अभिजित ने अनेकांचे संसार फुलवले त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहा !- अभिनेत्री छाया कदम - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 16 February 2022

अभिजित ने अनेकांचे संसार फुलवले त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहा !- अभिनेत्री छाया कदम

पुणे: प्रतिनिधी-

"तुम्ही प्रेम करा, तुमच्या मदतीला अभिजीत आहे. मात्र त्याला गरज असल्यास त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहा. कारण तो करत असलेले 'राईट टू लव्ह' चे काम साधे-सोपे नाही. अभिजीत करत असलेले काम बंद पडू द्यायचं नाही". अशा शब्दात मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री छाया कदम यांनी के. अभिजीत आणि टीम करत असलेल्या कामाचे कौतुक केले. व्हॅलेंटाईन डे आणि राईट टू लव्ह च्या ७ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. 


 "गेली ७ वर्षे अनेक अडथळे-अडचणींवर मात करत,अभिजीत आणि टीम ने अनेकांचे संसार फुलवले आहेत. फक्त लग्न न लावता, त्या सोबतीला लागणारी सर्वतोपरी मदत सर्वांनी मिळून केली आहे. गरीब-श्रीमंत असा भेदभाव न करता, लागेल ती मदत अभिजीत ने केली आहे. यामध्ये त्याच्या जीवाला धोकाही निर्माण होऊ शकतो. अशा वेळी तुमच्या सर्वांचा पाठिंबा त्याला हवा आहे". आणि तो तुम्ही नक्की द्याल याची खात्री आहे. राईट टू लव्ह टीम करत असलेल्या कामाला त्यांनी सदिच्छा दिल्या.

 "माणसं जोडण्यासाठी, माणसांवर भरभरून प्रेम करण्यासाठी, त्यांच्या सुख-दुःखात खंबीरपणे उभं राहण्यासाठी हा पुरस्कार आहे. वयाच्या  २७ व्या वर्षी हा पहिला पुरस्कार मला मिळाला. कोणताही पुरस्कार मिळावा म्हणून काही काम करायचं हे कधीच डोक्यात नव्हतं आणि इथून पुढेही नसेल. हा पुरस्कार समाधान, आनंद आणि ऊर्जा देणारा आहे एवढं मात्र नक्की. अशा भावना प्रेमयात्री पुरस्काराने सन्मानित योगेश नंदा यांनी व्यक्त केल्या. तर "प्रेमयात्री पुरस्कारासाठी माझी निवड होईल असे स्वप्नात ही वाटले नाही. आपण करत असलेल्या सामाजिक कार्याची दखल कुठेतरी दूर घेतली जाते, याचं आश्चर्य आहे आणि आनंद ही, यापुढे राईट टू लव्ह टीम चा आजीवन कार्यकर्ता म्हणून काम करेल" अनिकेत कुत्तरमरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

यावेळी कार्यक्रमात आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह केलेल्या १२ जोडप्यांच्या सन्मान छाया कदम यांच्या हस्ते करण्यात आला. त्यापैकी काही जणांनी आपला प्रेम-प्रवास (लव्हस्टोरी) सांगितला. त्यामध्ये अभिजीत आणि राईट टू लव्ह टीम ने कशा प्रकारे मदत केली, याची माहिती दिली. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला वातावरण निर्मितीसाठी वर्ल्ड ऑफ म्युझिक चे प्रा. सतीश ब्राह्मणे आणि गंगा डाके यांनी ९०s मधील हिंदी  रोमँटिक गाणी गात प्रेक्षकांची मनं जिंकली. कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन प्रा. स्वाती कांबळे यांनी तर आभार के अभिजीत यांनी मानले.


No comments:

Post a Comment

Pages