औरंगाबाद:
हिमायत बागेतील शक्कर बावडीच्या पाण्यातून दिल्ली गेट, रोजाबाग आणि परिसरातील नागरिकांना पाणी पुरवठा व्हावा, यासाठी प्रभारी मनपा प्रशासक तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पुढाकार घेतला आहे. या बावडीतून लवकरच पिण्यायोग्य पाणी नागरिकांना देण्यासाठी मनपा प्रशासनाने कार्यवाही करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
शक्कर बावडीतून काढण्यात येत असलेल्या गाळाची, दुरूस्तीची पाहणी आज जिल्हाधिकारी चव्हाण यांनी केली. यावेळी महानगरपालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, हिमायत बागेचे प्रशासकीय अधिकारी एम.बी.पाटील, यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता डी.के. पंडित, उप अभियंता डी.पी. गायकवाड, कृषी अधिकारी अविनाश देवळे आदींची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, शक्कर बावडीतून गाळ उपसण्याचे काम सुरू आहे. आता पर्यंत 20 बाय 80 मीटरच्या या बावडीतून अंदाजे 150 ब्रास गाळ उपसण्यात आला आहे. गाळ उपसण्यासाठी आवश्यक ती सर्व यंत्रसामुग्री यंत्रणेला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आगामी चार दिवसात संपूर्ण गाळ उपसून बावडीचे पाणी रोझाबाग सेटलिंग टँकमध्ये पोहोचवल्या जाईल. त्याठिकाणी पाण्याचे शुद्धीकरण, गुणवत्ता तपासून नागरिकांना लवकरच या बावडीतून पाणी देण्यात येणार आहे, असेही चव्हाण यांनी पाहणीदरम्यान सांगितले.
पूर्वी हिमायत बागेला नहरीचे पाणी वापरले जायचे. ते पुरेसे नसल्याने तत्काळात विहिर खोदण्यात आली. तिचे पाणी गोड असल्याने शक्कर बावडी नाव पडले. पूर्वी या विहिरीचे पाणी मोटेने बागेला दिले जात असत. 1972 च्या दुष्काळातही विहिरीने परिसरातील अनेक वसाहतींची तहान भागवल्याचे हिमायत बागेचे पाटील यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment