मतदार ओळखपत्र आधारला जोडणार -जिल्हाधिकारी • मतदार यादी सुधारणा कार्यक्रम 1 ऑगस्टपासून - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 1 August 2022

मतदार ओळखपत्र आधारला जोडणार -जिल्हाधिकारी • मतदार यादी सुधारणा कार्यक्रम 1 ऑगस्टपासून

 औरंगाबाद, दि. 01 :- जिल्ह्यातील मतदारांनी आधार क्रमांकाची जोडणी करून या मोहिमेत पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले. 

 जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय पक्ष प्रतिनिधीच्या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, उपजिल्हाधिकारी डॉ. भारत कदम, उपजिल्हाधिकारी संगीता सानप, जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षाराणी भोसले, तिसगावचे उपसरपंच नागेश कुठारे, संजय जाधव, प्रशांत मस्के, महमद शेख, भगूरचे ग्रामविकास अधिकारी बी. आर. दाणे, याच्यांसह विविध पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

 जिल्ह्यात एकूण 29 लाख 31 हजार 420 मतदार आहेत. या सर्व मतदारांचे आधार संलग्निकीकरण मतदार यादीशी केले जाणार आहे. 

 भारत निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र शासन, विधी व न्याय मंत्रालय यांच्याद्वारा निवडणूक कायदा (सुधारणा) अधिनियम,2021 अन्वये लोकप्रतिनिधित्व अधिनियम,1950 मध्ये सुधारणा केल्या आहेत. लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 मधील कलम 23 मधील दुरुस्तीने स्पष्टपणे नमूद केले आहे की, विद्यमान मतदारांकडून आधार संलग्नाचा उद्देश मतदारांची ओळख प्रस्थापित करणे आणि मतदार यादीतील नोंदींचे प्रमाणीकरण करणे आणि एकापेक्षा जास्त मतदार संघात किंवा एकापेक्षा जास्त वेळा त्याच मतदार संघात एकाच व्यक्तीच्या नावाची नोंदणी ओळखणे हा आहे. या कार्यक्रमाचा उद्देश कायदेशीर तरतुदीस अनुसरून आहे. तथापि, आधार क्रमांक सादर करणे मतदारांच्या वतीने ऐच्छिक आहे. 

 कायदा आणि नियमांमध्ये केलेल्या सुधारणांनंतर, मतदार नोंदणी अधिकारी (ERO)  मतदार यादीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून विहित स्वरूपात आणि रितीने आधार क्रमांक मिळविण्यासाठी वैधानिकरित्या प्राधिकृत करण्यात आलेले आहेत. लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 मधील कलम 23 मधील तरतुदीनुसार मतदार यादीतील विद्यमान मतदारांना त्यांच्या आधार क्रमांक भरण्यासाठी मतदार नोंदणी नियम 1960 मधील नियम 26 ब मध्ये नमुना अर्ज क्र. 6 ब तयार करण्यात आला आहे. अर्ज क्र. 6 ब भारत निवडणूक आयोगाच्या आणि मुख्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. मतदारांना ऑनलाईन पध्दतीने आधार क्रमांक भरण्यासाठी अर्ज क्र. 6 ब ERO Net, GARUDA, NVSP, VHA या माध्यमांवर देखील उपलब्ध असेल. तसेच अर्ज क्र. 6 ब च्या छापील प्रती देखील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 

 ऑनलाईन पध्दतीने आधार क्रमांक भरण्यासाठीची सुविधा पोर्टल, अॅपच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. त्यामध्ये स्व-प्रमाणीकरण भारत निवडणूक आयोगाने विकसित केलेल्या पोर्टल, अॅपच्या माध्यमातून मतदार ऑनलाईन पद्धतीने अर्ज क्र. 6 ब भरून आधार क्रमांक नोंदवू शकतो आणि UIDAI कडे नमूद असलेल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त OTP द्वारे आधारचे प्रमाणीकरण करु शकतो. तथापि, तपशिलात फरक असल्यास प्रमाणीकरण अपयशी ठरण्याची शक्यता आहे.

  स्व-प्रमाणीकरणाशिवाय जर मतदारास स्व-प्रमाणीकरण करावयाचे नसल्यास किंवा प्रमाणीकरण अपयशी ठरत असल्यास, मतदार त्याचा स्व-प्रमाणीकरणाशिवाय ऑनलाईन पध्द्तीने अर्ज क्र. 6 ब भरून त्यासोबत योग्य दस्तावेज सदर करू शकतो. अर्जाद्वारे घरोघरी भेटी देऊन मतदारांकडून छापील नमुना अर्ज क्र. 6 ब द्वारे स्वेच्छेने आधार क्रमांक गोळा करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांची नियुक्ती मतदार नोंदणी अधिकारी यांचेद्वारे करण्यात आलेल्या आहेत. 

 मतदार यादीतील कोणत्याही विद्यमान मतदारांचा आधार क्रमांक सादर करण्यास असमर्थतेच्या आधारावर मतदार यादीतील कोणतीही नोंद वगळण्यात येणार नाही.

 ‘हर घर तिरंगा’ मध्ये सहभागी व्हा !

  हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत जास्तीत जास्त नागरिकांनी घरावर तिरंगा 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत फडकवावा. यासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. यामध्ये अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी चव्हाण यांनी केले. प्राथमिक स्वरूपात तिसगावचे उपसरपंच नागेश कुठारे, संजय जाधव व ग्रामविकास अधिकारी अशोक गायकवाड आणि भगूरचे ग्रामविकास अधिकारी बी. आर. दाणे यांना जिल्हाधिकारी चव्हाण यांनी राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक प्रदान केला.


No comments:

Post a Comment

Pages