किनवट तालुक्यातील तीन मंडळात अतिवृष्टी ; दिवसभरात सरासरी 53.92 मिलीमीटर पावसाची नोंद - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 12 September 2022

किनवट तालुक्यातील तीन मंडळात अतिवृष्टी ; दिवसभरात सरासरी 53.92 मिलीमीटर पावसाची नोंद

किनवट, दि.12  :  तालुक्यात शनिवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे एकूण नऊ महसूल मंडळापैकी किनवट, जलधारा व इस्लापूर या तीन मंडळात अतिवृष्टीची नोंद झालेली असून, सिंदगी मोहपूर मंडळात अतिवृष्टीची नोंद होण्यासाठी अवघा तीन मि.मी.पाऊस कमी पडला. तालुक्यातील  या मोसमातील ही आठवी अतिवृष्टी होय. अतिवृष्टी झालेला भाग सोडला तर इतर मंडळात पडलेल्या मध्यम पावसामुळे,खरीपातील सोयाबीन व कापूस पिकास दिलासा मिळालेला आहे. किनवट तालुक्यात रविवारी (दि..11) सकाळी साडेदहा पर्यंत संपलेल्या 24 तासात  एकूण 485.3 मिलीमीटर पाऊस पडला असून, त्याची सरासरी 53.92 येते.


      गत ऑगस्टमध्ये तब्बल 19 दिवस पावसाने दडी मारली होती; तर सप्टेंबरमध्ये दि.04 ला मांडवी व उमरीबाजार या मंडळात झालेल्या  अतिवृष्टीची नोंद  वगळता केवळ दोन-चार दिवसच काही मंडळात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. पावसाच्या या खंडामुळे खरीपातील महत्वाचे नगदी पीक असलेल्या आणि सर्वात जास्त पेरल्या गेलेल्या कापूस व सोयाबीन पिकांना याचा फटका बसला होता. सर्वत्र उकाडा व उन्हाचा चटका वाढला होता. अनेक ठिकाणी पीक वाळत असल्याने, शेतकर्‍यांनी प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी केली होती. महत्वाचे म्हणजे तालुक्यातील सिंचन क्षेत्र अवघे 5 ते 7 टक्के असल्यामुळे बहुतांश शेतकरी खरीपात पावसावरच अवलंबून असतात. गत रविवारी (दि.04) तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर भारतीय हवामान विभागाने संपूर्ण जिल्ह्यातच अतिवृष्टीचा (यलो अलर्ट) इशारा दिला होता. तो तंतोतंत खरा ठरून, शनिवारी दुपारनंतर तालुक्यात ढगाळ वातावरण झाले होते. काही भागात थोडया फार सरी कोसळल्या. मात्र रविवारी रात्री मात्र विजेचा कडकडाट व मेघगर्जनेसह सर्वदूर मुसळधार पाऊस कोसळला.


     तालुक्यातील जून ते सप्टेंबर या चार महिन्यातील पावसाची सरासरी 951.90 मि.मी.आहे. 15 ऑगस्टपर्यंत 961.50 मि.मी. (101.01 टक्के )पाऊस पडल्यामुळे ती सरासरी अडीच महिन्यातच ओलांडल्या गेली आहे. मात्र,किनवट तालुक्याचे जानेवारी ते डिसेंबरपर्यंतचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान 1063.09 मि.मी. आहे. काल शनिवारी पडलेल्या दमदार पावसामुळे तालुक्यातील संपूर्ण 12 महिन्याची वार्षिक सरासरीसुद्धा पार झालेली आहे. गत 21 वर्षात यंदाची धरून केवळ पाचवेळा किनवट तालुक्यात पावसाने पूर्ण वार्षिक सरासरी ओलांडली आहे.


      तालुक्यात एक जूनपासून नऊ मंडळात मिळून रविवार (दि.11) पर्यंतचा पडलेला एकूण पाऊस 9,994.4  मि.मी.असून, त्याची सरासरी 1,110.49  मि.मी.येते.  आजघडीला तालुक्यात सर्वाधिक पाऊस इस्लापूर मंडळात झालेला असून, सर्वात कमी उमरी बाजार मंडळात झालेला आहे. तालुक्यात रविवार (दि.11) सप्टेंबरपर्यंत पडणारा अपेक्षित सरासरी पाऊस 843.7 मि.मी.असून, या तुलनेत 131.6 टक्के पाऊस पडलेला आहे.  01 जून ते 30 सप्टेंबर या पावसाळ्यातील चार महिन्यादरम्यान पडणार्‍या अपेक्षित पावसाच्या  तुलनेत आतापर्यंत तालुक्यात 116.67 टक्के पाऊस पडलेला आहे.  मागील वर्षी 11 सप्टेंबरपर्यंत पडलेला पाऊस 1,149.70 मि.मी. होता. 30 सप्टेंबर पर्यंतच्या वार्षिक पावसाच्या तुलनेत  त्याची टक्केवारी 136.27 होती.


 रविवारी सकाळी संपलेल्या गत 24 तासात किनवट तालुक्यातील पावसाची नोंद पुढील प्रमाणे असून,  कंसात 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या मंडळनिहाय एकूण पावसाची नोंद दिलेली आहे.  किनवट- 88.0 (1,092.9 मि.मी.); बोधडी- 29.8 (1,145.0 मि.मी.); इस्लापूर- 69.8 (1,302.7 मि.मी.); जलधरा- 69.8 (1,224.5 मि.मी.); शिवणी- 38.5 (1,113.7 मि.मी.); मांडवी- 40.3 (1,030.5 मि.मी.);  दहेली- 46.8(1,053.4 मि.मी.), सिंदगी मोहपूर 62.0(1,035.4 मि.मी.); उमरी बाजार 40.3 (996.3 मि.मी.).

No comments:

Post a Comment

Pages