किनवट,दि.09 : पाऊस पिच्छा सोडत नसून, अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे तालुक्यातील बहुतांश भागात पाणी साचून व जमीन खरवडून पिकांना अतोनात हानी पोहोचली आहे. सोबतच अतिपावसामुळे शेतजमिनीतील मूलद्रव्यांचे प्रमाण कमी झाल्यामुळे उरली-सुरली खरीप पिके पिवळी पडलेली असून, त्यांची वाढ खुंटलेली आहे. परिणामी शेतकर्यांच्या चिंता वाढलेल्या आहेत.
किनवट तालुक्याचे भौगोलीक क्षेत्र 1 लाख 56 हजार 753.70 हेक्टर असून, खरीपातील सर्वसाधारण लागवडीलायक क्षेत्र 78 हजार 001 हेक्टर आहे. यंदाच्या खरीप हंगामात तालुक्यातील नऊ महसूल मंडळातील 171 गावांमध्ये 78 हजार 144 हेक्टर क्षेत्रावर 100.18 टक्के पेरणी झाली आहे. जुलै महिन्यातील तब्बल सहा अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे वाढीच्या अवस्थेतील कापूस, सोयाबीन, तूर,मूग,उडीद व ज्वारी ही पिके पार चिबडल्या गेलीत तर काही ठिकाणी तर अक्षरश: भूईसपाट झालीत. एक-दोन दिवस सोडले तर पाऊस मात्र थोडी सुद्धा उसंत न घेता बरसतच आहे. त्यामुळे वाफसा आल्यानंतर डवरणीने शेत भुसभुशीत करून, निंदणाद्वारे तण साफ केल्यानंतर थोडीफार तगलेली काही पिके हाती येतील ही आशाही मावळल्या गेली आहे.
नगदी पिकातील कापसाचे पेरणी झालेले क्षेत्र तालुक्यात 42 हजार 340 हेक्टर,सोयाबीनचे क्षेत्र 25 हजार 062 हेक्टर तर तुरीचे 6 हजार 133 हेक्टर आहे. सततच्या पावसाने जमिनीत पाणी साचून मूळे कुजणे, पाने पिवळी पडणे, मर रोगामुळे झाडे कोमेजून मरणे अशा समस्या उद्भवल्या आहेत. सर्वच पिकांवर रस शोषण करणार्या किडींचा अर्थात मावा,तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी आदींचा प्रादुर्भाव झालेला आहे. अशा परिस्थितीत जैविक कीटकनाशकाचा वापर म्हणजे निंबोळी अर्क 5 टक्के 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्याची शिफारस तालुका कृषी विभागातर्फे करण्यात आली आहे. जमिनीतील मूलद्रव्यांची कमतरता नाहीशी होऊन पिकांच्या जोमदार वाढीसाठी 19:19:19 हे विद्राव्य खत 50 ग्रॅम अधिक मायक्रोन्युट्रीन ग्रेड-2(माक्रोला (आरएफसी), कीसाईट-जी (रानडे) हे प्रती 10 लिटर पाण्यात 50 मिली मिसळून फवारणी करावी असे कृषी विभागाने सुचविले आहे.
कमी कालावधीत येणाऱ्या पिकांत मुगाचे पेरणी क्षेत्र 833 हेक्टर, उडीदाचे 780 हेक्टर तर खरीप ज्वारीचे 713 हेक्टर आहे. ही पिके सुद्धा अतिपावसामुळे धोक्यात आली असून, अनेक ठिकाणी सडून गेली आहे. त्यामुळे पावसाने थोडी विश्रांती घेतल्यानंतर वाफसा मोडल्याशिवाय शेतकऱ्याला कोणतीच हालचाल करणे अशक्य झालेले आहे. अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्यासाठी कृषी विभागाकडून जनजागृती केली जात आहे.
“ हवामान विभागाच्या सांगण्यानुसार येत्या तीन-चार दिवसानंतर पावसाचा जोर थोडा कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दरम्यानच्या काळात शेतामध्ये पाणी साठून राहणार नाही यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पाण्याचा निचरा करण्यासाठी उताराकडच्या बांधाकडून चर खोदावी लागणार आहे. या माध्यमातून साठलेले पाणी वावराबाहेर काढले म्हणजे सोयाबीन व इतर पिके हे पिवळे पडणार नाही. शिवाय आणखी पाऊस झाला तरी चरीद्वारे पाणी शेताबाहेर जाईल. वाफसा होताच सुक्ष्म मुलद्रव्ये व रस शोषण करणाऱ्या किटकांसाठीची फवारणी करणे गरजेचे आहे.”
बालाजी मुंडे. तालुका कृषी अधिकारी, किनवट.
No comments:
Post a Comment