किनवट मध्ये भरदिवसा सागवान तस्करीचा प्रयत्न - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 2 August 2022

किनवट मध्ये भरदिवसा सागवान तस्करीचा प्रयत्न

किनवट, (प्रतिनिधी) :  सागवान तस्करांनी सर्वसीमा ओलांडल्या असून, शनिवारी (दि.30) दुपारी दिवसाढवळ्या  येथील गजानन महाराज संस्थानाच्या हद्दीतील सागवानाची दोन झाडे कापून त्यातील एक लांबवले. दुसरेही जाणारच होते मात्र, नागरीकांच्या सतर्कतेमुळे त्यांना ते  जागीच फेकून ऑटोरिक्षातून पळावे लागले. या तस्करांच्या मुसक्या आवळण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया  घटनास्थळी उपस्थितांमध्ये उमटल्या.


  गत काही वर्षात जंगलातील मोठमोठी सागवान झाडे तस्करांनी सर्रास तोडलीत. सध्या  वनविभागाने कडक पावले उचलून चांगलीच नाकेबंदी केल्यामुळे तस्करांची गोची झालेली आहे. त्यामुळे तस्करांनी दाभाडीसह अनेक ठिकाणच्या शेतीलगतच्या गायरान जमिनीतील सागवान झाडे अवैधरित्या तोडण्याचा सपाटा लावल्याचे समजते. शेतकरी शेतात नसल्याच्या संधीचा फायदा घेत शेतातील सागी झाडे लांबविली जात आहेत. शनिवारी तर तस्करांनी कहरच केला असून, किनवट शहरातील राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या गजानन महाराज संस्थानाच्या मालकी क्षेत्रातील दोन मोठी सागवान झाडे भरदिवसा लोकांची वर्दळ असतांनाही कापलीत. भाविकांच्या हालचालीवर नजर ठेऊन त्यातील एक लांबविले. दुसरे लांबवण्याच्या बेतात असतांना भाविकांनी आरडाओरडा केल्यामुळे ऑटोरिक्षातील  सागवान जागीच फेकून ते तस्कर पसार झाले.


        तस्करीसाठी वापरलेला ऑटो कुणाचा ? याची चौकशी होणार असल्याचे समजते. लोकांनी गाफील राहिल्यास त्यांची वनसंपत्ती सुरक्षित राहाणार नाही; त्यापेक्षाही तस्कर ठेवणार नाहीत हे यावरुन स्पष्ट होते. तस्करांचे हे धाडस प्रसंगी लोकांना घातकही ठरण्याची भीती उपस्थितांनी व्यक्त केली. वनविभागाच्या फिरत्या पथकाने शहरात गस्त वाढवल्यास तस्करांच्या मुसक्या आवळण्यास मदत होईल, अशी चर्चा नागरिकांत होती.

No comments:

Post a Comment

Pages