किनवट तालुक्यात २५ हजार ८७८ हेक्टरवर रब्बीचा पेरा ; सर्वात जास्त पेरणी हरभर्‍याची; नियोजित क्षेत्राच्या ३४१.०६ टक्के - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 9 January 2022

किनवट तालुक्यात २५ हजार ८७८ हेक्टरवर रब्बीचा पेरा ; सर्वात जास्त पेरणी हरभर्‍याची; नियोजित क्षेत्राच्या ३४१.०६ टक्के

किनवट ,९  : यावर्षीच्या रब्बी हंगामात तालुक्यात हरभर्‍याच्या पेरणीने उच्चांक गाठलेला आहे. हरभरा या  कडधान्याच्या मुळांवरील गाठींमुळे वातावरणांतील नत्राचे स्थिरीकरण होऊन जमिनीची सुपीकता वाढत असते. प्रतिकूल  परिस्थितीतही इतर पिकापेक्षा अधिक उत्पन्न देणारे अन् जमिनीची कस वाढविणारे  असल्यामुळेच, हरभरा पेरणीस शेतकरी जास्त पसंती देतात.  तथापि घाटे अळी व तांबेरा रोगाचा  या पिकावर प्रादुर्भाव होऊन बर्‍याच वेळा उत्पादनात घट येत असते. त्यामुळे याच्या व्यवस्थापनाकरिता शेतकरी बंधूंनी एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी शेतकर्‍यांनी मार्गदर्शनाकरिता आपापल्या भागातील कृषी सहाय्यक व मंडळ कृषी अधिकार्‍यांशी संपर्क साधावा,असे आवाहन तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे यांनी केले आहे.

   तालुक्यात रब्बी हंगामीतील पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. खरीपातील नुकसान भरून काढण्यासांठी शेतकर्‍यांकडून तालुक्यातील रब्बीच्या नियोजित सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत अडीच पट पेक्षा जास्त अर्थात २६५.३१ टक्के पेरणी करण्यात आली आहे. यावर्षीदेखील रब्बी हंगामात सर्वाधिक क्षेत्र हे हरभरा या कडधान्याचे असून, त्याची नियोजित क्षेत्राच्या ३४१.०६ टक्के पेरणी झाली आहे. त्याखालोखाल क्षेत्र गव्हाचे आहे. सर्वसाधारण क्षेत्राच्या १७४.९८ टक्के, मक्याची २५९.६५ टक्के तर ज्वारीची १०७.८६ टक्के पेरणी झाल्याची माहिती  तालुका कृषी कार्यालयाने दिली.

   तालुक्यातील रब्बी हंगामातील पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र ९ हजार ७५४ हेक्टर आहे. मात्र, २७ डिसेंबर अखेरपर्यंत तब्बल २५ हजार ८७८ हेक्टर क्षेत्रावर रब्बीच्या विविध पिकांची लागवड करण्यात आली आहे. तालुक्यामध्ये ऑक्टोबर अखेरपर्यंत झालेल्या जोरदार पावसामुळे रब्बीची पेरणी अधिक क्षेत्रावर होण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला. वाढीव क्षेत्राबाबत नियोजन केले होते. यात बियाणे व खताच्या उपलब्धतेबद्दल नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांकडून आलेल्या होत्या. शेतकर्‍यांनी यंदा जमिनीत मोठ्या प्रमाणावर ओलावा असल्यामुळे, हरभर्‍याच्या पेरणीला विशेष प्राधान्य दिले होते. तालुक्यातील हरभरा पिकाचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र ४ हजार ९६६ हेक्टर आहे. मात्र, अंतिम पेरणी होईपर्यंत तब्बल १६ हजार ९३७ हेक्टरवर हरभर्‍याची पेरणी करण्यात आली आहे.

   या सोबतच तृणधान्यामध्ये गव्हाचे रब्बीतील पेरणीक्षेत्र २ हजार ३५८ हेक्टर असताना, ४ हजार १२६ हेक्टरवर गहू पेरण्यात आलेला आहे. मक्याचे पेरणी क्षेत्र केवळ ७४१ हेक्टर आहे. मात्र, यंदा ते वाढून १ हजार ९२४ हेक्टरवर मका पेरला गेला आहे. रब्बी ज्वारीचे पेरणीक्षेत्र १ हजार ६६७ असतांना, त्यात ही वाढ होऊन १ हजार ७९८ हेक्टरवर ज्वारीची लागवड झालेली आहे. तसेच उन्हाळ्यामध्ये गुरांच्या चार्‍यासाठी एकूण १५० हेक्टरवर मका पेरला गेला आहे. या शिवाय रब्बीतील सोयाबीन २ हेक्टर, नगदी पिकांमध्ये केळी ३८ हेक्टर, ऊस ६२ हेक्टर तर कांद्यांची १९ हेक्टरवर लागवड झालेली आहे. तसेच विविध प्रकारच्या भाजीपाल्यांची ४२२ हेक्टरवर, तर कोथिंबीरी (धने)ची ४०० हेक्टर क्षेत्रावर लागवड झालेली आहे.

No comments:

Post a Comment

Pages