49 हजार 332 हेक्टर पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान किनवट तालुक्यातील 53 हजार 451 शेतकर्‍यांना फटका; मदतीची प्रतिक्षा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 1 September 2022

49 हजार 332 हेक्टर पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान किनवट तालुक्यातील 53 हजार 451 शेतकर्‍यांना फटका; मदतीची प्रतिक्षा

किनवट, दि.31,(प्रतिनिधी) : यंदाच्या जुलैमधील अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे  नांदेड जिल्ह्यात तब्बल 4 लाख 97 हजार 443 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले असून, त्यात किनवट तालुक्यातील 53 हजार 451 आपद्ग्रस्त शेतकर्‍यांच्या 49 हजार 332 हेक्टर बाधित क्षेत्रातील पिकांचा समावेश आहे. शेतकर्‍यांना या हानीपोटी अनुदानाद्वारेे दिलासा देण्यासाठी महसूल प्रशासनाकडून  67 कोटी 09 लक्ष 15 हजार 200 रुपयांच्या अपेक्षित निधीची मागणी करण्यात आली आहे.


       किनवट तालुक्यात मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा जुलै महिन्यात पावसाने जास्तच धुमाकूळ घालून कहर केला होता. तालुक्यातील एकूण नऊ मंडळात जुलैमध्ये तब्बल सहा वेळा अतिवृष्टी झाली असून, त्यात जलधरा मंडळात चार वेळा, इस्लापूर व शिवणी मंडळात प्रत्येकी तीन वेळा तर किनवट, बोधडी व सिंदगी मोहपूर मंडळात प्रत्येकी एक वेळा अतिवृष्टी झालेली आहे. पावसाळ्यातील जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीतील पावसाची सरासरी 951.90 मिमी. असून, केवळ अडीच महिन्यातच अर्थात 15 ऑगस्टलाच पावसाने ही सरासरी ओलांडलेली आहे. 15 ऑगस्टपर्यंत तालुक्यात पडलेला एकूण पाऊस 961.50 मि.मी. असून,त्याची टक्केवारी 101.01 आहे.


       किनवट तालुक्यातील यंदाच्या खरीपातील जिरायती पिकाखालील एकूण क्षेत्र 78 हजार 144 हेक्टर आहे. त्यातील 53 हजार 451 शेतकर्‍यांचे 49 हजार 332 हेक्टरवरील कापूस,सोयाबीन, तूर व इतर पिके अतिवृष्टीमुळे बाधित झालेली आहेत. त्यापैकी कापसाचे बाधित क्षेत्र 27 हजार 954 हेक्टर, सोयाबीनचे 16 हजार 540 हेक्टर, तुरीचे 3 हजार 831 हेक्टर तर मूग,उडीद, ज्वारी आदी पिकांचे मिळून एक हजार 007 हेक्टर क्षेत्रातील पिकांना हानी पोहोचून त्यांची पार वाट लागली आहे. नूतन विराजमान झालेल्या शिंदे सरकारने आपद्ग्रस्त शेतकर्‍यांविषयी अनुकंपा दाखवून मदतीची रक्कम वाढविलेली आहे. त्यांच्या घोषणेनुसार बाधितांना प्रति हेक्टरी 13 हजार 600 रुपये मिळणार असून, त्याची मर्यादा तीन हेक्टरपर्यंत आहे. यानुसार किनवट तालुक्यातील बाधित शेतकर्‍यांसाठी 67 कोटी 09 लक्ष 15 हजार 200  रुपयांचा निधी लवकरच प्राप्त होणार असल्याचे महसूलच्या सूत्रांकडून कळाले.


     “पूर्वी राज्य शासनाचा अतिवृष्टी व पूर या नैसर्गिक आपत्तीसाठीचा बाधित पिकांच्या नुकसान भरपाईचा प्रचलित दर  जिरायतसाठी प्रतिहेक्टर 6,800 रुपये, बागायतसाठी प्रतिहेक्टर 13,500 रुपये तर फळपिकांसाठी प्रतिहेक्टर 18,000 रुपयांचा प्रचलित दर दोन हेक्टरच्या मर्यादेत होता. 22 ऑगस्ट 2022 च्या शासननिर्णयानुसार शेतीपिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकर्‍यांना जिरायतसाठी प्रतिहेक्टर 13,600 रुपये, बागायतसाठी प्रतिहेक्टर 27,000 रुपये तर फळपिकांसाठी( बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी) प्रतिहेक्टर 36,000 रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेत वाढीव दराने निविष्ठा अनुदान स्वरूपात मदत देण्यास राज्यशासनाने मंजुरी दिलेली आहे.”

  डॉ.मृणाल जाधव. तहसीलदार, किनवट.

No comments:

Post a Comment

Pages