किनवट,दि.31 (प्रतिनिधी) : किनवट व माहूर तालुक्यात राजरोसपणे अवैध मटका, जुगार, गावठी दारू व बंदी असलेल्या गुटख्याच्या विक्रीने कळस गाठला असून, अनेक वेळा पोलिसांतील वरिष्ठांकडे तक्रार करूनही उपाययोजना न केल्यामुळे, अखेर आमदार भीमराव केराम यांनी याविषयी थेट राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे शुक्रवारी (दि.28) तक्रारीचे सविस्तर निवेदन पाठवून दोन्ही तालुक्यात सर्रासपणे चालू असलेल्या अवैध धंद्यांना आळा घालण्याविषयी विनंती केली आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, उपरोल्लेखित सर्व अवैध व्यवसाय किनवट माहूर तालुक्यातील वर्दळीच्या चौकाचौकात उघडपणे बिनदिक्कत सुरू आहेत. स्वत: आ.केराम यांनी याविषयी जिल्हा पोलीस अधीक्षकांची प्रत्यक्ष भेट घेऊन अनेकवेळा सविस्तर माहिती देऊन सदरील अवैध धंदे बंद करण्याची विनंती केली होती. तसेच प्रकृती अस्वास्थ्यामुळे प्रत्यक्ष भेट घेता न आल्यामुळे भ्रमणभाषद्वारे गृहमंत्र्यांनाही यासंदर्भात कार्यवाही करण्याची विनंती केली होती. तसेच कुठलीही भीती न बाळगता खुलेआम मोठ्या प्रमाणावर चालू असलेल्या या अवैध धंद्यांना पोलिसांचे पाठबळ वा मूकसंमती तर नाही ना? अशी शंकाही त्यांनी निवेदनातून व्यक्त केलेली आहे.
बेकायदेशी मटका, जुगार ,गावठी दारू व गुटख्यामुळे आदिवासी बहुल तालुक्यातील सुशिक्षित युवापिढीसह शेतकरी, शेतमजुर व्यसनाधीन झाले असून, शेकडा कुटुंब उध्वस्त झालेली आहेत. अनेक तरुणांचे व्यसनाधीनतेपायी बळी गेलेले आहेत. त्यामुळे जनतेकडून हे सर्व अवैध धंदे बंद करण्याची मागणी होत असल्याने, मी जातीने याविषयी अनेकवेळा प्रयत्न केले आहेत. परंतु, पोलिसांकडून हे धंदे बंद करण्याविषयी सहकार्य मिळत नाही. त्यामुळे याविषयीचे गांभीर्य लक्षात घेऊन आमच्या मतदारसंघातील सर्व बेकायदेशीर व्यवसाय विनाविलंब बंद करण्याविषयी संबंधितांना आदेशित करावे, अशी विनंती गृहमंत्री वळसे पाटील यांना करण्यात आलेली आहे. तसेच याविषयी त्वरीत कार्यवाही न झाल्यास पोलीस प्रशासनासह शासनही हे धंदे बंद करण्यासाठी टाळाटाळ करीत आहे असे गृहीत धरून मला प्रकृती ठीक नसतांनाही लोकशाहीमार्गाने आमरण उपोषण करावे लागेल. दरम्यानच्या काळात मला मानसिक, शारिरीक इजा झाल्यास वा प्राणहानी झाल्यास त्यास आपले शासन व पोलीस प्रशासन जबाबदार राहील,असा इशारा आ.केराम यांनी निवेदनाद्वारे दिलेला आहे.
No comments:
Post a Comment