जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात रानभाजी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 10 August 2022

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात रानभाजी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

नांदेड  दि. 10 :- जागतिक आदिवासी दिनाचे व  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे  औचित्य साधून येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात रानभाजी महोत्सवाचे आयोजन आज करण्यात आले. या महोत्सवास शेतकऱ्यांचा व नांदेड शहरातील नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी नांदेड डॉ. विपीन इटनकर, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी  यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. या कार्यक्रमासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा रविशंकर चलवदे, प्रकल्प उपसंचालक एम.आर. सोनवणे,  उपविभागीय कृषी अधिकारी , तालुका कृषी अधिकारी, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक यांची प्रमुख उपस्थिती होती. 


याप्रसंगी आदिवासी महिला शेतकऱ्यांचा सन्मान भाजीपाला बियाणाचे मिनिट देऊन करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या संकल्पनेतून रानभाजी महोत्सवाचे आयोजन मागील दोन  वर्षांपासून आयोजीत करण्यात येत आहे. या महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे करटुले, वाघाटे, आघाडा, अळू कुंजर, कुर्डू, लाल माठ, घोळ, चुका, करवंद, तरोटा, सुरकंदतांदुळजा, नाय भाजी, गुळवेल,गुलगुसा इत्यादी रानमेवा विक्रीसाठी उपलब्ध होता.  याच बरोबर सेंद्रिय भाजीपाला, गुळ, मोसंबी, लोणचे पापड, नाचणीचे पापड, शेवया बिस्कीट, बिब्याची  गोडंबी, हळद, मिरची पावडर, विविध मसाले, डाळी, ज्वारी, गायीचे  तूप, गौरी चिप्सचे केळी, बटाटा चिप्स व इतर उत्पादने,  मशरूम आदी विक्रीसाठी उपलब्ध होते.  


जिल्ह्यातील विविध भागातून शेतकरी, महिला गट, शेतकरी गट  यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. तसेच त्यांनी मोठ्या प्रमाणावर उत्पादने विक्रीसाठी आणली होती. या संपूर्ण उत्पादनाला मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची मागणी होती आणि या दिवसभरात साधारणतः 4 ते 5 लाखांची उलाढाल झाली आहे. या रानभाज्या महोत्सवातून शेतकऱ्यांना विक्रीसाठी नवे दालन उपलब्ध झाले असून राज्य शासनाच्या संकल्पनेतून हा अतिशय स्तुत्य उपक्रम यशस्वी झाला आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा रविशंकर चलवदे यांनी दिली.


No comments:

Post a Comment

Pages