते का तेही पहावे.

   - इंद्रजित भालेराव

No comments:

Post a Comment

Pages