उन्हाचा कडाका वाढल्याने नागरिक हैरान ढगाळ वातावरणामुळे तीव्रतेत होतेय घट - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday, 7 March 2022

उन्हाचा कडाका वाढल्याने नागरिक हैरान ढगाळ वातावरणामुळे तीव्रतेत होतेय घट

 


किनवट  :  सूर्य तळपू लागल्यामुळे उन्हाचा ताप असह्य होऊ लागला आहे. पहाटे थंडी अन् दिवसा कडक उन्हाचा अनुभव किनवटकर घेत आहेत. वातावरणातील बदलाचा फटका वृद्ध व लहान मुलांना सहन करावा लागत असून, सर्दी, ताप, अंगदुखी आदी नेहमीच्या आजारांनी उचल खाल्ल्यामुळे सरकारी व खाजगी दवाखान्यात रुग्णांची गर्दी वाढत आहे.


         ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढून घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. उन्हाळ्याची चाहूल गेल्या चार-पाच दिवसात जास्तच जाणवत असल्यामुळे, घरोघरी झाकून ठेवलेल्या कूलर्सची साफसफाई, दुरुस्तीसाठी नागरिकांची लगबग सुरू झालेली आहे. येत्या दोन दिवसात उन्हाचा चटका वाढणार असल्याचा अनुमान हवामान विभागाने वर्तविला आहे. सध्या दिवस व रात्रीतील तापमानात 10 ते 12 अंशाची तफावत दिसून येत आहे. भर दुपारी पारा सहज 30 अंश पार करीत आहे.  गत दोन-तीन दिवसात सातत्याने शहर व परिसरातील कमाल तापमान 30 ते 32 अंश दरम्यान दाखवीत असून, रात्री  22 ते 20 अंशापर्यंत किमान तापमानाची नोंद होत आहे. उन्हाची दाहकतेनेे पिण्याच्या पाण्याची मागणीही वाढल्यामुळे शहर व गोकुंदा परिसरातील अनेक जारद्वारे शुद्ध पाणी पुरवठा करणार्‍या व्यावसायिकांना अच्छे दिन येत असल्याची चाहूल लागलेली दिसते.


पाणीदार फळांची मागणी वाढली:

उन्हाळ्याची चाहूल लागताच बाजारपेठेत टरबूज,खरबूज,काकडी यासह विविध रसाळ व पाणीदार फळांच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. बाजारपेठेत सर्वच पाणीदार फळांची मोठ्या प्रमाणात आवक वाढली असून, खरेदीसाठी गर्दी होत आहे.


उन्हात जातांना काळजी घ्या :


 उन्हातान्हात  बाहेरून घरी आल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका. कारण त्याचा शरीरावर परिणाम होण्याची शक्यता असते  घराबाहेर पडल्यानंतर उघड्यावर विकले जाणारे पदार्थ खाऊ नका  एसीतून थेट उन्हात जाऊ नका; तर एसीतून बाहेर पडल्यानंतर थोडावेळ सामान्य वातावरणात काही वेळ घालविल्यानंतर घराबाहेर पडा .उन्हाळ्यात शक्यतो सूती कपड्यांचा वापर करा.त्यामुळे शरीर थंड राहण्यास मदत होते. घराबाहेर जातांना डोळ्यावर गॉगल आणि डोक्यावर टोपी अथवा रुमाल वापरा.कारण त्यामुळे उन्हाच्या तीव्र झळांपासून डोळ्यांचे संरक्षण होते.  उन्हाळ्यात भरपेट जेवण करू नका. भुकेपेक्षा थोडं कमी जेवण करा.  उन्हाळ्यात तळलेले आणि भाजलेले पदार्थ खाऊ नका.त्यामुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो.  उन्हाळ्यात शक्यतो शिळे अन्न खाऊ नका.घरातील उरलेलं अन्न फ्रिजमध्ये ठेवा.*दररोज आहारात दही आणि ताकाचा समावेश असावा तसेच लिंबूपाणी व नारळपाणी घ्या. ते उन्हाळ्यात शरीरासाठी फायदेशीर आहे.  टरबूज,खरबूज आणि काकडी ही उन्हाळ्यात सहज उपलब्ध होणारी फळे दररोज खावीत. ही काळजी घेतल्यास हा उन्हाळा तुम्ही चांगला घालवू शकाल.

No comments:

Post a Comment

Pages