स्त्रियांच्या सर्वांगिन विकासात डॉ. आंबेडकरांचे अनमोल योगदान : - यशवंत भंडारे, लातूर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 4 December 2021

स्त्रियांच्या सर्वांगिन विकासात डॉ. आंबेडकरांचे अनमोल योगदान : - यशवंत भंडारे, लातूर

      डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे निर्माते आहेत. त्यांनी केवळ अस्पृश्यांसाठी कार्य केले, हा काही लोकांनी त्यांचे काम दुर्लक्षित करण्यासाठी राबवलेला अजंडा आहे. भारताचा सर्वांगिण विकास त्यांच्या सामाजिक विकासांच्या मागील मूळ हेतू आहे. जोपर्यंत देशात सामाजिक विकासाचे चक्र गतीमान होणार नाही, तोपर्यंत देश विकसित होणार नाही. देशातील प्रत्येक नागरिक हा देशाच्या अर्थव्यवस्थेच्या चक्राला गतीमान करणारे साधन आहे. त्याचा वापर केला गेला पाहिजे. मानवी साधन सामग्रीचा वापर सुयोग्य पध्दतीने करावयाचा असेल तर जात आणि धर्माच्या साखळ दंडानी जखडून ठेवलेल्या मानवी साधन सामग्रीला मुक्त केले पाहिजे, धार्मिक-सांस्कृतिक साखळ दंड उद्ध्वस्त केले पाहिजे. कायद्यापुढील समानतेच्या सुत्रांची काटेकोर अंमलबजावणी करुन देशाच्या समृध्दतेला गती दिली गेली पाहिजे. सामाजिक समतेबरोबरच संधीची समानता निर्माण केली पाहिजे. केवळ गुणवत्ता असून चालत नाही, संधीची समानताही आणावी लागेल. असा आग्रह धरुन केवळ नि केवळ देशाचा विचार करणाऱ्या आधुनिक नेत्यांमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर अग्रणी होते. भारत ही महापुरुषांची खाण आहे, असे म्हटले जाते. पण महापुरुषांचे नाव घेताना बाबासाहेबांचे नाव हे सर्व प्रथम घ्यावे लागेल. त्यांना वगळून महापुरुषांचा विचारच संभव नाही. 

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे दृष्टे तत्वज्ञ आणि मानवतावादी विचारवंत होते. ‘‘भारतात जातीय व्यवस्थेमुळे असलेली सामाजिक विषमता, आर्थिक विषमता दूर होत नाही,तोपर्यंत खऱ्या अर्थाने भारताची एकता , एकात्मता आणि अखंडताही अबाधित राहणार नाही,’’ असे डॉ. आंबेडकर यांनी वारंवार सांगितले. भारतीय राज्यघटनेचा सरनामा अर्थात प्रास्ताविकेतील विचार म्हणजे आधुनिक भारतांची ‘ब्लु प्रिंट’ म्हणता येईल. भारताचं खरं स्वरुप कसं असावं यांचा मूल मंत्रच त्यांनी सरनाम्यात दिला आहे. सरनाम्यातील तत्वांचा अंगिकार केला नाही तर भारताची एकात्मता आणि अखंडता तर राहणार नाहीच . त्याचशिवाय भारताची प्रगतीही होणार नाही, असा विश्वास देणाऱ्या या तत्व प्रणालीत आहे. ‘‘भारत हे धर्मनिरपेक्ष , लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र असेल (धर्मनिरपेक्ष शब्दाचा वापर नंतर करण्यात आला आहे, पण तो खूप महत्वाचा आहे.) . तसेच सामाजिक समता, सामाजिक न्याय, बंधुता या उद्दिष्टांसाठी त्यांचा कारभार चालेल. यामधील प्रत्येक शब्द हा भारताच्या राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडतेसाठी प्रतिबंधित आहे. विशेष म्हणजे समता, बंधुता आणि सामाजिक न्याय हे मूल्य देशातील सर्वहरा, वंचित, कष्टकरी, उपेक्षित, अभावग्रस्त, नाडलेले, समता आणि बंधुतेपासून हजारो वर्षापासून वंचित असलेले, परंपरागत कोणत्या ना कोणत्या तरी व्यवस्थेपासून मानवी हक्कापासून वंचित असलेले. यात कामगार, शेतकरी, दलित, आदिवासी, भटके-विमुक्त, स्त्रिया यांच्या सारख्या सर्वच समुहांचा समावेश आहे. अशा सर्व वर्गांना देशाच्या विकासाच्या अग्रस्थानी आणून त्यांना मानवी हक्काच्या कोंदणांनी भारीत करुन समता अधिष्टीत समाज निर्माण करण्याचे कृतीशील तत्वज्ञान त्यांनी राज्यघटनेबरोबरच आयुष्यभर सर्वत्र खंबीरपणे मांडलं. 

आज आपण देशाला ‘महासत्ता’ घडवण्याची स्वप्न पहात आहोत, कारण भारतीय राज्यघटनेतील मूळ मापदंडाच्या मूल्यावर चालण्याचा सातत्यानं प्रयत्न आपण केल्यामुळंच. परंतु आजही आपणास खूप दूरचा प्रवास करावा लागणार आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातील, राज्यघटनेतील मूल्याशी सुसंगत समाज घडवण्यातील त्रुटी दूर करण्याची अजूनही गरज आहे. आजही अशा घटना देशाच्या काणाकोपऱ्यात घडताहेत की त्यामुळे संबंध देशाची मान शरमेने खाली जाते. त्याचबरोबर काही समूहांना घटनात्मक हक्कापासून डावलण्याचे प्रयत्नही काही समाज समूहाकडून केले जात आहेत. कायद्यानं विषमता दूर केली पण मनामनातील विषमतेची जळमटं अजूनही समूळ घालवण्यास काही मंडळी तयार नाहीत. त्यांच्या नागरीकरणाची , प्रबोधनाची नवी वाट चोखाळावी लागणार आहे. 

महिला, दलित आणि आदिवासींना सुरक्षित वाटावं असं वातावरण निर्माण करण्याची गरज आहे. महिलांवरील अत्याचारांची तर परिसिमा दररोज ओलांडली जात आहे. महिलांवर अत्याचार करताना तिची ‘जात’ नि ‘धर्म’ही काही महत्वाचा ठरु नये परंतु काही महाभागांचं डोकं तर याच दृष्टीनं विचार करताना दिसून येतं. अत्याचाराला बळी पडणाऱ्या मानवी आणि घटनात्मक हक्कापासून वंचित राहणाऱ्या महिलांना न्याय मिळवून देण्याची गरज संबंध समाजाची आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील सर्वच जाती-धर्माच्या महिलांकडे माणूस म्हणून पाहिले. त्यांच्या सर्व प्रकारच्या हक्कांचा कायम आग्रह धरला. प्रसंगी धर्मानं नाकारलेले अधिकार महिलांना मिळावेत म्हणून त्यांनी ‘हिंदू कोड बिल’ या सारख्या कायद्याचा आग्रह धरला. प्रसंगी आपल्या कायदा मंत्रिपदाचा या कायद्यासाठी राजीनामा दिला. त्यांच्या या कार्यांची माहिती आज विविध क्षेत्रांत सन्मानाने काम करणाऱ्या महिलांनाही नाही. बाबासाहेबांनीही देशातील महिलांनी याबाबीच नोंद घ्यावी म्हणून हिंदू कोड बिलाचा आग्रह धरला नाही. पण समाजातील काही वर्गातील महिलांच्या मनात डॉ.आंबेडकर यांनी आमच्यासाठी काय केलं ? असा प्रश्न पडतो, ही दु:खाची अन् खेदाची बाब आहे. अशा महिलांनी बाबासाहेबांनी त्यांच्यासाठी केलेल्या कामाची माहिती वाचावी म्हणजे त्यांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर सापडेल. 

बाबासाहेबांनी महिलांच्या प्रगतीचा अनेक अंगानी विचार केला. त्यात महिलांच्या आरोग्याचा विचार करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कुटुंब नियोजनाचा आग्रह धरला. या बाबासाहेब  याबाबत म्हणतात, ‘‘कोणत्याही कारणासाठी का होईना ज्यावेळी एखाद्या स्त्रीची मूल होऊ देण्याची इच्छा नसेल त्या वेळी तिला गर्भधारणा टाळता येण्याची मूभा असली पाहिजे आणि संतती जन्माला घालणे हे सर्वस्वी तिच्या इच्छेवर अवलंबून असले पाहिजे. त्याचबरोबर संतती नियमनाची साधनेही तिच्या आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित असली पाहिजेत.’’ यातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची स्त्रियांबाबत तळमळ, कारुण्य आणि समज दृष्टीपथास येते. 

व्यक्तीचे जीवन दोन प्रकारचे असते एक सार्वजनिक, दुसरे वैयक्तिक. या दोन्ही जीवनात काही समाज मान्यता, परंपरा, धर्म आणि जातीने घालून दिलेली निर्बंध असतात. ही निर्बंध व्यक्तीच्या विकासापेक्षा परंपरा, जात, धर्माच्या संरक्षणासाठीच अधिक राबवले जातात. त्यातून व्यक्तीचा विकास थांबतो. त्यांच्या प्रगतीला खीळ बसते. बाबासाहेब धर्म माणसासाठी असतो, माणूस धर्मासाठी नाही, असे म्हणत असतं. पण आज जगभरात माणसासाठी असलेल्या धर्मानं माणसाचं आयुष्यच सुखकर करण्यापेक्षा अधिक वेदनामय केलं की काय असं वाटावं अशी परिस्थिती आहे. परिणामी समाज आणि देशाच्याही प्रगतीला खिळ बसते आहे. बाबासाहेबांनी हे ओळखून स्त्रियांचे कौटुंबिक आणि व्यक्तिगत जीवन सर्वांगाने स्वतंत्र केले. त्याच बरोबर समाज पातळीवरही तिच्या प्रश्नांची तितक्याच गांभीर्याने सोडवणूक केली. स्त्री म्हणून जिथे जिथे तिचे शोषण होते ते सर्व कालबाह्य नियम, कायदे, प्रथा, परंपरा यांना मूठमाती देण्याचे बळ महिलांच्या अंगी येण्यासाठी जे जे करता येईल ते त्यांनी केले. भारतीय समाज व्यवस्थेत तिचे स्थान अतिशय तळाशी होते. शुद्रा-अतिशुद्र अशी तिची अवस्था होती म्हणून तिच्या शोषणाच्या संधीही अधिक होत्या. तिच्या कामाला, श्रमालाही मूल्य दिले जात नव्हते. त्यामुळे कामाच्या ठिकाणीही तिचे शोषण होत असे, तिला दुय्यम वागणूक दिली जात असे. बाबासाहेबांनी या सगळ्याच क्षेत्रात महिलांना न्याय मिळवून दिला. बाबासाहेबांनी खानीतील महिला कामगारांच्या प्रश्नांची सोडवणूक केली. त्यांच्याच प्रयत्नामुळे ब्रिटिश सरकारमध्ये बाबासाहेब मजूर मंत्री असताना स्त्री-पुरुषांना समान वेतन मिळण्याचा कायदा केला. काम करणाऱ्या महिलांना प्रसुतीपूर्व काळात ठराविक विश्रांती आणि सेवा मिळाली पाहिजे यासाठी कायदे केले. ‘प्रसूतीची रजा’ मंजूर करण्याचाही कायदा केला. 

बाबासाहेबांनी स्त्रियांच्या दास्यांचे आणि तिच्या अवनतीचे मूळ शोधून काढले. जातीची जडणघडण आणि स्त्रियांचे शोषण हे एकमेकांशी पूरक असल्याची सैध्दांतिक मांडणीही त्यांनी केली. विवाहाचा हक्क महिलांना असावा, स्वत:चा जोडीदार निवडण्याचा हक्क महिलांना असावा, घटस्फोटाचा हक्क असावा, विवाहानंतरही आई-वडिलांच्या मिळकतीत स्त्रियांना समान हक्क असावा, स्त्रियांना पोटगी, दत्तक विधान, अज्ञानत्व आणि पालकत्व यांचे अधिकार असावेत यासाठी हिंदू कोड बिलात तरतूद केल्या. या तरतुदीसह नंतर हे हिंदू कोड बिल टप्प्याटप्प्याने भारत सरकारने मंजूर केले. त्यामुळे स्त्रियांच्या हक्कांना कायद्याचं संरक्षण मिळालं. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियांकडे आर्थिक स्वायंत्तता, क्षमता, परिपूर्णता असेल तर ती स्वावलंबी होऊ शकते. स्त्रियांचा आत्मविश्वास वाढतो. आत्मबल वृध्दिंगत होते, त्यातून वर्तमानात जगताना भविष्याचाही साकल्यानं विचार करुन त्या प्रगतीची विविध दालनं पादाक्रांत करु शकतात. आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीमुळे स्त्रियांना स्वत:चा शोध घेता येईल. त्यातून त्या स्वत:च्या विकासाबरोबरच कुटुंबाचा आणि देशाच्या विकासात भर घालतील. या सर्व प्रक्रियेतून परावलंबित्वातून त्या स्वत:ची सुटका करुन घेऊन त्यांच्या आत्मविश्वास वाढेल, आत्मबल वाढेल असाही मानस बाबासाहेबांच्या विचार आणि कृतीत होता. त्यामुळेच देशातील पन्नास टक्के स्त्रियांना सर्व दृष्ट्या सक्षम करण्याचे काम बाबासाहेबांनी केलं आहे, असे आपण आज ठामपणे म्हणू शकतो.  

बाबासाहेबांचा प्रज्ञा, शील आणि करुणा या बुध्दाच्या तत्वज्ञानावर असिम प्रेम होते. ‘नीती’ आणि ‘चारित्र्य’ हे केवळ स्त्रियांचा अलंकार आहेत, असे भारतीय समाजात मानले जात होते. पण बाबासाहेबांनी ‘नीती’ आणि ‘चारित्र्य’ हे अलंकार पुरुषांनाही आवश्यक आहेत, असे ठामपणे सांगितले. केवळ प्रज्ञा असून चालत नाही, प्रज्ञेबरोबरच शिल आणि करुणा स्त्री-पुरषांच्या अंगी नसतील, तर माणूस माणूस राहत नाही. आपण नागरिकरणांची प्रक्रिया उत्तमपणे राबविली नाही. त्यामुळे घटनात्मक मूल्यांपेक्षा आपापल्या जात आणि धर्माच्या परंपरागत प्रथांच्या जोखडात आपण बांधले गेलो आहोत. ‘नीतीमान’ आणि ‘चारित्र्यसंपन्न’ नागरिक आपण घडवू शकलो नाहीत. त्यातूनच ‘स्त्री’ला उपभोग्य वस्तू समजून तिच्या शरीराचे लचके तोडण्याची मानसिकता वाढीस लागली आहे. सार्वजनिक जीवनात नीतीभ्रष्ट, चारित्र्यहिन व्यक्तींना महत्व आणि प्रतिष्ठा प्राप्त होत आहे. म्हणून हैदराबाद मध्ये पशुवैद्यकीय महिला अधिकाऱ्यांवर बलात्कार करण्याची घटना ज्या अमानुषपणे घडते, असे प्रकार घडतच राहणार. असे प्रसंग दर मिनिटाला देशात घडत असतात. असे प्रकार थांबले पाहिजेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय स्त्रियांच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा विविध अंगांनी सक्षमीकरण करण्याच्या कार्यातील अग्रणी महामानव आहेत. एवढेच नव्हे तर स्त्री मुक्तीचे तेच खरे प्रणेते आहेत, असे म्हटले तर वावगे ठरु नये.    

                                                                       - यशवंत भंडारे                                                             उपसंचालक(माहिती)विभागीय माहिती कार्यालय,लातूर मो. 9860612328

******

No comments:

Post a Comment

Pages