संघर्षनायक लोकनेते रामदास आठवले: रिपब्लिकन चळवळीचा झंझावात - हेमंत रणपिसे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 25 December 2021

संघर्षनायक लोकनेते रामदास आठवले: रिपब्लिकन चळवळीचा झंझावात - हेमंत रणपिसे


हर जोर जुल्म की टक्कर मे संघर्ष हमारा नारा है अशी घोषणा देत सुरु केलेल्या भारतीय दलित पँथरने 

“पोटात तुझ्या पेटली आग

उठ दलिता तोफा डाग” अशी हाक देवून सार्‍या महाराष्ट्रातील आंबेडकरी युवकांना ‘पँथर’ बनविणारे लढावू संघटन म्हणजे भारतीय दलित पँथर! सळसळत्या रक्ताच्या तरुण क्रांतिकारी पँथर्सना सोबत घेवून दलितांवर होणार्‍या अन्याय अत्याचारांविरोधात बंड पुकारताना ‘जय भीम के नारे पे खून बहे तो बहने दो’ ची आक्रमक घोषणा देत भारतीय दलित पँथरचे ज्वालाग्रही वादळी आक्रमक नेतृत्व म्हणून पुढे आलेले नाव म्हणजे ‘रामदास आठवले’!

70 च्या दशकात दलित पँथर आणि पुढे भारतीय दलित पँथरच्या वादळी चळवळीत तावून सुलाखून निघालेले नेतृत्व म्हणजे रामदास आठवले. पँथरच्या चपळाईने रामदास आठवले यांनी संपूर्ण देशात भारतीय दलित पँथरच्या छावण्या उभारल्या. रामदास आठवले उत्कृष्ट संघटक असल्यामुळे संपूर्ण देशात त्यांनी संघटन उभे केले. सामाजिक आणि आर्थिक विषमतेने गर्भगळीत झालेल्या गावकुसातील दलिताला स्वाभीमानाचे बळ देवून अन्याय अत्याचाराविरुद्ध लढण्याची हिंमत रामदास आठवले यांच्या पँथर चळवळीने दिली.


भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर या आपल्या प्राणप्रिय मुक्तीदात्याचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्यात यावे या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात नामांतर आंदोलन उभे राहिले. या नामांतर आंदोलनात भारतीय दलित पँथरने स्वत:ला वाहून घेतले. नामांतर आंदोलन हे 16 वर्षे चालले. संपूर्ण जगात मराठवाडा विद्यापीठ आंदोलन ऐतिहासिक आंदोलन ठरले. नामांतर आंदोलनात अनेक भीमसैनिक शहीद झाले. या आंदोलनात जीवाची बाजी लावून पँथर लढले. प्राण तळहातावर घेवून नामांतरासाठी राज्यभर गावागावात लढत फिरणारा अवलिया म्हणजे रामदास आठवले होत. आठवलेंनी मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनात लाठी गोली खायेंगे फिर भी आगे जायेंगे ची घोषणा देत पोलिसांचा लाठी चार्ज खावून प्रसंगी तुरुंगवास भोगला.आंबेडकरी चळवळीत जीवाची बाजी लावून लढत रामदास आठवलें नावाचा संघर्षनायक घडला. आंबेडकरी चळवळीचे भाग्य आहे की रामदास आठवलेंसारखा झुंजार योद्धा या चळवळीचा शिर्षस्थ नेता म्हणून लाभला. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना प्रमाण मानून त्यांनी दिलेल्या सामाजिक आणि आर्थिक समतेच्या उद्दिष्टासाठी हाती निळा झेंडा घेवून अहोरात्र झटणारा लोकनेता म्हणजे रामदास आठवले! संघर्ष का दुसरा नाम रामदास आठवले है !असं त्यांच्या बद्दल म्हंटलं जातं एव्हढा संघर्ष करून तावून सुलाखून निघालेले नेते रामदास आठवले आहेत.


महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष साकार करण्यासाठी रामदास आठवलेंनी आपले सोन्यासारखे प्राणप्रिय संघटन भारतीय दलित पँथर बरखास्त केले. 1990 मध्ये भारतीय दलित पँथर ही संघटना बरखास्त करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे काम रामदास आठवलेंनी सुरु केले. 1990 मध्ये रामदास आठवलेंच्या नेतृत्वातील रिपाइं ने काँग्रेस आय ला पाठिंबा देवून विधानसभा निवडणूक लढली. त्या निवडणुकीत रामदास आठवलेंच्या नेतृत्वामुळे काँग्रेसला आंबेडकरी जनतेचे मतदान मिळाले. त्यामुळे काँग्रेसच्या 35 जागा अधिक जिंकून आल्याची जाहीर कबूली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी दिली. त्यांच्या मंत्रीमंडळात रामदास आठवले हे समाज कल्याण, परिवहन, दारुबंदी आदी चार खात्यांचे कॅबिनेट मंत्री बनले. ते मंत्री बनले त्या दिवशीही आठवले हे वडाळ्याच्या सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये राहात होते. अत्यंत खडतर प्रवास आणि व्यवस्थेशी संघर्ष करणारा आपला ‘पँथर’ महाराष्ट्राचा कॅबिनेट मंत्री झाला याचे संपूर्ण देशात कौतुक झाले. रामदास आठवलेंच्या नावाची तेव्हा संपूर्ण देशात चर्चा झाली. अत्यंत गरीब परिस्थितीत शेतमजूर आईच्या पोटी जन्माला आलेले रामदास आठवले हे अवघे सहा महिन्यांचे असताना त्यांचे पितृछत्र हरपले. महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील कवठेमहंकाळ तालुक्यात त्यांचे ढालेवाडी हे छोटे गाव. येथून जवळ असणार्‍या आगळगावात त्यांचा जन्म झाला. पुढे त्यांचे बालपण मामाच्या गावी सावळज (ता.तासगाव) येथे गेले. प्राथमिक शिक्षण सांगलीत झाले. 


महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते मुंबईत आले. सिद्धार्थ हॉस्टेल वडाळा येथे त्यांनी प्रवेश घेतला. तेथे दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले आणि नामदेव ढसाळ यांच्या संपर्कातून ते दलित पँथरच्या चळवळीत सक्रीय झाले. दलित पँथर ची पुढे त्यांनी भारतीय दलित पँथर करुन संपूर्ण देश पिंजून काढला. मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्याचे प्रारंभापासून नेतृत्व करुन 14 जानेवारी 1994 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामांतर करुन या ऐतिहासिक आंदोलनाला यश मिळवून दिले. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव न दिल्यास मंत्रीपदाचा आपण राजीनामा देवू असा निर्वाणीचा ईशारा ना. रामदास आठवले यांनी दिल्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी नामांतर केले. महाराष्ट्राचे समाज कल्याण मंत्री असताना रामदास आठवले यांनी मराठवाडा विद्यापीठ नामांतराचे केलेले कार्य संस्मरणीय ठरले आहे. नामांतराचे शिल्पकार रामदास आठवले म्हणून राज्यात त्यांचा आजही गौरवाने उल्लेख केला जातो.


महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संपूर्ण देशात वाढविण्याचे रामदास आठवले काम करीत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या दि पिपल्स एज्युकेशन सोसायटी च्या अध्यक्षपदी ना. रामदास आठवले यांची निवड झाली आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ‘वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धीस्ट या आंतरराष्ट्रीय बौद्ध संघटनेचे संस्थापक सदस्य होते. त्या आंतरराष्ट्रीय बौद्ध संघटनेच्या जागतिक उपाध्यक्षपदी रामदास आठवले यांची ‘सेऊल’ येथे निवड करण्यात आली होती. 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दिक्षा घेवून धम्मक्रांती घडविली. तेव्हा मुंबईतसुद्धा  नागपूर मध्ये झाला तसाच मुंबईच्या महालक्ष्मी येथील रेसकोर्स मैदानावर भव्य धम्मदिक्षा सोहळा 16 डिसेंबर 1956 रोजी  आयोजित करण्याचा संकल्प महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता. मात्र त्यापूर्वीच 6 डिसेंबर 1956 रोजी महामानवाचे महापरिनिर्वाण झाले. मुंबईत धम्मदिक्षा सोहळा आयोजित करण्याचे महामानवाचे अधुरे राहिलेले स्वप्न धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षी 2006 साली रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी पूर्ण केले. मुंबईच्या महालक्ष्मी रेसकोर्स मैदानात रामदास आठवलेंच्या पुढाकारातून 2006 साली धम्मदिक्षा सोहळ्याचा सुवर्ण महोत्सव साजरा झाला. त्यात 15 लाखांहून अधिक लोक उपस्थित होते. भटक्या विमुक्त समाजाच्या लोकांनी त्या सोहळ्यास धम्मदिक्षा घेतली होती. धम्मचळवळ  ;  शैक्षणिक चळवळ, सामाजिक चळवळ आणि राजकीय चळवळ या सर्व क्षेत्रात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार प्रमाण मानून त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी अहोरात्र कष्ट करणारे नेते म्हणजे रामदास आठवले आहेत. त्यामुळे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा खरा वारसदार रामदास आठवले ठरले आहेत. मागील 40 वर्षाहून अधिक काळ रामदास आठवले नावाचे निळे वादळ देशभर आंबेडकरी विचारांचा झंझावात होऊन फिरत आहे. या 40 वर्षात लाखो मागासवर्गीय तरुणांना रोजगार मिळवून देणारे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात उभे करणारे, महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात असताना रिक्षाचे परमिट सर्वप्रथम सुरु करुन गरीब तरुणांना रोजगार मिळवून देणारे अनेक दुरगामी परिणाम करणारे चांगले निर्णय रामदास आठवलेंनी घेतले. केवळ राजकीय लढाई हा त्यांचा उद्देश नसून सामाजिक आणि आर्थिक समतेसाठी समाजात नवी आर्थिक क्रांती त्यांना करायची आहे. त्यासाठी मागासवर्गीय तरुणांना स्वयंरोजगार, सहकार, उद्योग या क्षेत्रात येण्याचे ते आवाहन करतात. त्यासाठी त्यांनी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे व्हेंचर कॉपीटल सारख्या अनेक योजना ते राबवित आहेत. नामांतराचे आंदोलन जिंकल्यानंतर ते स्वस्थ बसले नाहीत. दादर चैत्य भूमी च्या लगत असणारी इंदु मिलची जागा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकासाठी हस्तांतरीत झाली पाहिजे यासाठी त्यांनी प्रचंड देशव्यापी आंदोलन उभारले.  संसदेवरही  मोर्चा काढला. महाराष्ट्र राज्यभर न थकता आंदोलन चालविले. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आडमुठे धोरणाला कंटाळून रिपब्लिकन पक्षाने काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर युती तोडण्याचा निर्णय घेतला. शिर्डी लोकसभा मतदारसंघात निळ हवी की गुलाल हवा असा जातीभेदात्मक प्रचार रामदास आठवलेंच्या विरोधात होऊन तेथील तत्कालीन काँग्रेसच्या नेत्यांनी विश्वासघात करुन शिर्डी लोकसभा मतदार संघात सन 2009 रोजी रामदास आठवलेंचा पराभव केला. पण त्या पराभवाने खचून न जाता रामदास आठवले पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे उभे राहिले. त्यांनी रिपब्लिकन डावी लोकशाही समिती (रिडालोस) ही तिसरी आघाडी निर्माण केली. त्या तिसर्‍या आघाडीचे मोठे आव्हान प्रस्थापित पक्षांसमोर उभे राहिले. त्यातून रिपाइं चा राजकीय फायदा झाला नाही. त्यानंतर सन 2011 मध्ये रिपाइं प्रमुख रामदास आठवले आणि शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची 25 जानेवारी 2011 रोजी भेट झाली. त्याभेटीनंतर महाराष्ट्रात नवीन शिवशक्ती भिमशक्ती भाजप महायुतीचे नवे पर्व सुरु झाले. या भेटीमुळे रिपब्लिकन पक्षाची कोंडी फुटली तशीच शिवसेना आणि भाजपची कोंडी फुटली. महाराष्ट्रात या महायुतीला जनतेला भरभरुन प्रतिसाद दिला. रामदास आठवले (ए), उद्धव ठाकरे(टी), दिवंगत गोपीनाथ मुंडे(एम), या तीन नेत्यांचे एटीएम त्याकाळी लोकप्रिय झाले. त्यातून सन 2014 साली रामदास आठवले राज्यसभेवर खासदार म्हणून बिनविरोध निवडून आले. डिसेंबर 2015 मध्ये  रामदास आठवलेंच्या नेतृत्वात जाती तोडो समाज जोडो समता अभियान राबविण्यासाठी भारत भीम यात्रा काढण्यात आली. त्या आधी म्हणजे 90 च्या दशकात आठवलेंनी  संपूर्ण महाराष्ट्रात 

समता मार्च  काढला.त्यानंतर दिवंगत अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असताना संविधान शक्तीमार्च संपूर्ण महाराष्ट्रात काढला होता.  संविधानातील भारत साकारला पाहिजे ; समाजातील जाती धर्म भेदभाव मिटावा; सामाजिक समता नांदावी यासाठी त्यांनी समता मार्च ;संविधान शक्तीमार्च काढले.  अलीकडे जाती तोडो समाज जोडो चा नारा देत काढलेली भारत भीम यात्रा महत्वपूर्ण ठरली आहे!  समाजातील जातीभेद मिटावा यासाठी ते सदैव प्रयत्नशिल राहिले आहेत. महाराष्ट्रात दलित मराठा ऐक्य परिषदांचे त्यांनी आयोजन केले आहे. त्याचबरोबर  अनुसूचित जाती जमाती, ओबीसी, यांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे. ही मागणी  रामदास आठवलेंनी सर्वप्रथम लोकसभेत केली. सवर्णांना आर्थिक निकषांवर आरक्षण देण्यात यावे. ही भूमिका घेवून त्यांनी देशभर सवर्णांच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देवून दलित सवर्ण एकजुटीसाठी प्रयत्न केले आहेत. महाराष्ट्रात शिवशक्ती भीमशक्ती एकजुट करुन दोन समाजातील दरी मिटविण्याचा प्रयत्न केला आहे. रामदास आठवले महाराष्ट्रात 5 वर्षे कॅबिनेट मंत्री राहिले. त्यानंतर सन 1998 मध्ये  धारावी दादर दक्षिण मध्य  मुंबई मतदारसंघातुन लोकसभा खासदार झाले. त्यानंतर 1999 आणि 2004 मध्ये पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार निवडून आले. म्हणजे तीन वेळा लोकसभेत ते खासदार होते.त्यानंतर 2014 साली ते राज्यसभा खासदार म्हणून बिनविरोध निवडून आले. ते लोकसभा खासदार असताना संसदेच्या कामकाजात अधिक वेळ भाग घेणारे; सर्वाधिक उपस्थिती असणारे आणि लोकसभेत सर्वाधिक प्रश्न विचारून चर्चेत सहभागी झालेले उत्कृष्ट  खासदार म्हणून रामदास आठवले यांचा सन 2007 मध्ये सन्मान  करण्यात आला होता. 


 कायम लोकांच्या गर्दीत राहणारा लोकनेता म्हणून रामदास आठवले यांचा जागतिक विक्रम होईल.दिवसरात्र देशभर कोणत्याही शहरात गावात त्यांचा दौरा असुद्या ते सत्तेत असोत की नसोत लोक मात्र कायम रामदास आठवलेंभोवती गर्दी करतात. कार्यकर्त्यांना नावानिशी ओळखणारे; त्यांच्या सुखदुःखात सामील होणारे रामदास आठवले प्रचंड लोकप्रिय ठरले आहेत. त्यांच्या कडे समस्या घेऊन येणारे लोक कोणत्याही जाती धर्माचे असोत की कोणत्याही पक्षाचे असोत की अन्य कोणत्याही रिपब्लिकन गटाचे असो. रामदास आठवले तात्काळ आलेल्या व्यक्तीला भेटतात.त्याचा प्रश्न समजून घेतात. आल्याची अडचण सोडविण्यासाठी  संबंधित ठिकाणी तातडीने फोन लावून स्वतः बोलतात. मार्ग काढतात. संबंधित ठिकाणी पत्र  पाठवितात.त्यामुळे लोकांच्या अडचणी सोडविणे वैक्तिक मदत करणे; तळागाळातील लोकांशी थेट संपर्क साधणे यात रामदास आठवले मातब्बर आहेत. अलीकडे तर सोशल मीडिया आणि मीडियामध्ये कायम त्यांची भाषणे वक्तव्य असतात. सेलिब्रिटी राजकारणी नेता म्हणून रामदास आठवले यांची संपूर्ण देशात एक क्रेझ उभी राहिली आहे. सर्व वयोगटात आणि सर्व गरीब श्रीमंत वर्गात रामदास आठवले यांची प्रतिमा एक सेलिब्रिटी व्यक्तिमत्व झाली आहे. 

आंबेडकरी चळवळीत प्रचंड कष्ट करून त्यांना हे यश लाभले आहे. त्यासाठी रामदास आठवले तहान भूक विसरून जनतेची सेवा करीत असतात. प्रचंड प्रवास करतात. दलित   पँथर च्या काळात एसटी बस ;ट्रेन; मालगाडी ने प्रवास करायचे.  त्यांनी कधी  उसाचे; भाज्यांचे ट्रक ; दुधाचे टँकर या गाड्यांमधून ही खडतर प्रवास केला आहे. मुंबईतील अनेक आंबेडकरी वस्त्यांमध्ये ते चालतच प्रवास करायचे. महाराष्ट्रात ते कोणत्याही जिह्यात ट्रेन ने कार ने बसने कधी ही गेले तर त्या जिल्ह्यात अर्ध्या रात्री असो की पहाटे  लोक मोठया संख्येने रामदास आठवलेंच्या  स्वागतासाठी उभे असतात. आता तर विमान प्रवास वाढला आहे. ते देशात जातील त्या विमानतळावर त्यांचे चाहते  मोठया संख्येने ढोल ताशा वाजवीत बॅनर झळकवीत  स्वागत करतात. अगदी दक्षिणेत बेंगळुरू;  केरळ ; पोंडीचेरी;चेन्नई;कोलकाता; अलीकडे ईशान्य भारतात मणिपूर ; अरुणाचल प्रदेश आणि आसाम मध्ये  तेथील परंपरेनुसार रामदास आठवलेंचे झालेले स्वागत खूपच आकर्षक ठरले आहे. त्यामुळे लोकांच्या प्रश्नांचा दर्दी नेता म्हणुन रामदास आठवलेंसोबत लोकांची कायम गर्दी असते. दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी लोक मध्यरात्री दीड वाजेपर्यंत  त्यांना भेटण्यासाठी गर्दी करून असतात. मुंबईत त्यांच्या निवासस्थानी दुपारचे जेवण त्यांना संध्याकाळी 6 वाजेपर्यंत करताच येत  नाही.आपल्याला भेटायला आलेल्या प्रत्येक माणसाला भेटल्यानंतरच ते जेवणासाठी जातात. तहान भूक विसरून ते लोकांमध्ये मिसळलेले लोकनेते झाले आहेत. 


एव्हढी लोकांची सेवा ते करीत असल्याच्या फलस्वरूपात  जुलै 2016 साली ते भारत सरकारमध्ये पहिल्यांदा केंद्रीय राज्यमंत्री झाले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर रामदास आठवले हे केंद्रीय मंत्रीमंडळात पोहोचणारे पहिले भीमसैनिक ठरले आहेत. रामदास आठवले यांनी जरी भाजपला राजकीय पाठिंबा देवून युती केली असली तरीही आठवलेंचा आंबेडकरी अजेंडा तसूभरही कमी झाला नाही. त्यांनी वेळोवेळी युती केलेले पक्ष बदलले आहेत. सुुरुवातीला काँग्रेस त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस त्यानंतर शिवसेना आणि आता भाजप चे मित्रपक्ष म्हणून रामदास आठवलेंचा रिपाइं काम करीत आहेत. मित्रपक्ष असले तरी रिपब्लिकन पक्षाचे अस्तित्व स्वतंत्र आहे. निळा झेंडा आणि आंबेडकरी विचारांचे तत्वज्ञान घेवून रामदास आठवलेंच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाची वाटचाल स्वतंत्रपणे सुरु आहे.  सोशल मिडीयात नवीन पिढीतील काही युवक ज्यांना इतिहास माहीत नाही ते लोक रामदास आठवलेंवर टीका करतात. पण कोणी टीका केली म्हणून त्या टीकाकारांना आठवलेसाहेब कधीही परकं मानत नाहीत. त्या टीकाकारांना ते आपलं मानतात.अनेक टीका करणारे आठवलेसाहेबांकडे  त्यांच्या अडचणी घेऊन येतात तेंव्हा विनाविलंब त्यांच्या अडचणी सोडविण्याचा दिलदारपणा आठवले दाखवतात. टीका टीका टीका पचावायची कशी ते माझ्या कडून शिका असे सांगत टीकाकारांना ही आपल्या प्रेमात ओढणारा लोकनेता म्हणजे रामदास आठवले आहेत.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 साली गोवंश हत्या बंदी विधेयक संसदेत मंजूर केले. त्यावेळी सरकारचा मित्र पक्ष असला तरी रामदास आठवलेंच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाने गोवंश हत्या बंदी विधेयकांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडले होते. त्यामुळे रामदास आठवले आणि त्यांच्या रिपब्लिकन पक्षाची बांधिलकी ही सरकार किंवा मित्रपक्षासोबत नसून रिपाइं ची वैचारिक बांधिलकी ही आंबेडकरी तत्वज्ञानाशी कायम आहे. त्यामुळे रामदास आठवलेंच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा देशभर डौलाने फडकत आहे. रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेला 62 वर्षे झाली पण या 6 दशकाच्या काळात कधीही रिपब्लिकन पक्ष ईशान्य भारतात पोहोचू शकला नव्हता. त्या ईशान्य भारतातील आसाम, मणिपूर, नागालँड, अरुणाचलप्रदेश आदी राज्यांत रामदास आठवलेंच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाचे संघटन जोमाने वाढत आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक परिवर्तनाचा विश्वबंधुत्वाचा समतेचा, विचार देशभर पसरविण्याचे अविरत काम रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया करीत आहे. रिपब्लिकन चळवळीचे कर्णधार ठरलेल्या रामदास आठवलेंच्या नेतृत्वात रिपाइं चळवळी चे आम्ही काम करतो याचा आम्हाला अभिमान आहे. 25 डिसेंबर  संघर्षनायक ना. रामदास आठवले यांचा वाढदिवस देशभर संघर्षदिन म्हणून रिपाइं तर्फे साजरा होतो. संघर्ष संयम आणि धैर्याचे महामेरू ठरलेल्या संघर्षनायक रामदास आठवले यांना देशसेवेसाठी  उदंड आयुष्य आणि आरोग्य लाभो ही मनःपूर्वक शुभेच्छा !  जयभीम! 


- हेमंत रणपिसे

No comments:

Post a Comment

Pages