जय भीम चित्रपट ; इथल्या जातव्यवस्थेला आंबेडकर पुरून उरतो आणि कायम अन्यायाप्रति उभा असतो - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 5 November 2021

जय भीम चित्रपट ; इथल्या जातव्यवस्थेला आंबेडकर पुरून उरतो आणि कायम अन्यायाप्रति उभा असतो

 


एखादा चित्रपट फक्त त्याच नाव बघून काही लोकांनी तोंड मुरडलं पण जागतिक पातळीवर लोकांकडून त्या चित्रपटाला प्रचंड प्रेम आणि कौतुकाचा वर्षांव होतोय असा सुपर डुपर हिट चित्रपट म्हणजे 'जय भीम' !! मुळात ज्यांना आंबेडकरी विचार समजत आहेत किंवा जे त्या मार्गावर चालत आहेत त्यांना या चित्रपटाच महत्व नक्कीच समजलं असेल आणि ज्यांना आंबेडकर का महत्वाचे आहेत हे आमचं म्हणणं पटत नसेल त्यांनी तर हा चित्रपट नक्की पहावा.


हजारो वर्षांपासून ज्यांनी देश घडवला जे इथले स्थानिक आहेत, मूलनिवासी आहेत त्या आमच्या आदिवासी बांधवांना अजून इथल्या वर्ग आणि धर्मसत्ताक मंडळींनी स्वतःचे ओळखपत्र देखील दिले नाही ज्यांचा फोटो देखील त्यांच्याकडे नाही अशा लोकांनवर फक्त त्यांची जात ही खालची आहे म्हणून हवं तसं, हव्या तश्या केसेस लावून अन्याय केला जातोय. चित्रपटाच्या सुरुवातीलाच जातीयतेच ते भयाण दृश्य दिसते जेव्हा कॉन्स्टेबल म्हणतात की 'इन्का गुन्हा क्या है ?' आणि उत्तर येते, 'ये पैदा हुये यही इन्का गुन्हा हैं ।'


१९९३ मध्ये घडलेल्या ' राजकन्नू ' ह्या आदिवासी प्रामाणिक होतकरू तरुणाची पोलीस कस्टडीत अमानवी छळ करून हत्या करण्यात आली त्या सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे आणि चेन्नई हायकोर्टात दीर्घकाळ चाललेला प्रसिद्ध ऐतिहासिक खटला म्हणून ह्या खटल्याची नोंद आहे . अडव्होकेट के.चंद्रु ह्यांनी रुपयाही फी न घेता लढलेले निर्दोष गरिबांचे मानवाधिकाराचे जे खटले आहेत त्यातील हा एक विशेष खटला. मुख्य प्रवाहाने युगायुगांपासून बहिष्कृत केलेल्या,गावकुसाबाहेर फेकलेल्या समूहातील माणसासाठी आणि इथल्या उच्चपदस्थासाठी देखील कायदा सारखाच आहे हे हा चित्रपट जोरकसपणे अधोरेखित करतो.


शेतात उंदर पकडतांना त्यांनी घेतली मेहनत कारण सावकाराच्या शेतात नुकसान होऊ नये पण तरी सावकार म्हणतो की, 'यांना इथं येऊ दिलं हीच मोठी चूक आहे.' राजकन्नू च अशिक्षित असून ही कोडी सांगणं इथं आमच्या पूर्वजांची आठवण करून देतात की ते अशिक्षित जरी असले तरी कमालीची बुद्धी होती त्यांना. राजकन्नू व सेंगिनी यांचा रोमान्स सिन आणि त्यात हलक्या पावसात सुद्धा त्यांचं घर पडणं ही वस्तुस्थिती आहे जी अनेक भागांमध्ये तशीच आहे. तरी सुद्धा स्वाभिमान आणि फक्त कष्ट यांच्या जोरावर सेंगिनी ला पक्क घर बांधून देण्याचं वचन देणं हे एक सच्चा माणूस म्हणून राजकन्नू दिसून येतो.


सावकाराच्या घरात साप येणं, त्याला पकडणं, पण त्या कामाचा मोबदला न घेता सापाचा महत्व पटवून देऊन

'मला पैसे नकोत हे तर माझं काम आहे असं राजकन्नूच म्हणतो' येथे ज्यांना शेती आणि संस्कृती यातलं कळत नाही ते आपल्यावर राज्य करीत आहेत हे अधोरेखित होतं. तरी सावकाराची बायको त्याला तुच्छ लेखते ही भयाण जातीयता इथं दाखवली आहे.


सूर्या (नायक) याच्या आजूबाजूला सुरुवातीला मार्क्स, पेरियार आणि आंबेडकर यांच्या भिंतीवरील प्रतिमांमधून तो कोणत्या विचारधारेचा असेल हे दिसून येते त्याच बरोबर जर लक्ष दिले तर बुद्धांची मूर्ती ज्यात बुद्ध हे ज्ञान मिळवण्यासाठी अधिष्ठान अवस्थेत अगदी देहाचा सांगाडा होई पर्यंत ध्यानस्थ होते तीच दाखवली आहे. त्याला ही विशेष महत्व आहे.  (मार्क्स हा विचार आहे त्यामुळे तो कोणीच नाकारत नाही मी तर मुळीच नाही मार्क्स आमचा शत्रू नाहीच पण बुद्ध की मार्क्स हा प्रश्न येतो तेव्हा आम्ही बुद्ध स्वीकारतो) पेरियार यांच्या बद्दल वेगळं बोलायला नको. तामिळ लोकांमध्ये हे तिन्ही महापुरुष महत्वाचे आहेत पण चित्रपटात आंदोलन, मोर्चे, रॅली आहे. हे सगळं आंबेडकरांनी दिल आहे. न्याय हक्कासाठी कितीही मोठा अन्याय झाला असला तरी संविधानिक मार्गाने जाणेच योग्य आहे हेच दाखवलं गेलं आहे.


सूर्या शाळेतील गॅदरिंग मध्ये म्हणतो, 'इथं गांधी नेहरू सारखे महान नेते आहेत पण आंबेडकर कुठं दिसत नाहीत आणि स्मित हास्य करतो' हा सिन महत्वाचा आहे. कारण प्रत्येक शाळेत जेवढ्या जोशात मुलांना इतर महान नेते सांगितले जातात तेवढे आंबेडकर फक्त पुस्तकात दिलेत म्हणून शिकवले जातात. पण आंबेडकर हे जर प्रत्येकाच्या मनात वसले तर या भारताचं चित्र वेगळं असेल.


हा चित्रपट आदिवासी भागांतील घडलेल्या सत्य घटनेवर आधारित असला तरी प्रत्येक फ्रेम मध्ये दाखवलेला प्रसंग ही आदिवासी व तमाम दलितांची वस्तुस्थिती आहे ज्यावर कोणी काहीच बोलत नाही. सेंगिनीचा संघर्ष कमालीचा आहे. तिच्याकडे नीट पाहिला तर तिथे आंबेडकर दिसून येईल.

तिचा स्वाभिमान, लाचार न होणं, पती कालबाह्य झाला तरी न्याय हक्कासाठी लढणं, IG ला सुद्धा खड्या आवाजात पैसा नको म्हणून सांगणं. हे सगळं एक सच्चा स्वाभिमानी आंबेडकराईट करू शकतो.


सूर्याची सेंगिनीला मदत करणे आणि कोणताही मोबदला न घेता फक्त अन्यायाला वाचा फोडण्यासाठी उभं राहणं हे प्रत्येक क्षेत्रातील मंडळींनी लक्षात ठेवण्यासारखं आहे बॉलीवूड मधल्या सिंघम, दबंग असल्या चित्रपटांमध्ये दाखवलेले पोलीस आणि वास्तविक पोलीस जे वरिष्ठ अधिकारी आणि राजकारणी यांच्या खाली कसे दबलेले आहे हे खूप चांगल्याप्रकारे दाखवलं आहे.


'जयभीम' हा केवळ शब्द नाही तर तो स्वाभिमानाचा मंत्र आहे,अस्तित्वाची जाणीव देणारे तत्व,विवेक ,सत्य आणि समतेची सर्वात कमी शब्दातील व्याख्या आहे.

'जयभीम' हे युगानुयुगे जातिव्यवस्थेच्या प्राणांतिक छळामुळे मुर्दाड केलेल्या शोषितांसाठी 'प्राणतत्व' आहे. न्यायाचा समानार्थी शब्दच मुळात 'जयभीम' आहे हे इथल्या प्रत्येक नागरिकाने लक्षात घेतले पाहिजे.

चित्रपटात दाखवलेला निर्दोष राजकुन्नूचा रक्ताळलेला देह हे इथल्या इतिहासातले भीषण सत्य आहे ज्ञानसूर्य डॉ.आंबेडकरांच्या एका सहीने केवढा मोठा नाकारलेला समूह 'माणूस' म्हणून जन्मास आला. हे आपण समजून घेतले पाहिजे.


चित्रपटाच्या शेवटी नायक सूर्या आणि सेंगिनी राजकन्नू ची मुलगी दाखवली आहे त्या फ्रेम मध्ये 'स्वतंत्र आणि समानता' प्रखर्षाने दिसुन येते. शेवटी एक वाक्य आहे Jaibhim means light

Jaibhim means love

Jai - bhim means journey

From darkness to light

Jaibhim means tears Of Billions of people ! 


' भारतीय संविधान आणि कायदा यापुढे सर्व समान आहेत , कुणीही शोषक नको वा शोषित नको , सारे समान आहेत याची आठवण ' जयभीम ' आपणास करून देतो.


तामिळ चित्रपट सृष्टी काला, कबाली, पेरियार पेरूमल, असुरण, कर्णन, सरपट्टा आणि आत्ताचा जय भीम यासारख्या चित्रपटातून आंबेडकरी विचार पोहोचवत आहेत. आंबेडकर ही काळाची गरज आहे. ही लोकशाही आणि गणराज्य राज्य टिकवायचे असेल तर आंबेडकर आणि संविधान हे गरजेचे आहे. चित्रपटात कोणतं ही गाणं, अकॅशन सिन किंवा बोल्ड सिन नसले तरी चित्रपट तुम्हाला जागेवरून हलु देत नाही. मराठी मधील फँड्री, सैराट या चित्रपटांतून दाखवलेलं जात वास्तव आता सगळीकडेच दिसू लागलं आहे. बॉलीवूड सुद्धा लवकरच याचा विचार करेल ही खात्री आहे.


जय भीम सगळ्यांनी पहावा आणि आंबेडकरी विचार तसेच कायद्याची ताकद समजून घ्यावी.

जयभीम

- रोहित जगताप

No comments:

Post a Comment

Pages