"तुम्हीं हीनयान मानता कि महायान? या प्रश्नावर हसून राहुलजींनी उत्तर दिले - "मी बुद्धिमान बौद्ध आहे". बौद्ध धम्मा बद्दल राहुलजींना विशेष आकर्षण वाटले आणि म्हणून त्यांनी त्या साहित्याचा अभ्यास सुरु केला. आपल्या आयुष्यातील जवळपास ४५ वर्षे त्यांनी बौद्ध साहित्याचा अभ्यास करण्यासाठी विविध देशात भ्रमंती केली. केदारनाथ पांडे म्हणून जन्माला आलेले राहुलजी सुरवातीला आर्यसमाजी होते, मात्र बुद्ध विचार पटल्यानंतर त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला व स्वतःचे नाव राहुल सांकृत्यायन ठेवले.
श्रीलंकेतील विद्यालंकार परिवेण मध्ये तेथील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना संस्कृत काव्य, व्याकरण शिकवीत व स्वतः महास्थवीर धर्मानंद यांच्याकडून पालि, बौद्ध साहित्याचा अभ्यास करीत. पालि त्रिपिटक मध्ये मिळवलेल्या प्रावीण्यामुळे त्यांना विद्यालंकार परिवेण ने "त्रिपिटकाचार्य" ही पदवी बहाल केली.
राहुलजी, अनागरिक धम्मपाल यांच्या संपर्कात आले होते. दोघांमध्ये बौद्ध धम्माबद्दल आणि महाबोधी महाविहारावर बरीच चर्चा झाली. राहुलजींनी महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या बाजूने होते आणि त्यांनी तसा प्रस्ताव गया काँग्रेसच्या अधिवेशनात मांडला परंतु त्यांना अपयश आले. पुढे राजेंद्रबाबूंनी स्थापन केलेल्या महाबोधी महाविहार समितीत देखील ते होते व त्यांनी बौद्धांच्या ताब्यात महाविहार देण्यात यावे यासाठी प्रयत्न केले.
प्राचीन हरवलेले बौद्ध साहित्य तिबेट मध्ये आहे हे कळल्यानंतर त्यांनी चार वेळा तिबेट यात्रा केली. या सर्व यात्रेत त्यांनी तिबेट मधील वेगवेगळ्या विहारांमध्ये अनेक ग्रंथ, चित्रे, भृजपत्रे, ताम्रपट, यांचे फोटो काढून आणले, काही स्वतः उतरवून घेतले. काही प्रमुख ग्रंथ जे भारतातून नष्ट झाले होते त्यापैकी वाद्न्याय, अभिधर्मकोषमूल, सुभाषित रत्नकोश, न्यायबिंदूपंजिका टीका, हेतुबिंदु अनुटीका, प्रातिमोक्षसूत्र, मध्यान्तविभंग भाष्य, वार्तिकालंकार, इत्यादी. शलू बौद्ध विहारातून त्यांनी नैयायिक ज्ञानश्री चे १२ ग्रंथ आणि योगाचारभूमी ग्रंथ आणले. राहुलजींनी आपल्या या यात्रांमधून भारतात प्राचीन बौद्ध साहित्यातील ३६३ ग्रंथांच्या प्रतिलिपी आणल्या. त्यांनी केवळ एकच ग्रंथ जरी तिबेट वरून आणला असता तरी त्यांना अक्षय कीर्ती मिळाली असती! राहुलजींनी एकूण १३८ पुस्तके लिहिली जी वेगवेगळ्या विषयांवर आणि भाषेत आहेत. त्यांना १४ भारतीय आणि परदेशी भाषा अवगत होत्या. राहुलजींनी आणलेले सारे साहित्य पाटणा संग्रहालयात सुरक्षित ठेवले आहे. विशेष म्हणजे कधीही कॉलजची पायरी न चढलेले राहुलजींना लेनिनग्राड येथील विद्यापीठात ४ वर्षे प्राध्यापक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते!
९ एप्रिल २०२० ला राहुल सांकृत्यायन यांची १२७वी जयंती आहे. त्यांना विनम्र अभिवादन.
-अतुल भोसेकर
९५४५२७७४१०
No comments:
Post a Comment