21 जलप्रकल्पांमध्ये 44.92 टक्के उपयुक्त पाणीसाठा किनवट तालुक्यातील स्थिती ; पाणीसाठ्यात होतेय घट - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 31 March 2022

21 जलप्रकल्पांमध्ये 44.92 टक्के उपयुक्त पाणीसाठा किनवट तालुक्यातील स्थिती ; पाणीसाठ्यात होतेय घट

किनवट, दि.31 : मागील पावसाळ्यात वार्षिक सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे, व नंतरही मान्सूनोत्तर पाऊस बरसल्याने तालुक्यातील सर्व जलप्रकल्पात मुबलक पाणी भरले होते. या पार्श्वभूमीवर सध्या पाटबंधारे विभागाच्या किनवट उपविभागांतर्गत येणार्‍या 21 सिंचन प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा 27.59 द.ल.घ.मी. असून, त्याची टक्केवारी 44.92 टक्के आहे. मागील वर्षी  या काळात सर्व प्रकल्पातील सरासरी उपयुक्त पाणीसाठा 22.28 द.ल.घ.मी. होता व त्याची टक्केवारी 36.27  होती, अशी माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.


   किनवट तालुक्यात नागझरी,लोणी व डोंगरगाव येथील तीन मध्यम प्रकल्प, सिरपूर व मांडवी येथील दोन बृहत लघु तलावाशिवाय इतर 13 लघु तलाव व 3 साठवण तलाव आहेत. याशिवाय  तालुक्यातील मोहपूर व येंदा या दोन ठिकाणी उच्च पातळीचे बंधारे आहेत. गत जूनमध्ये दमदारपणे सुरू झालेल्या पावसाचे महिन्यातभरात केवळ 16 दिवस, जुलैमध्ये 18, ऑगस्टमध्ये 14 व सप्टेंबरमध्ये 18 दिवस मिळून एकूण 66 दिवस पाऊस कोसळला. त्यात तालुक्यात जूनमध्ये एकदा, जुलैमध्ये दोनदा, ऑगस्टमध्ये तीनदा तर सप्टेंबरमध्ये दोनदा मिळून तब्बल आठ वेळा विविध मंडळात अतिवृष्टी झाली. त्यामुळे काही पाझरणारे व तांत्रिक दोष असलेले प्रकल्प सोडले तर सर्वच प्रकल्प शंभर टक्के भरले होते. त्यानंतर या प्रकल्पातून मागे रब्बीसाठी व सध्या उन्हाळी हंगामातील पिकांसाठी पाणी पाळ्याचे नियोजन करून पाणी सोडण्यात येत असल्यामुळे, पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे.


       सध्या तापमानात वाढ होत असून, जसजसे ऊन तापेल तसे बाष्पीभवनाचा वेग वाढून पाणीसाठ्यात घट होणे सुरू होईल. गत रब्बी हंगामामध्ये तालुक्यातील विविध प्रकल्पांतून जवळपास 4 हजार 200 हेक्टर वरील पिकांना पाणी पुरवठा करण्यात आला होता. उन्हाळी हंगामातील पिकांसाठी मात्र लघु व साठवण तलावातून पाणी पुरवठा केल्या जात नाही. केवळ तीन मध्यम प्रकल्पातूनच सुमारे 350 हेक्टर जमिनीवरील पिकांसाठी पाणी सोडण्यात येते. शिवाय नागझरी या मध्यम प्रकल्पातील 1.5 द.ल.घ.मी.पाणी किनवट शहराच्या नळयोजनेद्वारे नागरिकांना पाणी पुरविण्यासाठी राखून ठेवल्या जाते.


        आजमितीस ज्या प्रकल्पात प्रत्यक्ष उपयुक्त जलसाठा आहे, त्याची आकडेवारी दशलक्ष घनमिटर मध्ये पुढील प्रमाणे असून, कंसातील आकडे त्याची टक्केवारी दर्शवितात. नागझरी - 2.589(29.84), लोणी -3.419 (45.17), डोंगरगाव - 4.505 (51.16) ,सिरपूर बृहत - 0.059 (1.41), मांडवी बृहत - 2.414 (46.96), कुपटी - 0.170 (12.88), मूळझरा-0.7546 (41.60), थारा - 0.4503 (52.14), निचपूर - 0.620 (28.30), जलधारा -1.330 (71.27), सिंदगी - 0.240 (14.98), हुडी - 1.1560 (73.82), पिंपळगाव(कि.) - 0.8270 (38.16), नंदगाव - 0.4698 (31.40), अंबाडी -0.128 (1.28), वरसांगवी - 1.9462 (72.38), पिंपळगाव (भि.) -1.6711 (73.23), सावरगाव - 0.691 (52.67) , निराळा सा.त.- 1.339 (59.20), सिंदगी सा.त .- 1.489 (64.35), लक्कडकोट सा.त .- 1.321 (72.82). या सोबतच मोहपूर येथील उच्च पातळी बंधार्‍यात 87 टक्के तर येंदा येथील उच्च पा.बंधार्‍यात 76.08 टक्के उपयुक्त जलसाठा आहे.

No comments:

Post a Comment

Pages