भीमशाहिर प्रतापसिंग बोदडे यांचे मुक्ताईनगर मध्ये स्मारक उभारणार - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 13 June 2022

भीमशाहिर प्रतापसिंग बोदडे यांचे मुक्ताईनगर मध्ये स्मारक उभारणार - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले


मुंबई दि.13 - भीमशाहिर महाकवी दिवंगत प्रतापसिंग बोदडे यांचे आंबेडकरी चळवळीतील योगदान समाजाला प्रेरणादायी आहे.त्यांचे मुक्ताईनगर जिल्हा जळगाव येथे  स्मारक उभरण्यात येईल.तसेच आपल्या खासदार निधीतून सामाजिक सभागृह दिवंगत प्रतापसिंग बोदडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारणार असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले.  मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौक येथे दिवंगत लोकशाहीर प्रतापसिंग बोदडे यांच्या जाहीर अभिवादन सभेत ना.रामदास आठवले बोलत होते. यावेळी ना.रामदास आठवले यांनी दिवंगत प्रतापसिंग बोदडे यांच्या शोकाकुल परिवाराची सांत्वनपर भेट घेऊन रिपब्लिकन पक्षातर्फे 5 लाख रुपये सांत्वनपर निधी बोदडे परिवाराला देण्याचे जाहीर केले. 


यावेळी दिवंगत प्रतापसिंग बोदडे यांच्या जाहीर अभिवादन सभेस राज्यभरातील आंबेडकरी कविगायक कलावंत परिवर्तन कला महासंघाच्या वतीने उपस्थित होते. दिवंगत प्रतापसिंग बोदडे हे परिवर्तन कला महासंघाचे केंद्रीय उपाध्यक्ष होते.


आपल्या गीतांतून ज्यांनी दिले आंबेडकरी विचारांचे धडे ;

ते आम्हाला सोडून गेले प्रतापसिंग बोदडे;

ते माझ्या पाठीशी राहिले खडे

दिसत नाहीत ते प्रतापसिंग बोदडे 

अशी कविता सादर करून ना.रामदास आठवले यांनी दिवंगत प्रतापसिंग बोदडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. 


यावेळी रिपाइं चे राज्य कार्याध्यक्ष बाबुराव कदम;मिलिंद शेळके; उत्तर महराष्ट्रा प्रमुख नेते रमेश मकासरे; परिवर्तन कला महासंघ कार्याध्यक्ष साहेबराव सुरवाडे;  जळगाव जिल्हा अध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी ; नगरसेवक रवी सपकाळे; लक्ष्मण जाधव; प्रकाश गायकवाड; कुंदन लाटे; गिरीश तायडे ;अश्विन वाघ  आदी या अनेक मान्यवर उपस्थित होते.


 रिपब्लिकन पक्ष हा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील पक्ष आहे. काही लोक रिपब्लिकन नाव पुसून टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. मी मात्र रिपब्लिकन पक्ष संपूर्ण देशात घेऊन गेलो आहे. त्यामुळे देशात रिपब्लिकन पक्ष मजबूत करण्यासाठी दिवंगत प्रतापसिंग बोदडे यांचा मला पाठिंबा होता असे ना.रामदास आठवले यावेळी म्हणाले. यावेळी ज्येष्ठ गीतकार लोकशाहीर प्रभाकर पोखरीकर; मैना कोकाटे; वैशाली शिंदे; शाहीर राजा कांबळे; दत्ता शिंदे;मुकुंद ओव्हाळ; राजू बागुल आदी अनेक गायक कलावंत उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages