सम्राट अशोक..... लोककल्याणकारी सम्राट - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday, 8 April 2022

सम्राट अशोक..... लोककल्याणकारी सम्राट

    


   भारताच्या इतिहासात एकच असा एकमेव म्हणण्यासारखा कालखंड आहे, जो स्वातंत्र्याचा काळ, अतिशय महत्त्वाचा काळ आणि वैभवाचा काळ म्हणता येईल आणि तो काळ म्हणजे मौर्य सम्राट अशोकाच्या राज्यकारभाराचा काळ होय."डॉ. बाबासाहेब आंबेडकर (संदर्भ -अँनहिलेशन ऑफ कास्ट).   

जगाच्या इतिहासात अनेक राजे, महाराजे, होऊन गेले पण त्यातील मोजक्याच राजांना जनतेच्या हृदयात कायमचे स्थान मिळाले, मोजक्याच राजांना इतिहासाने गौरविले. प्रसिद्ध इतिहासकार एच.जी. वेल्स म्हणताे - "जगामध्ये स्वत:ला राजे, महाराजे म्हणवणारे हजारो होऊन गेले; पण खऱ्या अर्थाने ज्याचे नाव जगाच्या इतिहासात तळपतच राहील असे एकमेव म्हणजे सम्राट अशोक"... जगाच्या पटलावर आपली छाप सोडणाऱ्या हया सम्राटाला काळाच्या ओघात लुप्त करण्याचा प्रयत्न केला गेला. पण त्यांची जगाने व इतिहासाने दखल घेतली अशा सम्राटाच्या कार्याचा प्रचार व प्रसार होतच राहिला.सम्राट अशोक केवळ भारताच्या नव्हे तर जगाच्या इतिहासातील सुवर्णपर्व आहे.कलिंगच्या युद्धानंतर या सम्राटाने बुद्ध धम्माचा स्वीकार करून या बुद्धधम्माच्या तत्वज्ञानाला जगाच्या पटलावर नेऊन ठेवले बौध्द धम्माला राजाश्रय देऊनही इतर धर्मातील लोकांना समानतेने वागवले.देशात लोककल्याणकारी राज्यव्यवस्था निर्माण केली. अगदी ग्रामपंचायत पातळी पासून शासनव्यवस्था निर्माण केली, अतिशय प्रभावी अशी महसूल व्यवस्था निर्माण केली, जनतेला शेतीसाठी जमिनीचे पट्टे वाटले, रस्ते बांधले, तलाव, विहिरी निर्माण केल्या, रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लावले,  नदीवर बांध घालुन धरण बांधले हि भूमी सुजलाम-सुफलाम केली, जनतेच्या सेवेसाठी ठिकठिकाणी आरोग्यशाला, मुलांच्या शिक्षणासाठी पाठशाळा निर्माण केल्या, मुलांचे संगोपन ही राज्याची जबाबदारी आहे असा नियम बनवला, भुकेलेल्यांसाठी अन्नछत्र निर्माण केले, जनतेला चोर, दरोडेखोर, लुटारू यांच्यापासून संरक्षण दिले व्यापाऱ्यांना सरंक्षण दिले, व्यापारी मार्गांवर विश्रांती स्थळ निर्माण केले, या सम्राटाने व्यापा-यांना देश-विदेशात व्यापार करायला प्रोत्साहन दिले, याच सम्राटाच्या प्रोत्साहनामुळे भारतीय व्यापाऱ्यांनी इजिप्त, ग्रीस, सीरिया, पूर्व आशिया आणि मध्य आशियातील देशांशी समुद्रमार्गे आणि भूमार्गे व्यापार केला. भारतात सोन्याचा धूर निघायचा असे म्हणतात पण सम्राट अशोकाच्याच काळात भारतात सोन्याचा धूर निघायचा असे कोणी सांगत नाही, अशोकाच्या काळात जागतिक व्यापारातील ४०% हिस्सा भारताचा होता. आज तो हिस्सा २% आहे.सम्राट अशोकाच्या काळी भारत देश एक जागतिक महाशक्तीशाली देश म्हणुन ओळखला जात  होता. सम्राट अशोकाने अखंड भारताला आपल्या वर्चस्वाखाली आणले. सम्राट अशोकाने बुद्ध धम्माच्या प्रसारासाठी भिक्खूसंघाला देशविदेशात पाठवले. बौद्ध भिक्खूनी बौद्ध तत्वज्ञान चीन सहित पूर्व आशिया, इराण, मध्य आशिया, इजिप्त आणि ग्रीस पर्यंत पोहचवले स्वतः सम्राट अशोकाने स्वतःचा मुलगा आणि मुलगी सुद्धा धम्मप्रसारासाठी दान केले.सम्राट अशोकाने धम्माची इमारत भक्कम बांधून ठेवली.बुद्धाचा प्रथम कल्याणकारी, मध्य कल्याणकारी आणि जो शेवटी सुध्दा कल्याणकारी  असणाऱ्या अश्या बौद्धधम्माला अभिप्रेत लोककल्याणकारी राज्य निर्माण केले.त्यांनी बुद्ध तत्वज्ञानप्रणित आज्ञा असणारे ८४ हजार शिलालेख, प्रस्तरखंड, गुंफा (लेणी) कोरल्या फक्त आज्ञा कोरूनच ठेवल्या नाहीत तर त्यानुसार राज्यकारभार चालतोय की नाही यावर देखरेख ठेवणारी यंत्रणा सुद्धा निर्माण केली. अगदी इराण मधे सुद्धा हे शिलालेख सापडले आहेत. आजचा पाकिस्तान, अफगाणिस्थान,इराण या देशात आजसुध्दा सम्राट अशोकाने निर्माण केलेले स्तुप पाहायला मिळतात.सम्राट अशोक असे एकमेव सम्राट आहेत ज्याचे आपल्या राज्यातील लहान थोरापासून सर्व जनतेवर लक्ष होते तसेच   सामन्यातील सामान्य माणसाकडे देखील त्यांचे लक्ष होते. आणि त्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आणि नुसती नियुक्ती करून ते थांबलेले नाहीत.तर सम्राट अशोकाने महापात्रा म्हणून ज्यांची नियुक्ती केलीय ते व्यवस्थित काम करतात किंवा नाही याची स्वतः पाहणी करत.आज आपण ग्रामसेवक सरपंच ही पदे गावात पाहतो ती आताची नसून अशोकाने इसवी सनापुर्वीच आपल्या राज्यात निर्माण केलेली आहेत त्या पदाला अशोकाच्या व्यवस्थापनात ” रज्जूक ” असे म्हटले आहे. आजही भारताचा सातबारा याच लोककल्याणकारी सम्राट अशोकाच्या नावावर असल्याचे दिसते. भारताताच्याच नव्हे, तर जगाच्या इतिहासात आपल्या परम कर्तृत्वाने आढळपद मिळविणारा एकमेव चक्रवर्ती सम्राट देवानांप्रिय प्रियदर्शी यासारख्या उपाधिने त्यांचा जगाने गौरव केला आहे त्यांनी अनेक विद्यापीठांची निर्मिती केली आणि त्यात अनेक प्रकारचे शिक्षण त्या विद्यापीठामार्फत लोकांना पुरवीले. असे महान कार्य करणारे महान चक्रवर्ती सम्राट प्रियदर्शी अशोक हे एका विशिष्ट वर्गाचे पंथाचे नसून आजच्या संपूर्ण भारतीयांचे "सम्राट" आहेत जोपर्यंत सूर्य चंद्र आहे तोवर महान चक्रवर्ती सम्राट प्रियदर्शी अशोक यांचे कार्य तळपत राहिल यात तीळ मात्र शंका नाही.

चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्यास अन् विचारास व अशा महान सम्राटास विनम्र अभिवादन..

 निलेश वाघमारे..8180869782

No comments:

Post a Comment

Pages