स्त्रीमुक्तीच्या संकल्पना या फसव्या - प्रशांत वंजारे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 4 March 2022

स्त्रीमुक्तीच्या संकल्पना या फसव्या - प्रशांत वंजारे

अमरावती : 

स्त्रिया या जातिव्यवस्थेची प्रवेशद्वारे आहेत आणि जाती या धर्माची निर्मिती आहे, थोडक्यात जातींना धर्माचे अधिष्ठान आहे. धर्माने स्त्रीउन्नतीचे मार्ग बंद केले आहे, धर्माने स्त्रियांमधला स्वाभिमान मारून टाकला आहे. म्हणून धर्माचाच त्याग केला तर एकूणच स्त्रीदास्याचा अंत होईल. ही गोष्ट बाबासाहेबांना माहित होती. म्हणून १४ ऑक्टोबर १९५६ च्या धम्मस्वीकाराकडे समस्त जगातील स्त्रियांनी स्त्रीमुक्ती म्हणूनच बघायला हवे. तेव्हाच तथाकथित स्त्रीवादाची मांडणी करणाऱ्या मंडळींना मुक्तीचे संदर्भ सापडू लागतील. मूल्यांतराकडे डोळेझाक करून मांडण्यात येणाऱ्या स्त्रीमुक्तीच्या संकल्पना या फसव्या आहेत असे मी समजतो.

   अमरावती येथे  अ. भा. आंबेडकरी महिला साहित्य संमेलनात ते बोलत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हयातीत जे विविध लढे संघटित केले / लढले, त्यातून समस्त स्त्रियांनी प्रेरणा घेतली, त्यांच्यातील स्वाभिमान जागृत झाला. स्त्री-पुरुष सममूल्यतेची भावना आंबेडकरी ऐतिहासिक लढ्यांमधून विकसित झालेली आहे. बाबासाहेबांच्या चळवळीत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग होता. या स्त्रियांसाठी बाबासाहेब मसीहा होते. बाबासाहेबांनी स्त्रियांना गुलामगिरीतून मुक्त केले, स्वाभिमानाची दिक्षा दिली, स्वउन्नतीचे दरवाजे स्त्रियांना उघडून दिले ,यातून स्त्रियांमध्ये क्रांतिकारी परिवर्तन आले. या घटनेला मी याला स्त्रीवाद वगैरे म्हणत नाही तर स्त्रिया या वेगळ्या नसून त्या मनुष्यत्वाचाच अविभाज्य घटक आहे असे मानतो. अनंत काळापासून  'स्त्रिया या दुय्यम आहेत'  ही स्त्रियांची वेदना बाबासाहेबांनी कायमची पुसून टाकली. बाबासाहेबांनी 'एक मत एक मूल्य' आणि 'कायद्यासमोर सर्व समान'  या विशेष प्रावधानांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून धर्माधारित पुरुषसत्तेला कायमचे संपवले, हे सर्व प्रयोजन मानवमुक्तीचेच होते. हे आपण समजून घेतले पाहिजे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संस्कार भवनात यशस्वी रित्यासंपन्न झालेल्या या संम्मेलनास आंबेडकरवादी साहित्यप्रेमींची उपस्थिती होती.
No comments:

Post a Comment

Pages