पीक विम्याची मुदत 15 दिवस वाढवून द्या - अशोक नेम्मानीवार - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 24 July 2022

पीक विम्याची मुदत 15 दिवस वाढवून द्या - अशोक नेम्मानीवार

किनवट,दि.23 :  मागील पंधरा दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे किनवट व माहूर तालुक्यातील शेतकर्‍यावर ओढवलेले संकट लक्षात घेऊन पंतप्रधान पिक विमा भरण्यास 15 दिवसाची मुदत वाढवून द्यावी. तसेच शेतकर्‍यांना सरसकट हेक्टरी 50 हजार रुपयांची तातडीची मदत द्यावी अशी मागणी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव नेम्मानीवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.


      तहासीलदारांमार्फत पाठविण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले की, नांदेड जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या व मागास दुर्गम म्हणून ओळखल्या जाणार्‍या किनवट व माहूर या दोन्ही तालुक्यात या वर्षी अतिवृष्टीने हाहाकार उडविला असून, खरीप पिकांची उगवण झाल्यानंतर मागील पंधरा दिवसात दोन्ही तालुक्यातील सर्वच मंडळात मुसळधार पाऊस होऊन, शेतकर्‍यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. नदी नाल्याना पूर येऊन शेतजमिनीसह पिके खरडून गेली आहेत. या अतिवृष्टीत शेतकर्‍यांची अनेक जनावरे मृत्युमुखी आणि पुरात वाहून गेली आहेत. अनेक गावांत घरांची पडझड होऊन संसार उघड्यावर आले आहेत. दरम्यान यावर्षीच्या खरीप हंगामासाठी शासनाने 31 जुलै 2022 रोजीपर्यंत पंतप्रधान पीक विमा भरण्याची तारीख दिली होती; परंतु मागील 15 दिवसातील नैसर्गिक आपत्ती पाहता अनेक गावांचा तालुक्याशी संपर्क तुटल्याने शेतकर्‍यांना पीक विमा निर्धारित वेळेत भरणे दुरापास्त बनले आहे. त्याचबरोबर संततधार पावसामुळे वारंवार कनेक्टिव्हिटीची तांत्रिक अडचण उद्भवत असल्याने शेतकर्‍यांची गैरसोय होत आहे.  शेतकर्‍यांसाठी  31 जुलैपर्यन्तचा कालावधी अपुरा पडून हजारो शेतकरी विम्यापासून वंचित राहण्याची शक्यता असल्यामुळे 31 जुलै नंतर किमान 15 दिवसाची मुदत वाढवून द्यावी. त्याचबरोबर किनवट व माहूर या दोन्ही तालुक्यातील शेतकर्‍यांना सरसकट हेक्टरी 50 हजार रुपयांची  तातडीची आर्थिक मदत तसेच घर आणि जनावरांच्या नुकसानीचे पंचनामे करून  योग्य ते  सानुग्रह अनुदान देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी अशोकराव नेम्मानीवार यांनी केली आहे

No comments:

Post a Comment

Pages