पाणी टंचाईवर मात करण्यासाठी 4 कोटी 68 लक्ष रुपयांचा कृती आराखडा ; मंजुरी अभावी योजना राबविण्यास विलंब - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 4 March 2022

पाणी टंचाईवर मात करण्यासाठी 4 कोटी 68 लक्ष रुपयांचा कृती आराखडा ; मंजुरी अभावी योजना राबविण्यास विलंब

 

किनवट : 

किनवट,दि.04 (प्रतिनिधी) : जानेवारी ते जून महिन्यांदरम्यान निर्माण होणार्‍या संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जि.प.च्या पाणी पुरवठा विभागातर्फे 4 कोटी 68 लक्ष 12 हजार रुपयांचा कृती आराखडा तयार करण्यात येऊन मंजूरीसाठी जिल्हा प्रशासनाकडे सुमारे दीड महिन्यापूर्वीच पाठविण्यात आला आहे. मात्र, मार्च सुरू होऊनही आराखड्याला अजून मंजूरी मिळाली नसल्याचे येथील पा.पु. विभागाच्या सूत्रांकडून कळाल्यामुळे, जि.प.प्रशासनच्या कार्यतत्परतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


      मागच्या पावसाळ्यात तालुक्यात वार्षिक सरासरीपेक्षा जास्त  पाऊस झाल्याने, किनवट तालुक्यात पाणीटंचाईची समस्या कमी राहील असा कयास होता. मात्र जिल्हा परिषदेने सावधगिरीच्या दृष्टीने करून घेतलेल्या सर्वेक्षणानुसार एप्रिल ते जून दरम्यान काही गावांची भूजल पातळी कमी होण्याची शक्यता भूजल सर्वेक्षण विभागातर्फे वर्तविण्यात आल्याचे समजले. त्यामुळे पहिल्या तीन महिन्यात संबधित गावांसाठी नवीन विंधन विहिरी, नळयोजना विशेष दुरुस्ती व तात्पुरती पूरक नळयोजनेसंदर्भात आराखडा तयार करण्यात आलेला आहे.


       संभाव्य पाणीटंचाईवर उपाययोजनेसाठी जानेवारी ते मार्च 21 या कालावधीसाठी  एकूण 04 कोटी 25 लक्ष 88 हजार रुपयाचा टंचाई आराखडा मंजूरीसाठी जि.प.प्रशासनाकडे पाठविलेला आहे. त्यात नवीन विंधन विहीर घेणे प्रस्तावित असून, त्यासाठी अपेक्षित खर्च 44 लक्ष 60 हजार रुपये दाखविलेला आहे. नळ योजनेच्या विशेष दुरुस्तीची 50 कामे प्रस्तावित केलेली असून, त्याचा अंदाजित खर्च 2 कोटी 15 लक्ष रुपये आहे. तात्पुरती पूरक नळ योजनेची 30 कामे असून, त्यासाठी 1 कोटी 55 लक्ष रुपये अनुमानित खर्च आहे. विंधन विहिरी विशेष दुरुस्तीची 61 कामे सुचविलेली असून, त्यासाठी अपेक्षित खर्च 7 लाख 32 हजार रुपये तर 11 विहीर अधिग्रहणासाठी अपेक्षित खर्च 3 लक्ष 96 दाखविलेला आहे.


     तसेच एप्रिल ते जून दरम्यानच्या कृती आराखड्यामध्ये 42 लक्ष 24 हजार रुपयांच्या अपेक्षित कामांमध्ये  62 विहिरी अधिग्रहण करणे असून, त्याचा अनुमानित खर्च 21 लक्ष 24 हजार आहे. तसेच दरवर्षीच भीषण पाणी टंचाई जाणवणार्‍या धामनदरी, धानोरा(सी), कुपटी (बु.),मारेगाव(वरचे),मार्लागुंडा, अमरसिंग नाईक तांडा,मोहपूरखेडी या सात गावांमध्ये  टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी प्रत्येकी तीन लक्ष प्रमाणे एकूण 21 लक्ष रुपये अंदाजित खर्च दाखविलेला आहे.


       दिवसेंदिवस उन्हाची दाहकता वाढत जात असून, रब्बी व उन्हाळी हंगामासाठी सततच्या उपशामुळे भूगर्भातील जलपातळीसह तालुक्यातील विविध मध्यम व लघु प्रकल्प व साठवण तलाव तसेच नदी,नाले विहिरी आदी जलस्त्रोतातील पाण्याची पातळी कमी होत चाललेली आहे. काही दुर्गम,डोंगराळ भागात तर आतापासूनच पाणी टंचाई जाणवत आहे. त्यामुळे पाणी टंचाईवरील उपाययोजनांना मंजूरीसाठी एवढा विलंब का? असा प्रश्न टंचाईग्रस्त भागातील स्थानिक नेते व नागरिकांना पडलेला आहे.


“ गांवाची लोकसंख्या, भूप्रदेश आणि त्यांचे स्त्रोत लक्षात घेऊन नळयोजना, विंधनविहिरी, टँकर आणि विहिर अधिग्रहणाद्वारे पाणी टंचाईवर मात करण्याच्या योजना राबविण्यात येतात. संपूर्ण राज्यामध्ये फक्त चार महिने पावसाचे पाणी मिळते. उर्वरित आठ महिन्यात भूगर्भातील पाणी तसेच मध्यम व लघु प्रकल्प, साठवण तलाव, नद्या आणि कालव्याद्वारे प्राप्त होणारे पाणी यांचा वापर करावा लागतो. भूगर्भातील पाण्याचा जास्त उपसा केल्यामुळे, पाण्याचे स्त्रोत कोरडे पडतात आणि पाणी टंचाई निर्माण होते. यावर एकमेव उपाय म्हणजे गांव हा एक घटक मानून पाणवहाळ तत्वावर पाण्याचे संवर्धन करणे हा आहे. काही ठिकाणच्या नैसर्गिक जलाशयात क्षाराचे प्रमाण अधिक असल्यामुळे आणि फलोराईड, आर्सेनिक किंवा इतर विषारी पदार्थांचे अतिरिक्त प्रमाण व जैविकदृष्टया दूषितपणामुळे पिण्यासाठी पाण्याच्या उपलब्धतेचा प्रश्न जटील झाला आहे. तरीही किनवट तालुक्यातील पाणी टंचाईग्रस्त भागात आम्ही शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहोत.”


- पी.बी.टारपे. उपविभागीय अधिकारी,जि.प.पाणी पुरवठा,किनवट.

No comments:

Post a Comment

Pages