किनवट,दि.22 : किनवट तालुक्यात बर्याच ठिकाणी पावसाच्या दीर्घ उघडीपीनंतर झालेला मोठा पाऊस, ढगाळ वातावरण व पाण्याचा निचरा योग्य प्रकारे न होणार्या जमिनीतील कपाशीची झाडे काही प्रमाणात पिवळी व मलूल पडून, अचानक जागेवरच सुकू लागलेली आहेत. यालाच ‘आकस्मिक मर’ (पॅरा विल्ट) असे म्हणतात. ओल्या दुष्काळाच्या छायेत असलेल्या शेतकर्यांची या कपाशीवरील मर रोगामुळे उरलीसुरली आशाही नाहीशी झालेली आहे.
किनवट तालुक्यातील कापूस लागवडीचे क्षेत्र 42 हजार 340 हेक्टर असून, सध्या कापूस पाते,फूल व बोंड धरण्याच्या व वाढीच्या अवस्थेत आहे. कपाशीच्या ‘आकस्मिक मर’ उद्भवण्याचे कारण म्हणजे, दीर्घकाळ पाण्याचा ताण पडल्यानंतर जमिनीचे तापमान वाढलेले असते. अशावेळी सिंचन केल्यास अथवा मोठा पाऊस पडल्यास झाडाला धक्का बसून, अचानक झाड सुकते आणि कालांतराने झाडाची पाने गळतात. सिंचन केल्यानंतर किंवा मोठा पाऊस पडल्यानंतर तीन ते चार दिवसात (36 ते 48 तास) ‘आकस्मिक मर’ ची लक्षणे दिसू लागतात. झाड सुकल्यानंतर पानगळ होऊन कालांतराने झाडे मरतात त्यामुळे उत्पादनात मोठे नुकसान होऊ शकते.
कापसातील ‘आकस्मिक मर’ व्यवस्थापनासाठी अतिरिक्त पाण्याचा लवकरात लवकर निचरा करावा. वापसा येताच कोळपणी व खुरपणी करावी. लवकरात लवकर 200 ग्रॅम युरिया, 100 ग्रॅम पालाश (पोटॅश) आणि 25 ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड हे प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड 150 मिली याप्रमाणे आळवणी करावी. किंवा 1 किलो 13:00:45 अधिक 2 ग्रॅम कोबाल्ट क्लोराईड व 250 ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड 200 लिटर पाण्यातून मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड 100 मिली आळवणी करावी. वरील प्रमाणे द्रावणाची आळवणी केल्यानंतर सुकू लागलेल्या झाडाजवळची माती पायाने लवकरात लवकर दाबून घ्यावी, अशी शिफारस तालुका कृषी कार्यालयाकडून करण्यात आलेली आहे. वरील सर्व उपाययोजना शेतामध्ये झाडे सुकू लागलेली दिसताच त्वरित अर्थात 24 ते 48 तासाच्या आत कराव्यात. जेणेकरून पुढील होणारे मोठे नुकसान वेळीच टाळता येईल. असे तालुका कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
“शेतात पाण्याचा व्यवस्थित निचरा होणे अतिशय महत्त्वाचे आहे. प्रदीर्घ काळ कमी पाण्याचा ताण पडू देऊ नये. झाडाच्या वाढीच्या मुख्य अवस्थेत सिंचनाची सोय उपलब्ध असल्यास सिंचन करावे. भारी जमिनीत शेणखताचा आणि रासायनिक खतांचा अतिवापर टाळावा. प्रादुर्भावाची लक्षणे दिसलेल्या झाडाच्या मुळाशी शिफारसीमध्ये दिलेल्या औषधांच्या मिश्रणांची आळवणी करावी. अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व कृषी सहायक यांचेशी संपर्क करावा.”
-बालाजी मुंडे. तालुका कृषी अधिकारी, किनवट.
No comments:
Post a Comment