ग्रामीण भागाच्या शाळा सुरू ; जोगेश्वरीतील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांमध्ये आनंद कोरोना नियमांचे होते कटाक्षाने पालन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 1 December 2021

ग्रामीण भागाच्या शाळा सुरू ; जोगेश्वरीतील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांमध्ये आनंद कोरोना नियमांचे होते कटाक्षाने पालन

 औरंगाबाद, दिनांक 01  :  कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव आणि प्रसार रोखण्यासाठी शासनाने  शालेय अध्यापन ऑनलाईन केले होते. मात्र, प्रदीर्घ कालावधीनंतर आज औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्राथमिक शाळा कोरोना नियमांचे पालन करत आजपासून सुरू केल्याने चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.

  प्रदीर्घ कालावधीनंतर आज जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जोगेश्वरीच्या (ता. गंगापूर) शाळेची घंटा पुन्हा एकदा वाजली.  सकाळपासूनच इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे चिमुकले शाळेच्या मैदानावर मोठ्या उत्साहाने जमले. मुलांच्या चेहऱ्यावरील शाळा सुरू झाल्याचा आनंद ओसंडून वाहताना दिसला.  शाळा पुन्हा एकदा हर्ष उल्हासाच्या चैतन्याने बहरून आली.            दरम्यान शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत तसेच सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. ग्राम पंचायती मार्फत सर्व वर्ग खोल्यांचे सॅनिटायझेशन करून देण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक श्रीमान यशवंत आवारे, व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीमान काकासाहेब दुबिले तसेच सर्व शिक्षकांनी आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले आणि जास्तीत जास्त संख्येने पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याचे आवाहन केले.

            इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग यापूर्वीच सुरळीत सुरू झालेले आहेत. शाळेत कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून  सामाजिक अंतर राखणे,  मास्कचा वापर, वारंवार साबनाने हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे, एका बाकावर एकच विद्यार्थी, आजारी विद्यार्थ्याचे विलगीकरण इत्यादी मार्गदर्शक सूचनांचे कटाक्षाने पालन करून अध्ययन अध्यापनाचे कार्य सुरू झाल्याचे जोगेश्वरीतील जिल्हा परिषदेच्या शाळेत पहावयास मिळाले.


No comments:

Post a Comment

Pages