आर्थिक साक्षरतेसह आरोग्यदायी राहण्याचा संदेश गावागावात पोहोचवा -जिल्हाध‍िकारी सुनील चव्हाण - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 20 July 2022

आर्थिक साक्षरतेसह आरोग्यदायी राहण्याचा संदेश गावागावात पोहोचवा -जिल्हाध‍िकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद  दि. 20  : आर्थिक साक्षरता, डिजिटल साक्षरता, आर्थिक श‍िस्त ही काळाची गरज आहे. त्याचबरोबर प्रत्येकाने तंदुरूस्त आरोग्याची  जपणूक करणे देखील महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँक आयोजित सायकल रॅलीतून आर्थिक साक्षरतेसह आरोग्याचा संदेश गावागावात पोहोचवून लोकांमध्ये जागृती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले. 

गोलवाडी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या मुख्य कार्यालयात देशाच्या 75 व्या अमृत महोत्सव आण‍ि महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या 13 व्या वर्धापन दिनानिमित्त नाबार्ड आण‍ि महाराष्ट्र ग्रामीण बँक आयोजित चेतना सायकल रॅलीला झेंडी दाखवताना श्री. चव्हाण बोलत होते. कार्यक्रमास नाबार्डचे सरव्यवस्थापक एम.जे. श्रीनिवासुलू, बँकेचे अध्यक्ष  मिलिंद घारड, मुख्य सरव्यवस्थापक संजय वाघ व मराठवाड्यातील बँकेचे क्षेत्रीय अध‍िकारी, कर्मचारी आदी उपस्थ‍ित होते. 

 जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, महाराष्ट्र ग्रामीण बँकेची कामगिरी सर्वच क्षेत्रात उत्तम आहे. नागरिकांनी घेतलेले कर्ज वेळेत परत करण्याबाबत बँकेने अध‍िकाध‍िक जागृती करणे गरजेचे आहे. कर्ज परत करण्याची सवय नागरिकांना लागणे अत्यंत आवश्यक आहे. त्यातूनच त्यांच्या व्यवसायात वृद्धी होऊन व्यवसायास चालना  मिळते, याचे महत्त्वही बँकेने कर्जदारांना पटवून देण्याचे आवाहन श्री. चव्हाण यांनी केले. तसेच रॅलीतील सर्व सहभागींना शुभेच्छा दिल्या.

नाबार्डचे श्रीन‍िवासुलू यांनी रॅलीचे कौतुक करतानाच निसर्गाचा अंदाज घेत सहभागी सायकलपटूंनी मार्गक्रमण करावे असे सांगत सर्वांना शुभेच्छा  दिल्या. सुरूवातीला संपूर्ण बँक कामकाजाची माहिती  जिल्हाध‍िकारी चव्हाण यांना देण्यात आली. त्यांनीही संपूर्ण बँकेची पाहणी केली. त्याचबरोबर श्री. चव्हाण यांच्याहस्ते बँकेच्या क्षेत्रीय अध‍िकाऱ्यांना बँकेकडून देण्यात आलेल्या चारचाकी वाहनांचे वितरणही करण्यात आले.  

मराठवाड्यातील आर्थिक साक्षरता व वित्तीय सामावेशन, सामाजिक सुरक्षा योजनाचा प्रचार व प्रसार, शंभर टक्के पीक कर्ज नूतनीकरण – वितरण , महाग्रमीण बळीराजा तारणहार योजना  आदी बाबींचा अंतर्भाव असलेल्या सायकल जनजागृती रॅलीला औरंगाबादच्या गोलवाडीतील बँकेच्या मुख्य कार्यालयापासून प्रारंभ झाला. 

मराठवाड्यातील 30 गावातून व सर्व जिल्ह्यातून “वित्तीय समावेशन व आर्थिक साक्षरता अभियान”  550  किमी अंतर पार करणारी सायकल रॅलीत बँक अध‍िकारी, कर्मचारी यांचा समावेश आहे. औरंगाबाद, जालना , बीड , परभणी , नांदेड, लातूर जिल्ह्याच्या मार्गाने रॅलीचा समारोप उस्मानाबादेतील उमरग्यात 31 जुलै समारोप होणार आहे. बँकेच्या तीसहून अध‍िक शाखांतून रॅली जाणार असून शंभरांवर गावातून मेळावेही घेण्यात येणार आहेत.  थकित पीक कर्ज सवलतीत परतफेड व पुन्हा नवीन पीक कर्ज अशी अभिनव ‘महाग्रमीण बळीराजा तारणहार योजना’  बँके मार्फत राबविण्यात येते. त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा. केंद्र सरकारमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध सामाजिक सुरक्षा योजनांचाही लाभ ग्रामीण भागातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा, असा रॅलीचा उद्देश असल्याचे श्री. घारड यांनी सांगितले.

महाराष्ट्र ग्रामीण बँकेने या खरीप हंगामात आजपर्यंत दोन लक्ष आठ हजार 282 शेतकऱ्यांना  एक हजार 756 कोटीचे पीक कर्ज किसान क्रेडीट कार्ड योजनेंतर्गत वाटप केलेले आहे.  मागील वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण दुप्पट असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या उपक्रमात  वित्तीय समावेश व आर्थिक साक्षरता मेळावा घेण्यात येणार आहेत . या  मेळाव्यात बहुसंख्येने ग्रामीण व शहरी नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही घारड यांनी  केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष प्रभावती यांनी केले. आभार श्री. घारड यांनी मानले. 


No comments:

Post a Comment

Pages