अतिवृष्टीमुळे किनवट तालुक्यातील 61 हजार 832 हेक्टर क्षेत्र बाधित - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 24 July 2022

अतिवृष्टीमुळे किनवट तालुक्यातील 61 हजार 832 हेक्टर क्षेत्र बाधित



किनवट,दि. (प्रतिनिधी) : तालुक्यात पहिल्या पंधरवड्यात  चारवेळा झालेली अतिवृष्टी  व पूरपरिस्थितीमुळे शेकडो हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. कृषी व महसूल विभागाने दिलेल्या प्राथमिक अंदाजानुसार तालुक्यातील 62 गावातील 61 हजार 832 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सोबतच विविध गावांतील 81 घरांची पडझड झाली असून, 50 जनावरे दगावली आहेत.

      तालुक्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पावसाने सुरूवात केली. पुढील दहा दिवसात तालुक्यातील विविध मंडळात चार वेळा अतिवृष्टी झालेली आहे. त्यात शिवणीत 100 मि.मी.च्या वर तर इस्लूपर व जलधरा मंडळात तर 200 मि.मी.च्या जवळपास पाऊस कोसळून दाणादाण उडवून टाकले होते. मांडवा,दहेली व उमरीबाजार मंडळातही अतिवृष्टीच्या जवळपास पाऊस कोसळला. त्यामुळे तालुक्यातील सर्व शेतकर्‍यांची अक्षरश: त्रेधातिरपिट झाली होती.



        कृषी विभागाच्या अहवालानुसार किनवट तालुक्यातील यंदाच्या खरीप पिकांचे लागवडीखालील क्षेत्र 78 हजार 144 हेक्टर आहे. त्यानुसार दि.08 ते 14 जुलै दरम्यान झालेल्या अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे  79.13 टक्के पेरणीखालील पिकांचे क्षेत्र बाधित झालेले आहे. शेकडो हेक्टर शेतजमीनही खरडून गेलेली आहे. तहसील,पंचायत समिती व कृषीविभाग यांच्या संयुक्तविद्यमाने तलाठी,ग्रामसेवक व कृषीसहाय्यकांकडून तालुक्यातील नऊ मंडळातील पीक बाधित क्षेत्रांचे पंचनामे करणे चालू आहे.  अनेक शेतातील सखल भागातील पिके तीन ते चार दिवस सलग पाण्यात असल्यामुळे, ती पिके कुजण्याची भीती आहे. त्यामुळे हे साचलेले पाणी वेळीच प्रयत्नपूर्वक बाहेर काढण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

    तालुका कृषी विभागाच्या दि.15 जुलैच्या अंतीम खरीप पीक पेरणी अहवालानुसार 100 टक्के पेरणी झालेली आहे. खरीप हंगामासाठीचे सर्वसाधारण क्षेत्र 78 हजार 001 हेक्टर असून, यंदा 78 हजार 144 हेक्टरवर विविध पिकांची लागवड करण्यात आली आहे. तालुक्यातील पिकांचे प्रत्यक्ष पेरणी झालेले क्षेत्र पुढील प्रमाणे असून, कंसात त्याचे सर्वसाधारण क्षेत्र दिले आहे. कापूस 42,340 हेक्टर (48,072), सोयाबीन 25,062 हे.(18,203), भात 438 हे.(309),खरीप ज्वारी 713 हे.(2,249), मका 67 हे.(194),तूर 6,133 हे.(6,627), मूग 833 हे. (1,212), उडीद 780 हे.(1,119), उस 78 हे.,केळी 43 हे.,हळद 1,165 हे.,मिरची 54 हे.,अदरक 01, पपई 05 हे,भाजीपाला 432 हेक्टर.

      तालुक्यातील नगदी पिकांमध्ये कापसाचे क्षेत्र हे सर्वात जास्त जरी असले तरी, दरवर्षीच्या सरासरी क्षेत्रापेक्षा कापसाची लागवड सुमारे 12 टक्क्याने घटली असून, सोयाबीनच्या क्षेत्रात जवळपास 38 टक्क्याने वाढ झालेली आहे. यंदा भाताच्या लागवडीमध्ये 42 टक्क्याने वाढ झाली असून, खरीप ज्वारी व मका पिकाचे पेरणी क्षेत्र 65 ते 68 टक्क्याने कमी झालेले आहे. कापूस व सोयाबीन सारख्या सर्वात जास्त पेरणी झालेल्या नगदी पिकांनाच बाधा पोहोचल्यामुळे, गत तीन-चार वर्षाप्रमाणे यंदाही निसर्ग शेतकर्‍यांच्या जीवावरच उठल्यासारखे चित्र आहे.

No comments:

Post a Comment

Pages