नांदेड दि. 24 :- शेतकऱ्यांनी मोठी स्वप्न पहावीत. याचबरोबर शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी स्थापण्यासाठी एकत्र येवून ग्राहकांना शेतमालाच्या विक्रीसाठी स्वतः उद्योजक व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील धान्य महोत्सवाच्या समारोप प्रसंगी केले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सहभागी शेतकरी, महिला बचतगट, शेतकरी उत्पादक कंपनी तसेच कृषी विभाग व आत्माचे अधिकारी व कर्मचारी यांना प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
शेतमालाची मूल्य साखळी निर्माण करून विक्री करावी असे अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी यावेळी सांगितले. या महोत्सवामध्ये 60 वैयक्तीक शेतकरी, 60 महिला व शेतकरी गट व 10 शेतकरी उत्पादक कंपनीने सहभाग नोंदविला. या माध्यमातून शेतकऱ्यांचा शेतमाल थेट विक्री झाला. विक्री झालेल्या शेतमालाची किंमत सुमारे 30 लक्ष रुपये आहे. याशिवाय सुमारे 25 लाख रुपयांच्या शेतमालाची आगाऊ नोंदणी ग्राहकांनी शेतकऱ्यांकडे केली आहे. या महोत्सवामध्ये नैसर्गिक शेती मधील गावरान लसूण, सेंद्रिय गुळ, धर्माबादची गावरान टाळकी ज्वारी, लोहा तालुक्यातील लोकवन गहू, खपली गहू, देगलूरचे लाकडी घाण्यावरील करडई तेल, कामठा तालुका अर्धापूर येथील सेंद्रिय टरबूज, गावरान तीळ, जवस, मोहरी, आळीव व अनेक प्रकारचे पापड, धान्य, हळद पावडर, लाल मिरची पावडर, विविध मसाले, जात्या वरील विविध कडधान्यांच्या डाळी, देशी गायीचे तूप, आवळा व उसाचा रस आधी शेतमालाला अधिक मागणी होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकल्प उपसंचालक आत्मा श्रीमती माधुरी सोनवणे यांनी केले. या कार्यक्रमासाठी सर्व उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व त्यांचे सर्व कर्मचारी , बीटीएम, एटीएम व हरी बिराजदार यांनी विशेष मेहनत घेतली.
No comments:
Post a Comment