पालक, शिक्षकांसह मित्रांचा आदर बाळगा - जिल्हाधिकारी सुनील चव्हाण शालेय विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सवात जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती जिल्हाभरातील शाळेत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत  - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 15 June 2022

पालक, शिक्षकांसह मित्रांचा आदर बाळगा - जिल्हाधिकारी सुनील चव्हाण शालेय विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सवात जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती जिल्हाभरातील शाळेत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत 

औरंगाबाद:

 शालेय विद्यार्थी जीवनापासून प्रत्येकाने पालक, शिक्षक आणि मित्रांचा आदर बाळगावा. जगातील उत्तम नागरिक बनण्याचा ध्यास धरावा. खूप कष्ट करावेत, पर्यावरणावर प्रेम करावे, अधिकाधिक वाचन करावे. या सर्व गुणांमुळे तुम्ही जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल, असे विचार प्रभारी मनपा प्रशासक तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी शालेय विद्यार्थ्यांसमोर आज व्यक्त केले. जिल्हाधिकारी यांच्या या प्रेरणादायी विचारांमुळे शालेय विद्यार्थी प्रभावित होऊन विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी मनमोकळा संवादही साधला.

औरंगाबाद शहरातील अशोक नगरमधील मातोश्री रमाबाई आंबेडकर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय आणि जिल्हा परिषदेच्या गारखेडा क्रं.1 शाळेत आज जिल्हाधिकारी चव्हाण यांनी शाळा पूर्व तयारी क्रमांक 2 नुसार शालेय विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सवात प्रत्यक्ष उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. गणवेश, मिठाई, पाठ्यपुस्तके, पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत श्री.चव्हाण यांनी केले.

जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, मी तुमच्या सारखाच जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो.  शाळेतील सर्व सुविधांचा उपयोग विद्यार्थ्यांनी करावा. विद्यार्थ्यांचे आयुष्य घडविण्यात शिक्षकांचा मोठा वाटा असतो. माझ्या शिक्षकांमुळेच मी जिल्हाधिकारी झालो. त्यामुळे शिक्षकांचा आदर प्रत्येकानेच ठेवावा. तुमची पहिली शाळा तुमचे घर आहे. तिथूनच तुमच्यावर संस्कार रूजतात. त्यामुळे पालकांचाही आदर ठेवणे प्रत्येक विद्यार्थ्याचे कर्तव्य आहे. सुख दु:खात ज्याप्रमाणे नातेवाईक असतात. त्याहीपेक्षा अधिक जवळचे तुमचे मित्र असतात, त्यामुळे मित्रांचाही आदर प्रत्येकाने ठेवण्याचा संदेश जिल्हाधिकारी चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना दिला.     

शहराच्या अशोक नगरातील शाळेतील प्रत्येक वर्गास भेट देऊन शाळेतील विविध सोयी सुविधांची पाहणी जिल्हाधिकारी यांनी केली. वर्गात जाऊन शिक्षक,विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी मनपा उपायुक्त नंदा गायकवाड, शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे, राजू शिंदे, समग्र शिक्षा अभियानाचे कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे, मुख्याध्यापक संजय मडके, मच्छिंद्र वनवे आदींसह या कार्यक्रमास नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.   

गारखेडा क्रमांक 1 मधील जिल्हा परिषदेच्या शाळेत शालेय ‍विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी इंग्रजीतून संवाद साधला. छोटेखानी मुलाखतही घेतली. वादविवाद, अंकांची ओळख आदीप्रकारे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वाचे सादरीकरणही जिल्हाधिकारी यांच्यासमोर विद्यार्थ्यांनी केले. जिल्हाधिकारी यांनी गारखेडा शाळेतील शिक्षकांसह विद्यार्थ्यांचे कौतुक केले. 

या कार्यक्रमास शैलेश चौधरी, शालेय समितीचे अध्यक्ष लक्ष्मण चौधरी, सरपंच रमेश बन्सोडे, शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, गट शिक्षणाधिकारी दीपाली थावरे,  शिक्षण विस्तार अधिकारी रमेश ठाकूर, मुख्याध्यापक किरण जाधव, नितीन गबाले, मंगला पठाडे, ललिता केळकर, श्यामल जोशी, वैशाली मुळे, भास्कर भावले, कल्याण काकडे, सुदाम चंद्रटेके, गणेश दुधाट, शरद खाडे, सुनील चौधरी, अशोक चौधरी, अमोल चौधरी, अरूण चौधरी, संदीप पठाडे, अण्णा देहाडे आदींची उपस्थिती होती.     


No comments:

Post a Comment

Pages