किनवट, ,(प्रतिनिधी) : किनवट तालुक्याच्या ग्रामीण भागातील नदीपात्रांमध्ये धोकादायक पद्धतीने मासेमारी सुरू आहे. नदीच्या पाण्यात वीजेच्या तारा टाकून इथे मासेमारी केली जातेय. यामुळे पर्यावरणाचं नुकसान तर होतंच आहे; पण नदीच्या पात्रातील इतर जलचरांसह काठावरील मानवी जिवितालाही धोका निर्माण झालेला आहे. कुठलीही अनुचित घटना घडण्यापूर्वी संबंधित विभागांनी याबाबत त्वरित पावले उचलायला हवी, अशी परिसरातील ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे.
तालुक्यातील अंबाडी, येंदा-पेंदा, घोटी, पिंपळगाव भागासह विविध भागातून वाहणार्या नदी-नाल्यांमध्ये विद्युतप्रवाह सोडून माशांना शॉक देण्यात येतोय. त्यामुळे मासे मरतात आणि ही मासेमारी कमी कष्टाची, सोपी व फायद्याची असल्यामुळे सर्रासपणे हा प्रकार अवलंबिणे सुरू आहे.
या प्रकारच्या मासेमारीला परवानगी नाही. यापैकी बर्याच नदीपात्रातून शेतीला पाणी पुरवठा केला जातो. त्यासाठी अनेक पाण्याचे पंप 24 तास सुरू असतात. लगतच्या 440 व्हॉल्ट व 240 व्हॉल्टच्या विद्युत पोलवर अवैधरित्या आकडा टाकून तारेच्या साहाय्याने हा वीजप्रवाह पाण्यात सोडला जातोय. पाण्यात एका जाळीच्या सहाय्याने माशांना शॉक दिला जातो. त्यात मेलेले मासे पाण्यावर तरंगायला लागतात. त्यांना गोळा करून विक्रीसाठी नेलं जात आहे.
नुकतेच अंबाडी परिसरात हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर,त्याचे फोटोपण गुपचुप काढण्यात आले. मासेमारीचा परवाना नसताना अशा पद्धतीने मासेमारी करणारे थोडे थोडे मासे घेऊन पळ काढत आहेत. या प्रकारामुळे पाण्यातल्या सर्वच जलचरांना धोका निर्माण झालाय. त्याचबरोबर परिसरात पाण्यात उतरणं माणसांच्या जीवावर बेतू शकतयं. इतका मोठा प्रकार सुरू असताना प्रशासनाचं मात्र इथे लक्ष गेलेलं नाही त्याबाबत आश्चर्य व्यक्त होतंय.
हा धक्कादायक प्रकार दाखवून दिल्यावर वीज वितरण कंपनीचे अधिकारी हादरलेत. अशा प्रकारांवर कारवाईचं आश्वासन त्यांनी दिलंय. हा प्रकार तालुक्यात पहिल्यांदाच पाहिल्याचा दावा महावितरण कंपनीच्या अधिकार्यांनी केला असला तरी असे प्रकार या भागात सर्रास सुरू असल्याचं बोललं जातंय.
“अंबाडी परिसरातील वीज प्रवाहाद्वारे मासेमारीचा प्रकार कळाल्यानंतर, आम्ही तत्काळ त्या परिसरातील आमच्या वीज कर्मचार्याला याबाबत अवगत करून, असे प्रकार करणार्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यावर कारवाई करण्यास सांगितलेले आहे. तालुक्यातील इतरही भागात असे प्रकार चालू असतील,तर वरिष्ठांना माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली या धोकादायक कामास आळा घालण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”
एम.डी.भांगे. सहाय्यक अभियंता, किनवट.
No comments:
Post a Comment