संघराज्यव्यवस्था संघाच्या विरोधात ! - श्रीरंजन आवटे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 9 August 2022

संघराज्यव्यवस्था संघाच्या विरोधात ! - श्रीरंजन आवटे

अखेरीस नितीश कुमारांनी पुन्हा एकदा उडी मारली. भाजपसोबतची साथ सोडली. पुन्हा राष्ट्रीय जनता दल आणि कॉन्ग्रेससोबत आघाडी उघडली. योगायोग असा की महाराष्ट्रात सूरत-गुवाहाटी-पणजी असा प्रवास करुन आलेल्या एकनाथांच्या सरकारच्या बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळाचा शपथविधी सुरु असतानाच बिहारमध्ये भाजप-शासित राज्यातलं सरकार कोसळलं !


नितीश यांनी या आधी पाच वेळा कोलांटउड्या मारल्या आहेत. त्यामुळं या नव्या कोलांटउडीने मोदीभक्त नाराज होतील, मोदीविरोधक सुखावतील. यात नवं काहीच नाही मात्र मुद्दा कोलांटउडीपुरता मर्यादित नाही. कोणी सुखावण्या-दुखावण्यापुरताच नाही.


या आधी नितीश कुमारांनी भाजपची साथ सोडली तेव्हाची भाजप वेगळी होती. तेव्हा मोदी-शहा या जोडगोळीने संघाचा आणि भाजपचा ताबा घेतलेला नव्हता. संसदीय पक्षीय चौकट वेगळी होती. मोदी सरकारने २०१४ ते २०१९ या काळात सा-या संवैधानिक संस्थांवर पकड मिळवली. न्यायालयं काबीज केली. इतर सा-या पक्षांना आपल्या पंखाखाली घेतलं. त्यांना हेतूतः संपवण्याचा प्रयत्न केला. स्वायत्त संस्थांचा बेलगाम गैरवापर केला. निवडणुकीत जिंकायचे किंवा हारले तर जिंकलेल्या पक्षाला मनी, मसल आणि इडी-सीबीआय वापरुन फोडायचे, यालाच ‘ऑपरेशन लोटस’ असे नाव आणि तो करणारा ‘चाणक्य’ राव !


योगेंद्र यादवांनी ‘मेकिंग सेन्स ऑफ इंडियन डेमॉक्रसी’ या आपल्या पुस्तकात २०१९ पासूनचे देशातील गणराज्य हे ‘गणराज्य २.०’ आहे, असं म्हटलं. हा शाब्दिक खेळ नव्हे किंवा पोकळ शेरेबाजी नव्हे. गेल्या काही वर्षात देशाची रचना बदलली. राजकारणाचा अर्थ बदलला. राजकीय संस्कृतीने रंग पालटला. त्यामुळं आधीच्या देशापेक्षा हा ‘नवा भारत’ वेगळा आहे तो अनेक अर्थांनी.


नितीश कुमारांनी भाजपला दिलेला धक्का या नव्या भारतातला आहे, म्हणून तो महत्वाचा आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबतची युती तोडत कॉन्ग्रेस, राष्ट्रवादीसोबत उघडलेली महाविकास आघाडी यासाठीच लक्षवेधी ठरली. राजस्थानात पायलटांचे विमान उडण्यापूर्वीच गेहलोत ते रोखू शकले, याचं मोल यामुळेच तर आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी भाजपला पूर्णपणे धोबीपछाड दिला.  अवघ्या दोन आठवड्यांपूर्वी छत्तीसगढमध्ये भाजपने अविश्वासाचा प्रस्ताव आणला होता. ९० आमदारांपैकी ७१ आमदार असणा-या सत्ताधारी कॉन्ग्रेसला असुरक्षित करण्याचा प्रयत्न केला गेला. सरकार टिकले, भाजप तोंडावर पडले; पण त्यातून सर्व बिगर-भाजप राज्य सरकारांना असुरक्षित करण्याचा अगतिक प्रयत्न झाला. राज्यांनी केंद्राच्या आक्रमणाला या ना त्या प्रकारे प्रतिरोध करण्याचे केलेले हे प्रयत्न. निवडणुकीच्या स्पर्धात्मक रिंगणातले आपणच अनभिषिक्त सम्राट आहोत, हा भ्रम दूर करण्यात प्रादेशिक राजकीय पक्षांना यश आलं.


२०१७ ला नितीश कुमारांनी महागठबंधनमधून बाहेर पडत भाजपसोबत दोस्ती केली खरी; पण त्यानंतर त्यांचा आवाज क्षीण होत गेला. २०१९ लोकसभा निवडणुकीनंतरच्या केंद्र सरकारच्या शपथविधीलाही ते गैरहजर राहिले होते. २०२० साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत तर ते अगतिक, हतबल दिसले. एक बाजूला कल्याणकारी योजना यशस्वीपणे राबवणारा मुख्यमंत्री तर दुस-या बाजूला तळ्यात-मळ्यात करणारा ‘रंगबदलू गिरगीट’ अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली.


भाजपने जेडीयुला संपवण्याचा प्रयत्न केला हा नितीश यांचा आरोपही खरा आहे आणि मित्रपक्षांना संपवणं हा भाजपचा इतिहास राहिलेला आहे. नुकतंच भाजपचे पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांनी इतर पक्ष संपतील आणि केवळ भाजप उरेल असं म्हणत जणू ‘वन नेशन, वन पार्टी’ ची मांडणी केली नंतर भाजपची ‘मन की बात’ अशी पोटातून ओठात आल्यानं नड्डांची भलामण करताना भलतीच तारांबळ झाली, हा भाग वेगळा.


भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मूळ तत्त्व आहे एकचालुकानुवर्तित्व. अर्थात एकाच्या मतानुसार इतर सर्वांनी आज्ञांचं अनुपालन करणं. या संस्थेच्या पायावर उभारलेल्या भाजपची हुकूमशाही प्रत्यक्षात आणायची तर एकछत्री अंमल हवा. हा एकछत्री अंमल यावा, याकरता भाजप कोणत्याही थराला जाऊ शकते.


वर्षभर चाललेल्या शेतकरी आंदोलनाने मोदींची गुर्मी उतरवली. ‘अपराजित योद्धा’ अशा लार्जर दॅन लाइफ असलेल्या ५६ इंची शूरत्वाच्या पोकळ प्रतिमांचा इमला गडगडला. अकाली दलालाही NDA तून अकाली बाहेर पडावं लागलं. मोदींचं गर्वहरण ही बाब कोणत्याही निवडणुकीतील विजयाहून मोठी गोष्ट होती नि आहे. कृषी कायदे मागे घेणं असो की एनआरसी-सीएए लांबणीवर पडणं असो, धोरणात्मक पातळीवर आपला अजेंडा पुढं रेटणं सोपं नाही, हे नागरिकांनी भाजपला दाखवून दिलं.


महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंचे प्रायोगिक नाट्य न्यायपालिकेच्या तर्कावर कितपत टिकते, हे यथावकाश कळेलच; पण महाविकास आघाडी प्रयोगाने भाजपला प्रतिकार करण्याचा सक्षम प्रयत्न केला, हे निस्संशय. बिहार त्या मार्गाने जात आहे. हा शहांसारख्या तथाकथित चाणक्याला दिलेला धक्का आहे. नितीश यांची आताची खेळी अमित शहा गृहमंत्री असलेल्या देशातली आहे, म्हणून ती महत्वाची आहे, निर्णायक ठरु शकेल, अशी आहे.


मोदींची ‘अपराजित योद्धा’ ही प्रतिमा भंगणं आणि शहांची ‘मुत्सद्दी चाणक्य’ या धारणेचं खंडन होणं ही राजकीय मानस बदलण्याच्या दृष्टीने कळीची घटना आहे. मोदी-शहा ‘काहीही’ करु शकतात आणि त्यापुढं आपण हतबल आहोत, ही धारणा सामान्य नागरिक, विरोधी पक्ष आणि दस्तुरखुद्द संघ-भाजपमधील लोकांचीही आहे. ही धारणा तुटली की मग लढाई सोपी असते. ‘यहां से पचास पचास मील दूर जब बच्चा रोता है तब मां कहती है, सो जा, नही तो गब्बर आयेगा’ हा सुप्रसिद्ध संवाद आहे शोलेमधला. गब्बरचं गब्बरपण या लहान पोराला वाटणा-या भीतीत असतं. ती भीती संपली की अनभिषिक्त सम्राटाचे तख्त उद्ध्वस्त करायला वेळ लागत नाही. गोरख पांडे म्हणतात त्याप्रमाणे ‘एक दिन गरीब और निहत्थे लोग उनसे डरना बंद कर देंगे यहीं उनका डर है!’


ही भीती संपली की एकचालुकानुवर्तित्वाला तडा जातो. संघाचं हे मूळ तत्त्व. भारतीय संविधानाचं मूळ तत्त्व मात्र संघराज्यवाद. हा संघराज्यवादच संघाच्या मूळ तत्त्वाच्या विरोधात आहे. या तत्त्वात राज्यांचं प्रतिनिधीत्व तर आहेच पण त्यासोबत जोडून येणारी विविधताही आहे. भारतीय गणराज्याची मूळ स्थापनाच या विविधतेवर, संघराज्याच्या तत्त्वावर झालेली आहे. भारत हे संघराज्य आहे, असं संविधानाचं पहिलं कलम सांगतं; संघवाल्यांचं नव्हे !


त्यामुळं भाजपला विरोध करणं या एकमात्र उद्देशावर विरोधी पक्षांना एकत्र येऊन चालणार नाही तर संघराज्यवादासोबत येणा-या विविधतेचं महत्व त्यांना लक्षात घ्यावं लागेल. त्यासह धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाचा विसर पडू देता कामा नये. थोडक्यात, भाजपशी लढायचं तर प्रसंगी राजकीय, निवडणुकीय रिंगणातलं नुकसान सहन करत वैचारिक निष्ठेसह, नैतिक अढळतेसह खंबीरपणे उभा रहावं लागेल; अन्यथा नितीश यांच्यासारख्या कोलांटउड्या पडत राहतील आणि कधी या बाजूने तर कधी त्या बाजूने टाळ्यांचा, उन्मादी स्वरांचा आवाज येत राहील. नितीश यांच्या आजच्या धाडसी खेळीने बदलाच्या दिशेने एक लक्षवेधी पाऊल पडलं आहे. पुढे कोणती दिशा स्वीकारली जाते यावर आजच्या खेळीचं निर्णायक वळण ठरणार आहे. या क्षणाला भाजपचं एकछत्री अंमल साधण्याचं स्वप्न मात्र दृष्टिपथात आलेलं नाही, हे निश्चित !                  

                         - श्रीरंजन आवटे

No comments:

Post a Comment

Pages