प्रकल्प कार्यालयांतर्गत सर्व प्रतिनियुक्त्या रद्द करण्यासह मूलभूत सोयींची मागणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 2 August 2022

प्रकल्प कार्यालयांतर्गत सर्व प्रतिनियुक्त्या रद्द करण्यासह मूलभूत सोयींची मागणी

किनवट, (प्रतिनिधी) :  किनवट प्रकल्प कार्यालय अंतर्गतच्या आश्रम शाळा, मुला मुलींची वसतीगृहे आणि एकलव्य विद्यालयातील शिक्षकांची रिक्तपदे तात्काळ भरून प्रतिनियुक्त्या रद्द कराव्यात. सोबतच विद्यार्थ्यांना शैक्षणिक व मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात यासह विविध मागण्यांचे निवेदन विद्यार्थी नेते विकास कुडमते यांनी प्रकल्प अधिकार्‍यांना दिले असून, पंधरा दिवसात मागण्यांची पूर्तता न झाल्यास प्रकल्प कार्यालयासह आश्रमशाळांना टाळे ठोकण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे


        निवेदनात नमूद केले आहे की, किनवट प्रकल्पांतर्गत असलेल्या शासकीय आश्रम शाळा, निवासी आश्रम शाळा, मुला मुलींचे वसतीगृह तसेच एकलव्य विद्यालयात मागील बर्‍याच दिवसांपासून शिक्षक व कर्मचार्‍यांची  शेकडो पदे  रिक्त असून विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या शैक्षणिक सुविधा मिळत नसल्याने, आदिवासी विद्यार्थी संताप व्यक्त करत आहेत.  प्रतिनियुक्त्यांमुळे शाळा वसतिगृहाची अवस्था बिकट झालेली आहे. क्रीडा मैदान व खेळाअभावी  आदिवासी विद्यार्थी क्रीडा क्षेत्रात यश मिळवण्यात कमी पडतांना दिसत आहेत. डीबीटी वेळेवर पुरवठा होत नसल्याने  जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी मनस्ताप होत असून, पेयजलशुद्धीकरण केंद्रे कार्यान्वित  नसल्याने,  दूषितपाण्यामुळे साथीचा आजार फैलावत आहे. संरक्षण भिंतीअभावी जंगलव्यापी निवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षा अधांतरी असून, रिक्त पदाचा फटका  विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याला बसत आहे.


      यावर्षी  सत्र सुरू होऊन तीन महिने लोटले पण अद्याप शैक्षणिक साहित्याचा पुरवठा झालेला नाही. प्रकल्प कार्यालयाच्या नियोजनशून्य कारभारामुळे विद्यार्थ्यांची  गैरसोय होत असल्याचा, आरोप करत पंधरा दिवसात  रिक्त पदे भरावीत, प्रतिनियुक्त्या रद्द करून कर्मचार्‍यांच्या रिक्त जागा तात्काळ भराव्यात,  डीबीटीचे वाटप नियमित व वेळेवर करून शैक्षणिक साहित्य  पुरवठा करावा, मुख्याध्यापकांना मूळ नियुक्ती विषयाचे अध्यापन करण्याची सक्ती करावी, पेयजलशुद्धीकरण यंत्रे बसून शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा, शाळांना संरक्षण भिंती बांधाव्यात, क्रीडा मैदाने अद्ययावत करून दररोज विविध खेळ घेण्याचे नियोजन करावे,प्राथमिक तातडीच्या उपचारासाठी प्रत्येक शाळेत एका आरोग्य परिचारिकेची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा, आश्रम शाळातील रिक्त असलेल्या पदावर  रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने  पात्र आदिवासी उमेदवारांना प्राधान्य देऊन तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त्या द्याव्यात. तसेच नियमित देखभाल व नियंत्रणासाठी शिक्षक विभागातील सहाय्यक प्रकल्प अधिकार्‍यांच्या रिक्त जागा त्वरित भरण्याची कार्यवाही करावी अशा   मागण्या केल्या असून 15 दिवसात यावर अंमल न झाल्यास टाळे ठोकण्याचा इशारा विकास कुडमते यांनी दिला आहे. निवेदनावर अंकुश आडे, ओम प्रकाश कुरसंगे, उमेश सलाम, अविनाश कुमरे, कुंदन कुमरे, आशिष उर्वते, किशोर शेडमाके, विनोद येरकाडे, सूर्यकांत धुर्वे, निशांत मेश्राम, अभिमान परचाके, संतोष मेश्राम, अमोल कुडमते, अरविंद राऊत, अमृत जुगनाके, गोपीनाथ बुलबुले, शिवाजी सिडाम,आशिष कुमरे व राम मेश्राम यांच्या स्वाक्षर्‍या आहेत

No comments:

Post a Comment

Pages