नाटकासाठी आशय विषय महत्वाचे की तंत्रज्ञान ? - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 4 March 2022

नाटकासाठी आशय विषय महत्वाचे की तंत्रज्ञान ?



महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेने अनेक दिग्गज नाटककार , अभिनेते , दिग्दर्शक, तंत्रज्ञ भारतीय रंगभूमीला आणि चित्रपट श्रुष्टीला दिले आहेत. एकांकिका स्पर्धेचे योगदान ही तितकेच महत्वाचे आहे. या स्पर्धांच्या निमित्ताने अनेक चकोरीबाह्य विषयांना हाताळले जाते. नवेनवे प्रयोग केले जातात.
 महाराष्ट्राची व्यावसाईक रंगभूमी मात्र विनोदी नाटकांच्या आवर्तनात सापडली आहे, दोन घटकेची करमणूक यापलीकडे तिची फारशी मजल जात नाही. अर्थात काही दर्जेदार  विचार प्रवर्तक नाटकेही रंगभूमीवर साकार होत असतात. पण ते प्रमाण अल्प आहे.

जागतिक रंगभूमीचा विचार करता जगातील श्रेष्ठ समजले जाणारे  ईब्सेन, शेक्सपियर या सारखे नाटककर लक्षात राहतात ते त्यांचे नाटकाचे समृद्ध आशय, विषय व अतिशय सशक्तपणे उभी केलेली  व्यक्तिचित्रणे यामुळे. म्हणून जग आजही त्यांच्या प्रेमात आहे. त्यांची नाटके जगातील वेगवेगळ्या देशातील रंगकर्मी अतिशय गंभीर पणे करित असतात. त्यांच्या नाटकावर वेगवेगळे प्रयोग केले जातात.

 जागतिक समीक्षक, विचारवंत हे तर म्हणतात की नाटककार, दिग्दर्शक, अभिनेता, हे फिलोसॉफार असायला हवेत. तात्पर्य कोणतीही कलाकृती लिहिणारा नाटककार हा विचारवंत तर असलाच पाहिजे पण नट आणि दिग्दर्शक ही विचारवंत हवा तेव्हाच चांगली कलाकृती निर्माण होते.

भारतातील/महाराष्ट्रातील मोठे नाटकाकर म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो ते बादल सरकार, गिरीश कर्नाड, मोहन राकेश, विजय तेंडुलकर, प्रेमानंद गज्वी, गो.पू. देशपांडे, महेश  एलकूंचवार , सतिश आळेकर व इतर  सर्व नाटककार नवनवे आशय विषय आपल्या नाटकातून प्रभावी पणे तर मांडतातच पण त्याचा खोलवर जाऊन अभ्यास करतात. त्यांची मांडणी वरवरची नसते तर खोलवर केलेले ते एक प्रकारचे संशोधन असते. 

सत्यदेव दुबे हे भारतातीतल एक महत्वाचे स्कॉलर रंगकर्मी म्हणून प्रसिद्ध आहेत. मराठी रंगभूमीसाठी त्यांनी महत्वाचे योगदान दिले आहे. त्यांच्या नाट्य लेखन कार्यशाळेतून दिग्गज नाटककार निर्माण झाले आहेत. काही अपवाद सोडले तर व्यावसाईक मराठी नाटक हे विनोदाच्या आवर्तनात अडकले आहे  त्याबद्दल ते म्हणतात मराठी  नाट्यकर्मी  पागल है !  हे म्हणण्या मागे त्यांची नाटकाबद्दल अंतरीक तळमळ होती. नाटक गंभीर कला प्रकार आहे. त्याला केवळ चार घटका विनोदाचे माध्यम बनविणे चुकीचे आहे असे त्यांना सांगायचे होते. नाटक हे आशय विषय यांनी परिपूर्ण असायला हवे असा त्यांचा आग्रह असे. नाट्य संहितेवर नाटककारांनी अभ्यास करायला हवा. विषयाच्या मुळाशी जातांना त्या विषयावर चिंतन हवे. त्यातूनच चांगली कलाकृती निर्माण होते , असे ते आग्रहाणे मांडीत असत.
सिने नाट्य श्रुष्टीत डॉ. लागू ह्यांची ओळख  एक अभ्यासू , बुद्धिमान ,  कलावंत अशी आहे. प्रेमानंद गज्वी यांचे ' किरवंत' नाटक डॉ. लागू यांनी वाचले. त्यांना ते खुप भावले आणि हे नाटक मी करतो म्हणून त्यांनी गज्वींना फोन केला. त्यातील मुख्य भूमिका मी करतो असे ही त्यांनी सांगितले. दिग्दर्शकाची शोधाशोध सुरू झाली पण डॉ. लागू ह्यांच्या मनात काही वेगळेच होते. दिग्दर्शकाच्या हाती हे नाटक दिले तर ते स्वतः ला सिध्द करण्यासाठी त्यातील आशय मारून नाटकाला तंत्रात अडकवतील. डॉ. लागूंना ते नको होते तेव्हा डॉ. लागू म्हणाले मी स्वतः नाटकाचे दिग्दर्शन करतो. लागूंनी दिग्दर्शन करून नाटकाचा आशय आणि विषय समर्थपणे प्रेक्षकांसमोर पोहचवला. हे करतांना तंत्रात नाटकाला अडकू दिले नाही.

वरील सर्व बाबींचा आजच्या स्पर्धे साठी  लिहिलेल्या नाटकांशी  तुलना केली तर ती कुठे बसते ? किती जन खोलवर विषयाची मांडणी करतात. त्या आशयाला विषयाला भिडतात ? त्या विषयाचं संशोधन करतात ? आता तर एक नवीनच ट्रेंड नव एकांकिका व नाटकांचा पाहावयास मिळतो आहे. एखादा चमकदार विषय शोधायचा, त्याच्यात टाळीबाज वाक्य पेरायची, डायलॉग पॉज घेऊन बोलायचा.  छानसा अँगल असेल , चांगली प्रोफाइल्स असेल  मग काय हमकास टाळ्या. नेत्रदीपक लाईट, कानांना सुखवणारे संगीत थोडक्यात तंत्रज्ञानाची रेलचेल. आशया विषया पेक्षा सर्व लक्ष केवळ तंत्रज्ञानावर केंद्रित केले जाते. खरं पाहता तंत्रज्ञान हे नाटकाचा आशय विषय अधिक ठळक पणे लक्षात यावा, आशय विषय गडद व्हावा लक्षात राहावा  या साठी असते पण हल्लीच्या तरुणांच्या एकांकिका नाटकात नेमके उलटे घडते आहे. आशय विषय दुय्यम ठरत असून तंत्रज्ञान महत्वाचे मानले जाऊ लागले आहे. त्या मुळे नाटकाचा एकांकिकेचा आशय विषय त्यात गुदमरून जाऊन नामशेष होऊ लागला आहे;  तर  भपका, लखलखाट म्हणजे पारितोषिक विजयाचा मार्ग आहे असे त्यास वाटू लागले आहे त्यामुळे तो ती वाट चोखाळू लागला आहे. त्या दृष्टीने ते नाटक एकांकिका बसवू लागले आहेत. अर्थात ही एक फेज आहे लवकरच ती संपेल व पुन्हा तरुण आशया विषयवार लक्ष केंद्रित करू लागेल. खरं पाहता मराठी रंगभूमीवरील आजचे बहुतांश नाटककार एकांकिके कडून नाटकाकडे वळाले आहेत. एकांकिकांनी नाटककार घडविले असे म्हटले तर वावगं ठरणार नाही. 

नवे नवे प्रयोग होत राहतील , नवीन मार्ग शोधले जातील , नवे तंत्रज्ञान वापरले जाईल पण शेवटी आशय विषय ह्या प्रमुख वाटेवरूनच नाटककार   दिग्दर्शक, अभिनेते यांना वाटचाल करावी लागणार आहे. तिच रंगभूमीची खरी ओळख आहे. नाटकाचा आशय विषय प्रभावी पणे प्रेक्षकांपर्यत पोहचवण्यासाठी नेपथ्य, प्रकाश योजना, संगीत याची मदत घ्यावी लागते पण त्याचा अतिरेक टाळून आशय, विषय याला महत्व देवून दिग्दर्शक, अभिनेते यांनी नाटक सादर करणे हे जास्त उचित आहे, या बद्दल दुमत असता कामा नये असे मला वाटते.

- अशोक हंडोरे
नाटककार, दिग्दर्शक

No comments:

Post a Comment

Pages