किनवट,(प्रतिनीधी) : खरीप हंगाम 2020-21 मध्ये किनवट तालुक्यात कापसाची 41 हजार 564 हेक्टरवर लागवड होती; तर सोयाबीन 25 हजार 852 हेक्टरवर पेरल्या गेल्या होता. गतवर्षी सोयाबीन व कापसाच्या आधारभूत किमतीपेक्षा बाजारभाव अधिक मिळाल्याकारणाने यंदा शेतकर्यांचा कल कापूस व सोयाबीन पेरण्याकडे अधिक आहे. त्यामुळे या दोन्ही पिकांच्या लागवड क्षेत्रात अनुक्रमे 10 व 11 टक्के वाढ होण्याची शक्यता, येथील मंडळ कृषी अधिकारी बद्धभूषण मुनेश्वर यांनी व्यक्त केली.
किनवट तालुक्यात कापसाचे सर्वसाधारण क्षेत्र 48 हजार 563 हेक्टर आहे. गत दोन-तीन वर्षापासून अतिवृष्टी, पूरपरिस्थिती, मान्सूनोत्तर लांबलेला पाऊस पर्यायाने कापसावर रोगराई व गुलाबी बोंडअळीसह इतर किटकांच्या हल्ल्यामुळे दरवर्षी उतारा घटतच होता
. बाजारात भावही अपेक्षित मिळत नसल्याने उत्तरोत्तर कापसापेक्षा सोयाबीनलाच शेतकर्यांनी पसंती दिली होती. मात्र गतवर्षी कापूस विक्रीसाठी आधारभूत किंमत 5 हजार 726 रुपये होती. मात्र भाव शेवटीशेवटी बारा हजार पर्यंत गेल्यामुळे शेतकर्यांनी परत एकदा कापूस लागवड करून नशीब आजमावण्याचे ठरवलेले दिसते. यंदा कापसाच्या क्षेत्रात गतवर्षीपेक्षा अकरा टक्के वाढ होऊन 46 हजार 136 हेक्टरवर पेरले जाण्याची शक्यता आहे.
तालुक्यातील सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र 17 हजार 032 हेक्टर आहे. गत तीन वर्षापासून कापसातील नुकसानीमुळे सोेयाबीनच्या क्षेत्रात सातत्याने वाढ होत आहे. मात्र, गतवर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटले होते, दाण्यांची प्रत खालावली होती. त्यामुळे उतार घटला परिणामी दर तेजीत आले. गतवर्षी सोयाबीनला 3 हजार 950 रुपये प्रती क्किंटल आधारभूत किंमत होती. मात्र शेवटच्या टप्प्यात बाजारपेठेत सोयाबीनला प्र.क्कि. 7,500 ते 8,000 रुपये भाव मिळाला. त्यामुळे यंदा सोयाबीनच्या क्षेत्रातही दहा टक्के वाढ होऊन 28 हजार 437 हेक्टरवर सोयाबीन पेरले जाण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
यंदा देशात 103 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. नैर्ऋत्य मोसमी पाऊस केरळनंतर दक्षिण कर्नाटक व तामिळनाडूच्या काही भागात पोहोचलेला आहे. येत्या पाच-सहा दिवसात कोकणातून महाराष्ट्रात पोहोचण्याची शक्यता असल्याने, शेतकर्याची खरीप पेरणीसाठी लगबग सुरू झालेली आहे.
“ सद्यस्थितीत बाजारात अनेक प्रकारचे सोयाबीन व कपाशीचे वाण उपलब्ध आहेत. यापैकी कोणता वाण निवडावा याबाबत शेतकर्यांमध्ये संभ्रम आहे. वाण निवडतांना कोरडवाहू किंवा बागायती लागवडीचा प्रकार व गुणधर्म याचा विचार करूनच वाणाची निवड करून आपली फसवणूक टाळून दर्जदार बियाण्यांची निवड करावी.”
बुद्धभूषण मुनेश्वर. मंडळ कृषी अधिकारी, किनवट.
No comments:
Post a Comment