अमोल साबणे खून प्रकरणी अखेर खरा आरोपी गजाआड - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 9 May 2022

अमोल साबणे खून प्रकरणी अखेर खरा आरोपी गजाआड

         नांदेड (प्रतिनिधी) : शिवनगर नांदेड येथील चर्मकार युवक अमोल साबणे खून प्रकरणी इतवारा पोलिसांनी अखेर खरा आरोपी गजाआड केला असून त्यास आज नांदेडच्या कोर्टात हजर केले असता न्यायाधिशांनी त्यास पाच  दिवसांची कोठडी सुनावली.

         या प्रकरणी अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर आणि राष्ट्रीय ढोर समाज संघटनेचे प्रदेश महासचिव नामदेव फुलपगार (मा. नगरसेवक) यांनी तातडीने धाऊन येऊन समाजाचे नेतृत्व केले. पोलिसांना वारंवार शिष्टमंडळासह भेटून आरोपीस तात्काळ अटक करण्याचा आग्रह धरला व अंत्यविधी शांततेत पार पाडण्यासाठी मध्यस्थी केली. अन्य पदाधिकाऱ्यांनीही या कामी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांनी आरोपीस तात्काळ अटक केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा चंग बांधला होता. पोलीस उपनिरीक्षक हौसाजी मारकवाड, सपोनि असद, संघरत्न गायकवाड व सहकाऱ्यांनी आरोपींचा छडा लावण्यासाठी जंग जंग पछाडले होते.

         देगलूर नाका परिसरातील शिवनगर येथील चर्मकार (ढोर) समाजाचा तरुण तडफदार निर्व्यसनी आणि कष्टाळू युवक अमोल प्रभू साबणे (वय फक्त २३) हा नांदेडच्या रेल्वे स्टेशन परिसरात बॅगला चैन बसवून आपली व कुटुंबाची उपजिवीका भागवित होता. अविवाहित असलेल्या या युवकाचे सर्वांशी चांगले सौर्हादाचे संबंध होते. या परिसरातील बेफाम वाढलेल्या नशेखोरीने त्याचा बळी घेतला. एका पाठोपाठ लगातार या परिसरात तीन खून होण्यास पोलिसांचा आणि पशू वैद्यकीय सर्व चिकित्सालय विभागाचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरला आहे. 

        शुक्रवार दि. २९ एप्रिल २०२२ रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास अमोल जवळच असलेल्या पशू वैद्यकीय सर्व चिकित्सालय परिसरातील बेसुमार वाढलेल्या झाडा झुडपात शौचासाठी गेला असता तेथे आधीपासून ठाण मांडून बसलेल्या नशापानी करणाऱ्या युवकांच्या टोळक्याने त्यास घेरले व मारहाण करुन अमोल जवळील तीन हजार रुपये काढून घेतले. आपले कष्टाचे पैसे अमोल देऊ इच्छित नव्हता म्हणून शेख अकबर उर्फ गुज्जर याने झटापट करीत चाकूने भोसकून अमोलचा खून केला.

        इतवारा पोलिसांनी आरोपीचा शोध लावण्यासाठी अनेक पथके नेमून तपास केला व अखेर मुख्य आरोपी शेख अकबर उर्फ गुज्जर रा. खडकपुरा, नांदेड यास अटक केली असून त्याने खून केल्याचे कबूल केले आहे. चाकूच्या धाकाने अमोलकडून पैसे हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने पैसे दिले नाही म्हणून चाकूने भोसकून अत्यंत क्रूरपणे अमोलचा खून करण्यात आला.

आज न्यायालयापुढे त्यास उभे केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.

        हा खून एकट्याने करणे शक्य नसून आणखी जे कुणी नशाबाज युवक तिथे उपस्थित होते त्यांची देखील चौकशी होऊन त्यांनाही अटक झाली पाहिजे आणि या प्रकरणी अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई झाली पाहिजे अशी मागणी अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद आणि राष्ट्रीय ढोर समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या प्रकरणी परत हलगर्जीपणा झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

         या प्रकरणी न्याय मिळण्यासाठी पोलीस अधिक्षक आणि जिल्हाधिकारी यांची भेट दोन्ही संघटनेच्या वतीने घेण्यात आली व निवेदने देण्यात आली. यावेळी इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर, नामदेव फुलपगार, किरणकुमार हिवरे, बाबुराव नरहिरे, पंढरी हिवरे, शंकर धडके, मयताचा भाऊ राणू प्रभू साबणे, श्याम कांबळे, मनोजकुमार वाघमारे, अशोक नरहिरे, दिलीप इंगोले, कैलास हिवरे, नागेश कावळे, गोविंद खरटमल, भगवान व्हटकर, गोविंद खरात, अशोक महामुने, संजय धडके, बजरंग साबणे, कृष्णा भाळशंकर, सुरेश वाघमारे, गोविंद वाघीकर, कैलास हिवरे, पिंटू नरहिरे, बालाजी खरात, दिनेश हिवरे, इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages