किनवट,ता.८ : आपण स्विकारलेला शिक्षकीपेशा हा समाजऋण फेडण्यासाठीची नामी संधी आहे. त्यासाठी आपण सर्वांनी विद्यार्थ्यांच्या बौद्धिकतेसह त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी अविरत परिश्रम घ्यावे. शिक्षकांनी विविध वैचारीक कल्पनांद्वारे मिळालेल्या संधीचं सोनं करावं, असे प्रतिपादन गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने यांनी केले.
महाराष्ट्र शासन व प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्यावतीने जिल्हा परिषद (मुलांचे) हायस्कूल येथे आयोजित ‘शाळापूर्वतयारी मेळावा : तालुकस्तर प्रशिक्षण’ चा अध्यक्षीय समारोप करतांना ते बोलत होते. यावेळी उद्घाटक म्हणून ‘प्रथम’चे राज्यप्रमुख सोमराज गिरडकर, मुख्य अतिथी म्हणून प्रमुख सुलभक , तालुका संपर्क अधिकारी तथा डायटचे अधिव्याख्याता अभय परिहार, बालविकास प्रकल्प अधिकारी अश्विनी ठकरोड, ‘प्रथम’चे मराठवाडा विभाग प्रमुख शंकर पौळ, तौफीक सय्यद, शिक्षण विस्तार अधिकारी ना.ना. पांचाळ, मुख्याध्यापक मोहन जाधव उपस्थित होते.
पुढे बोलतांना श्री महामुने म्हणाले की, आपल्या मुलांनी नियमीत शाळेत जावे आणि उत्तम शिक्षण घ्यावे, ही सर्वांचीच इच्छा असते. मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणून पालक, शिक्षक आणि समाज या नात्याने आपणच त्यासाठी पोषक वातावरण तयार केले पाहिजे. ज्याप्रमाणे शेतकरी जूनच्या पेरणीकरिता एप्रिल- मे मध्ये शेतीची मशागत करून पेरणीपूर्व तयारी करतो. अगदी त्याप्रमाणे शिक्षकांनी जूनमध्ये शाळा सुरु होणार असल्याने, त्यापूर्वी एप्रिल- मे मध्येच शाळापूर्व तयारी करून घेतली पाहिजे. तालुक्यातील तेवीस केंद्रांतून प्रत्येकी दोन तंत्रस्नेही शिक्षकांना हे प्रशिक्षण देण्यात आले असून हे दोघे केंद्रस्तरीय मेळाव्यात सर्व शिक्षकांना शाळापूर्व तयारी प्रशिक्षण देतील.
उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले. सुलभक दयाल मोगरकर यांनी आभार मानले. भूमय्या इंदुरवार यांनी शाळापूर्व तयारी गीत गाईले.
No comments:
Post a Comment