किनवट,दि.20 (प्रतिनिधी) : उर्ध्व पैनगंगा प्रकल्प र्ईसापूर धरणाचा पाणीसाठी 75 टक्के झाल्यामुळे, किनवट तालुक्यातील पैनगंगा नदीकाठच्या पूरप्रवण गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
ईसापूर धरण येथील उपविभागीय अभियंता तथा पूरनियंत्रण अधिकारी एच.एस.धुळगंडे यांनी किनवटच्या तहसीलदारांना पैनगंगेकाठच्या गावांना सावधान करण्यासाठी पत्राद्वारे कळविले असून, त्यात म्हटले आहे की, सोमवारी (दि.18) दुपारी एक वाजता ईसापूर धरणाची पाणी पातळी 440.60 मी.झाली असून, जिवंत पाणी साठा 722.27 द.ल.घ.मी.अर्थात 75 टक्के इतका झाला आहे. सद्यस्थितीत ईसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असून, धरणात पाण्याचा येवा सुरू असल्याने पाणी पातळीत वाढ होत आहे.
सदरील पाण्याचा येवा पाहता ईसापूर धरणाचा मंजूर जलाशय प्रचालन आराखडा (आर.ओ.एस.) (75 टक्के विश्वासार्हतानुसार) येत्या 31 जुलैपर्यंत पाणी पातळी 440.12 मीटर (91.43 टक्के ) ठेवावी लागणार आहे. त्यामुळे धरणात येणारे या अतिरीक्त पाणी धरण सुरक्षिततेच्यादृष्टीने ईसापूर धरणातून वक्रद्वारे उघडून सांडव्याद्वारे कोणत्याही क्षणी पैनगंगा नदीपात्रात सोडावे लागणार आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊन पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. धरणामध्ये येणार्या पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे अथवा कमी करणे याबाबतचा निर्णय वेळोवेळी घेण्यात येऊन तसे अवगतही करण्यात येणार आहे.
किनवट तालुक्यातील पैनगंगेच्या काठावरील पूरप्रवण गावांमध्ये किनवट, गोकुंदा, खालचे मारेगाव, आंजी, पांधरा, सिंदगी, मोहपूर, बेल्लोरी ज.,भंडारवाडी,कोपरा, पिंपरी, भुलजा, मदनापूर, कोठारी चि., येंदा, पेंदा, कमठाला, मलकजाम, पाथरी, रामपूर, सक्रूनाईक तांडा, पार्डी सी.(दुर्गापेठ),वाळकी बु.(सहस्त्रकुंड), उनकदेव, पिंपळशेंडा, बोधडी खु., खंबाळा या 27 गावांचा समावेश असून, या सर्व गावांतील ग्रामस्थांची संभाव्य पुराच्या पाण्यामुळे जिवित वा वित्त हानी होऊ नये म्हणून गावातील नागरिकांनी आपापली गुरेढोरे, घरगुती व शेती उपयोगी सामान सुरक्षित स्थळी हलवावे तसेच नागरिकांनीही सुरक्षित स्थळी स्थलांतर करून कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये म्हणून खबरदारी घ्यावी, अशा सूचना तहसील प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत.
No comments:
Post a Comment