किनवट,दि.27 (प्रतिनिधी) : मान्सूनचा आस उत्तरेकडे सरकत असल्याचे संकेत असल्यामुळे राज्यात सुरू असलेला पाऊस उघडीप देण्याची चिन्हे असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला असला तरी, किनवट तालुक्यात मात्र पावसाचे थैमान थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. दररोज तालुक्यातील बहुतांश भागात पावसाचे बरसणे सुरूच आहे. मंगळवारी सकाळच्या नोंदीनुसार जलधरा मंडळात या महिन्यातील चौथी अतिवृष्टी झालेली असून, 4 जुलै पासूनची तालुक्यातील ही सहावी अतिवृष्टी आहे. उर्वरीत आठ मंडळातही दमदार पाऊस झालेला आहे. मंगळवारी (दि.26) सकाळी संपलेल्या 24 तासात तालुक्यातील नऊ मंडळातील एकूण पाऊस 381.1 मि.मी.झाला असून, त्याची सरासरी 42.34 मि.मी.आहे.
मंगळवारी सकाळी संपलेल्या गत 24 तासात किनवट तालुक्यातील पावसाची नोंद पुढील प्रमाणे असून, कंसात 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या मंडळनिहाय एकूण पावसाची नोंद दिलेली आहे. किनवट- 25.8 (751.5 मि.मी.); बोधडी- 25.8 (828.7 मि.मी.); इस्लापूर- 40.5 (1018.8 मि.मी.); जलधरा- 68.8 (954.0 मि.मी.); शिवणी- 35.8 (870.4 मि.मी.); मांडवी-50.8 (611.0 मि.मी.); दहेली- 50.8(596.2 मि.मी.), सिंदगी मोहपूर 32.0(690.4 मि.मी.); उमरी बाजार 50.8 (638.5 मि.मी.).
तालुक्यात एक जूनपासून नऊ मंडळात मिळून मंगळवार (दि.26) पर्यंतचा पडलेला एकूण पाऊस 6,959.5 मि.मी.असून, त्याची सरासरी 773.28 मि.मी.येते. आजघडीला तालुक्यात सर्वाधिक पाऊस इस्लापूर मंडळात झालेला असून, सर्वात कमी दहेली मंडळात झालेला आहे. तालुक्यात मंगळवार दि.26 जुलैपर्यंत पडणारा अपेक्षित सरासरी पाऊस 438.8 मि.मी.असून, या तुलनेत 176.3 टक्के पाऊस पडलेला आहे. अर्थात 76.3 टक्के पाऊस जास्तीचा पडलेला आहे. 01 जून ते 30 सप्टेंबर या पावसाळ्यातील चार महिन्यादरम्यान तालुक्यात पडणारा वार्षिक पाऊस 951.90 मि.मी. असून, या तुलनेत आतापर्यंत तालुक्यात 81.25 टक्के पाऊस पडलेला आहे. मागील वर्षी 26 जुलैपर्यंत पडलेला पाऊस 746.10 मि.मी. होता. 30 सप्टेंबर पर्यंतच्या वार्षिक पावसाच्या तुलनेत त्याची टक्केवारी 170.03 होती.
सततच्या पावसामुळे तालुक्यातील बहुतांश भागातील जमिनी चिबडून गेलेल्या आहेत. सूर्यदर्शनच नसून पावसाची रिपरिप सातत्याने चालूच असल्यामुळे जमीन वाफश्यावर येतच नाहीए. परिणामी पिके वाचविण्याची आशाच मावळली आहे. दरम्यान अतिवृष्टी व पूरपस्थितीमुळे पिके हातची गेल्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून, शासकीय मदत देऊन हताश शेतकर्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी सर्वच राजकीय पक्षाकडून होत आहे.
No comments:
Post a Comment